भोकर च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिले स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर यांचे नाव

राज्य शासनाने राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दिले विविध क्षेत्रातील महान व्यक्तीमत्वांचे नाव…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र शासन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्यातील राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना विविध क्षेत्रातील महान व्यक्तीमत्वांचे नावे दिले असून यात नांदेड जिल्ह्यातील ११ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे.तर भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर यांचे नाव देण्यात आले असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्य शासनाचे अवर सचिव भास्कर बनसोडे यांच्या स्वाक्षरीने सदरील नामकरणाचा अध्यादेश दि.१५ जानेवारी २०२५ रोजी पारित करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत(आयटीआय)शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत (सीटीएस) प्रशिक्षण देण्यात येते.युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.सदरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना विविध क्षेत्रातील महान व्यक्तीमत्वांचे नाव देण्यात यावेत असा प्रस्ताव महाराष्ट्र शासन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्य शासनाकडे ठेवला होता.त्या अनुषंगाने सदरील विभागाच्या मंत्री महोदयांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती व या समितीने प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करुन नामकरण करण्याचा निर्णय दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आला होता.या निर्णयानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना नावे देण्यात आली होती.तर दि.१५ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाना विविध क्षेत्रातील महान व्यक्तीमत्वांचे नावे देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्या निर्णयाचा अध्यादेश उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०११५१६५७०३९९०३ असा आहे.
सदरील नामकरणात नांदेड जिल्ह्यातील उमरी,अर्धापूर , भोकर,धर्माबाद,हदगाव,हिमायतनगर,लोहा,मुखेड,नायगाव व माहूर अशा एकूण ११ तालुक्यांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश असून तालुका निहाय त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पुढील प्रमाणे महान व्यक्तीमत्वांचे नावे देण्यात आले आहेत.१)उमरी-संतकवी दासगणू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरी,जि. नांदेड.२)अर्धापूर -स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मीकांत देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अर्धापूर,जि.नांदेड. ३)भोकर -स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भोकर,जि.नांदेड.४)बिरोली-श्रीधर स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बिलोली,जि. नांदेड.५) धर्माबाद-हुतात्मा गोविंदराव पानसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धर्माबाद,जि.नांदेड.६) हदगाव – वैराग्यमूर्ती दत्ता बापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव,जि.नांदेड.७)हिमायतनगर -महर्षी कपिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,हिमायतनगर,जि.नांदेड.८)लोहा-वीर माधवराव नळगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था,लोहा,जि. नांदेड.९)मुखेड -स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मुखेड,जि.नांदेड.१०) नायगाव -परमवीर चक्र विजेता कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायगाव,जि.नांदेड. ११)माहूर -हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर,जि.नांदेड