मद्यपी विद्यार्थ्याने केलेल्या हल्ल्यात वर्ग शिक्षकाच्या कानावर झाली गंभीर दुखापत
भोकर तालुक्यातील साळवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेत घडली ही गंभीर घटना; त्या विद्यार्थ्या विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील साळवाडी(समंदरवाडी) येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील एका मद्यपी विद्यार्थ्यास तू मद्यपान करुन शाळेत येऊ नकोस व तुझ्या वर्तणुकीत सुधारणा कर अन्यथा टी.सी.घेऊन शाळा सोडून जा म्हणून समज देणाऱ्या एका वर्ग शिक्षकास जीवे मारण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याने मारहाण केली.यात शिक्षकाच्या कानास गंभीर दुखापत झाली असून ‘त्या’ मद्यपी विद्यार्थ्या विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री संत गाडगे बाबा प्रतिष्ठाण नांदेड द्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, साळवाडी(समंदरवाडी) ता.भोकर येथे इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत असलेला दिपक परमेश्वर धुमाळे,रा.हाळेगाव ता.हदगाव जि.नांदेड हा विद्यार्थी दि.१० जुलै २०२४ रोजी आपल्या काही मित्रांबरोबर शाळेबाहेरुन दारु पिऊन शाळेत आल्याने अभ्यासू व शिस्तप्रिय असलेले वर्ग शिक्षक खंडू गणपती गुंडूले(३६) रा. जेतवन नगर नांदेड यांनी तू दारु पिऊन शाळेत का आलास ? असे करु नको अन्यथा तूला शाळेतून काढून टाकावे लागेल म्हणून समज दिली.परंतू त्या विद्यार्थ्याच्या वर्तणुकीत काहीही फरक पडला नाही.दि.१२ जुलै २०२४ रोजी दुपारी १:०० वाजताच्या दरम्यान मुख्याध्यापकांच्या कार्यालयात वर्ग शिक्षक खंडू गुंडूले हे बसले असता तो विद्यार्थी तेथे आला.यावेळी वर्ग शिक्षक खंडू गुंडूले यांनी परत एकदा त्या विद्यार्थ्यास समज देण्यासाठी म्हटले की,दारु पिऊन शाळेत येऊ नकोस,असे वर्तन चालनार नाही.कारण ही निवाशी आश्रम शाळा आहे.तुझ्या वर्तणुकीत बदल होत नसेल तर टि. सी.घेऊन शाळेतून निघुन जा.
अशी समज दिल्याने राग अनावर झालेल्या त्या विद्यार्थ्याने म्हटले की,मी टि.सी.घेऊन जाणार नाही तुम्हाला काय करुन घ्यायचे ते करुन घ्या.असे म्हणत त्याने वर्ग शिक्षक खंडू गुंडूले यांना अश्लील शिविगाळ करत अंगावर धावून येऊन तुमची बघुन घेतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली व अचानक पणे हल्ला चढवला.थापड बुक्क्यांनी मारहाण केली व हातातील कड्याने वार केला.यात शिक्षक खंडू गुंडूले यांच्या उजव्या कानास गंभीर दुखापत झाली आणि कानातून रक्तस्राव होऊ लागला.यावेळी मुख्याध्यापक संजिव नागनाथ येचाळे, लिपीक मनोहर व्यकंटी माडेवार,प्रयोग शाळा परीचर शेख गफार शेख मुस्ताक व सेवक दिलीप कोंडीराम तेलंगे यानी त्या विद्यार्थ्यास पकडले व सोडवासोडव केली.तसेच शिक्षकाच्या कानास गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होत असल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालय नांदेड येथे नेण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या कानाचा पडदा फाटला व आत मोठी दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाळा संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक नेते बालाजी शिंदे यांनी अनेक कष्टातून आदिवासी व मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांचे जीवनमान उज्वल करण्यासाठी ही भव्यदिव्य शाळा उभारली आहे.या शाळेतून आजपर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी घडले देखील आहेत.परंतू झालेला प्रकार हा शाळेच्या प्रतिमेला डाग लावणारा असल्याने त्यांनी त्या विद्यार्थ्यास तात्काळ शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला व पालकांना बोलावून घेऊन टि.सी.देऊन त्याची या शाळेतून हकालपट्टी केली आहे.तसेच जखमी शिक्षकास धीर देत तक्रार देण्याचा सल्ला ही दिला. त्यावरुन शिक्षक खंडू गुंडूले यांनी उपरोक्त आशयानुसार भोकर पोलीसात फिर्याद दिल्यावरुन दि.१२ जुलै २०२४ रोजी मद्यपी विद्यार्थी दिपक धुमाळे विरुद्ध गु.र.नं.२२३/ २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (२),३५२,३५२ (२),३५२ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार भीमराव जाधव हे करत आहेत.तर शाळा व्यवस्थापनाने ‘त्या’ विद्यार्थ्यास शाळेतून काढले असले तरी ही घटना गंभीर व चिंतनीय आहे.तसेच अनेक शाळांतील विद्यार्थ्यांतील वाढती व्यसनाधीनता पाहता अशा प्रकारच्या घटना व व्यसनाधीनता यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे असून सभ्य व होतकरू विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही ऐरणीवर येत असल्याचे अनेकांतून चर्चील्या जात आहे.