भोकर येथे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या अपघात प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर-किनवट महामार्गावरील किन्हाळा पाटीपासून काही अंतरावर असलेल्या दुचाकी विक्री शोरुम जवळ रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी उभी करुन आपापसात बोलत थांबलेल्या तिघांना पाठीमागून येत असलेल्या एका चारचाकीने (कारने) दि.२५ मे रोजी उडविले.या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचारादरम्यान त्यातील एका जखमी महिलेचा मृत्यू झाला होता.सदरील अपघात प्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून ‘त्या’ कारच्या चालकाविरुद्ध दि.२८ मे रोजी भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय सवाईराम जाधव,रा.कंचली ता.किनवट जि. नादेड यांची पत्नी सौ.सोनाबाई अजय जाधव (२२), सासू सुलोचनाबाई इंदल राठोड,रा.पोटा तांडा व साडू उदल सुभाष जाधव हे तिघे दि.२५ मे २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान भोकर शहरापासून काही अंतरावर भोकर -किनवट महामार्गावरील किन्हाळा पाटी पासून जवळच असलेल्या दुचाकी विक्री शोरुम समोर रस्त्याच्या कडेला त्यांची टी.एस.१८ जी.४१९४ क्रमांकाची दुचाकी उभी करुन आपापसात बोलत थांबलेले असतांना वेगात येत असलेल्या व चालकाचा गतीवरील ताबा निसटलेल्या एम.एच.२६ ए.के.५१८९ क्रमांकाच्या चारचाकीने(कारने) त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात उपरोक्त हे तिघेजण जखमी झाले.यावेळी त्या कारचालकासह काही नागरिकांनी त्या जखमी तिघांना तात्काळ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले.यावेळी तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी सदरील जखमींवर प्रथमोपचार केले व अधिक उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात त्यांची रवानगी केली.शासकीय रुग्णालय नांदेड येथे या तिघांवर उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान जखमी सौ.सोनाबाई अजय जाधव या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत महिलेवर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यानंतर दि.२८ मे २०२४ रोजी सदरील अपघात प्रकरणी तिचे पती अजय सवाईराम जाधव यांनी भोकर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन ‘त्या’ चारचाकीच्या (कारच्या) चालकाविरुद्ध गु.र.नं.१५९/२०२४ कलम ३०४ अ,२८९,३३७,३३८ भादवि व मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.राम कराड हे पुढील अधिक तपास करत आहेत.