Thu. Dec 19th, 2024
Spread the love

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त लेखिका रुचिरा बेटकर यांचा हा प्रासंगिक लेख वाचकांसाठी-संपादक

छत्रपती राजर्षी शाहू महाराज-कृषि उद्योग प्रणेते!

रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी सहकार, सामाजिक,कृषि उद्योग यांसह विविध क्षेत्रांत भरीव कार्य केले.छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दि.२६ जून १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला.राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे होते.तर आईचे नाव राधाबाई होते.हाच दिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.त्यांच्या अगणिक प्रासंगिक जीवनाचा आलेख त्याच्या कर्तृत्वाने गोंदलेला आहे.असे म्हटले जाते की, त्यांच्या कर्तृत्वाशी त्याचे कार्य जोडलेले आहे.अश्या कार्यांवरील त्याची नितांत असलेली निष्ठा व प्रेरणा असू शकते.त्या प्रेरणेतून जे कार्य जन्म घेते,ते कार्य उजळते,प्रकाशमान होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आपल्या राजेपणापासून फारकत घेऊन पायउतार झाले आणि रयतेच्या सुख-दु:खाशी समरस झाले. त्यावेळेपासून एका समाजक्रांतीला सुरुवात झाली.ही क्रांती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली आणि तिचे पडसाद आजही एकविसाव्या शतकात उमटतात. याचा कर्ता करविता केंद्रबिंदू आहेत राजर्षी !
ते अष्टावधानी होते हे तर खरेच,शिवाय ते खरे कर्मवीर होते. त्यांच्या कर्माला शिस्त आणि विचार यांची जोड होती. म्हणूनच त्यांची विचारक्रांती यशस्वी झाली.राजर्षी शाहूंच्या वेळच्या कालमान,परिस्थिती यांचा वेध घेता त्यांनी जे काही निर्णय घेतले,ते काल सुसंगतच म्हणावे लागतील.काही भविष्याच्या दृष्टीने विसंगत वाटत होते.तरीसुद्घा प्राप्त स्थितीला सामोरे जाण्यासाठी ते निर्णायक क्षणच मानले पाहिजेत.

परिस्थितीला पुरून उरलेला हा राजा कसलेला सेनानीच होता.तो लढवय्या तर आहेच,शिवाय तो हुशार,बुद्धिमान, मुत्सद्दी ही आहे.त्यांचे शहाणपणही पराकोटीचे होते.त्यांच्या कालखंडात राज्यकर्त्यांनी कर गोळा करावा आणि संरक्षण आणि आपल्या राज्य हद्दीतील अंतर्गत कायदा,सुव्यवस्था पहावी एवढीच मर्यादित कार्ये राज्यकर्ते आपली मानीत.प्रजेचे आर्थिक जीवनमान सुधारावे असे त्यांच्या कार्यप्रणालीत नव्हते. जो समर्थ असेल तो टिकेल,दुबळा असेल तो मरेल,ही अर्थनीती होती.अशावेळी शाहू छत्रपतींनी या नीतीला छेद देऊन समाजातील सर्व घटकांचा विचार मनी ठसविला होता.यामध्ये शेती आणि शेतकरी यांचाही विचार त्यांच्या केंद्रस्थानी होता. शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलची त्यांची आस्था कमालीची संवेदनशील होती.

महाराजांच्या कारकिर्दीत शेती हा प्रधान व्यवसाय होता ; पण शेतीचे लहान-लहान तुकड्यांत विभाजन झाले होते.वाटणी व्यवहाराने अशा लहान तुकड्यांची निर्मिती झाली होती.ती बदलावी आणि त्याचे रूपांतर मोठ्या शेतीमध्ये व्हावे हा त्यांचा विचार होता.म्हणजे शेती किफायतशीर होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल असे त्यांचे स्पष्ट मत होते.हे मत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले आहे.शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे.’शेती पाण्याखाली येणे अगत्याचे,म्हणून त्यांनी नव्या विहिरी,तलाव,बंधारे,कालवे काढायला प्रोत्साहन दिले. त्यापैकी त्या काळाचा मोठा पाणी प्रकल्प म्हणजे ‘राधानगरी धरण’! ही त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होय.
महाराजांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे हा प्रकल्प.हे त्यांचे भव्य स्मारकच मानायला पाहिजे.मात्र,शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीत हा प्रकल्प पुरा होऊ शकला नाही. पुढे राजाराम महाराज यांनी तो पूर्ण केला. महाराजांनी शेतीचे विविध प्रयोग आणि त्यासाठी संशोधन यांचाही मागोवा घेतला. जुन्या अवजारांच्या ठिकाणी नवी अवजारे आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची प्रात्यक्षिके,प्रदर्शने, शेती संस्था असे उपक्रमही सुरू केले. शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शने त्यांनी घडवून आणली. पारंपरिक पिकांशिवाय नवी पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला.

महाराजांच्या प्रयोगशीलता आणि प्रगतिशीलता हे यशस्वीपणाचे द्योतक होते.उद्योग निर्माणामध्ये ते अग्रेसर ठरले. कोल्हापूरची शाहू मिल हे त्याचे मोठ उदाहरण.येथे पहिल्यांदा सूत आणि नंतर कापड निर्मिती सुरू झाली.महाराजांनी माणसांचे जीवनमान सुधारावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली.यामागे विचार,रचनात्मकता आणि त्यांची कळकळ होती. अस्पृश्य जनतेबद्दल त्यांना अत्यंत कळवळा होता,शाहू महाराजांइतका जातिभेद गाडून टाकणारा दुसरा पुढारी झाला नाही.एका महान हेतूने प्रेरित झालेला हा राजा त्याच्या निरिच्छ वृत्तीने ‘राजर्षी’ पदाला पोहोचला.राजर्षी शाहू केवळ राजा नव्हता,केवळ छत्रपती नव्हता, केवळ लोकनेता नव्हता,तर इतिहासाला कलाटणी देणारा आणि एक नवा इतिहास रचणारा महान समाजसुधारक होता.’त्यांच्या या कार्यास कोटी नमन!

✍️
लेखिका
रूचिरा शेषराव बेटकर
नांदेड,मो.९९७०७७४२११


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !