भोकर येथील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरातून नांदेडकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकने उड्डाण पुलावर एका दुचाकीला धडक दिली.दि.२६ नोव्हेंबर रोजी रात्री ७:१५ वाजताच्या दरम्यान झालेल्या या भिषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून ट्रक चालकाविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर येथील बहिणीच्या घरी भेट देऊन आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२६ बी.वाय.३८६८ वरुन गावी शेलगाव ता.अर्धापूर येथे जात असलेला पुरभाजी बालाजी आजेगोरे (३४)हा तरुण भोकर शहरातील उड्डाण पुलावर आला असता भरधाव वेगात नांदेडकडे जात असलेल्या एम.एच.४० सी.डी. ३४३१ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिली.या भिषण अपघातात पुरभाजी राजेगोरे हा तरुण त्या ट्रकच्या माघील चाकाखाली आला व त्याच्या शरीराचा आणि डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो जागिच ठार झाला.
सदरील अपघात भोकर शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती व वाहनांची रांग लागली होती.ही माहिती समजताच पो.नि. अजित कुंभार,पो.उप.नि.सुरेश जाधव,जमादार सोनाजी कानगुले,पो.कॉ.प्रमोद जोंधळे व आदी पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि नागरिकांची गर्दी पांगवली.तसेच सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल,बालाजी काळे यांसह आदी तरुणांच्या मदतीने त्या तरुणाचा मृतदेह एका चारचाकी वाहनात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आला.ट्रक चालक घटना स्थळवरुन पसार झाला.पोलीसांनी तो ट्रक ताब्यात घेतला व रात्री उशिरा सदरील अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहेत.