छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या सागरी व भूमी सुरक्षा धोरणांचे शिल्पकार-डॉ.अरविंद सोनटक्के

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते,तर दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते ही होते. त्यांचा प्रशासन व युद्धनीतीचा दृष्टिकोन आधुनिक काळातही आदर्श मानला जातो.भारताच्या सुरक्षिततेसाठी सीमांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे,हे महाराजांनी मध्ययुगातच ओळखले होते. म्हणूनच त्यांनी केवळ भूभागापर्यंत मर्यादित न राहता सागरी सामर्थ्यावरही भर दिला.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या सागरी व भूमी सुरक्षा धोरणांचे शिल्पकार आहेत,असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा प्रख्यात वक्ते प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांनी व्यक्त केले.भोकर येथे शिवस्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२२ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
शिवस्वराज्य सप्ताह व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका भोकर च्या वतीने पक्ष कार्यालयात दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने महाराजांच्या जीवन कार्यावर दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर चे इतिहास विभाग प्रमुख तथा मुर्तीशास्त्र अभ्यासक व प्रख्यात शिवव्याख्याते प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विक्रम देशमुख हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,नांदेड महानगर शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील,प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील,युवकचे जिल्हाध्यक्ष आतुलभाऊ हिंगमिरे,पत्रकार मनोजसिंह चौहान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे यांसह आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून होऊ घातलेल्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.तर वसंत सुगावे,दिलीपराव धर्माधिकारी यांनी कार्यक्रमास अनुसरून मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख शिवव्याख्याते म्हणून बोलतांना प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय आरमाराचा पाया रचला.त्यामुळे महाराजांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते.महाराजांनी आपल्या कल्पनेतील पहिले जहाज तयार करून मराठा आरमाराची पायाभरणी केली.समुद्री मार्गाने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी त्यांनी कोकण किनाऱ्यावर सागरी किल्ल्यांची निर्मिती केली,व्यापारी जहाजांचे संरक्षण केले आणि नौदल प्रशिक्षित केले.त्यांचा हा दूरदर्शी दृष्टिकोन आजच्या काळातील सागरी सुरक्षा धोरणांसाठी प्रेरणादायी ठरतो.२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात समुद्र मार्गाचा वापर करण्यात आला.जर शिवरायांचे विचार आजच्या राजकारण्यांनी आत्मसात केले असते,तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती.
महाराजांच्या नावाची शक्ती: ऐतिहासिक विजयाचा जयघोष…
युद्धभूमीवर जयघोष सहसा देवतांच्या नावाने केला जातो.मात्र, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत,ज्यांच्या नावाने युद्धात घोषणा दिली जाते.आजही मराठा रेजिमेंट “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशी गर्जना करीत शत्रूला नामोहरम करते.
इतिहासात ही घोषणा पहिल्यांदा भारतात नव्हे,तर इरिट्रिया येथील डोलोडोरॉक किल्ल्यावर देण्यात आली.हा किल्ला ब्रिटिश सैन्य जिंकू शकत नव्हते.अखेर भारतीय सैनिकांनी पुढे येऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितले,”आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष करण्याची परवानगी द्या,आणि आम्ही हा किल्ला जिंकून दाखवतो.” ब्रिटिशांनी परवानगी दिली,आणि भारतीय सैनिकांनी महाराजांच्या प्रेरणेने विजय संपादन केला.हीच महाराजांच्या नावाची मोठी ताकद आहे.रयतेच्या रक्षणासाठी झगडणाऱ्या न्यायप्रिय राजाची प्रेरणा!,महाराजांचे लोककल्याणकारी मूल्य आजही लोकशाही व्यवस्थेतील आदर्श ठरत आहेत.राजेशाहीत लोकशाही जपणाऱ्या या महानायकाची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे.असे ही ते म्हणाले.तर अध्यक्षिय समारोप डॉ.विक्रम देशमुख यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बहुसंख्येने उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन गरजू पाटील सोळंके यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार राष्ट्रवाद काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे यांनी मानले.