भोकर येथील ऐतिहासिक शिवमंदिरासमोरील सभामंडप जमीनदोस्त करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचं ठरलं…?

नुतन जिल्हाधिकारी तथा महा वारसा समिती अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला हा निर्णय ; परंतू ही कारवाई कोण करणार,कशी व कधी होणार ? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच !
अंबुज प्रहार विशेष-उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर येथील गट क्रं.४५ मधील यादव कालीन पुरातन ऐतिहासिक वारसा शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष इनामी जमीन विक्री करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर २०२४ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले.हे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी व ते अवशेष पुर्ववत उभारण्यात यावेत अशी मागणी ऐतिहासिक वारसा प्रेमी नागरीकांनी विविध प्रकारे केली होती.या अनुषंगाने पुरातत्व विभागाने घटनास्थळाची पाहणी करुन कारवाईस्तव अहवाल सादर केला.यावरुन जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा प्रशासनाने कारवाई संदर्भाने एक पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी भोकर व मुख्याधिकारी नगर परिषद भोकर यांना पाठविले.परंतू यापैकी कोणीही व कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे दि.१९ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी तथा महा वारसा समिती अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी झालेल्या बैठकीत अखेर त्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे ठरले.असे असले तरी हा गुन्हा महसुली व फौजदारी स्वरुपाचा असल्याने या बाबतची रितसर तक्रार कोण करणार याची निश्चिती झाली नसल्याने ही कारवाई नेमकी कोण करणार,कधी व कशी होणार? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे निदर्शनास येत आहे.
भोकर शहराच्या उत्तरेस किनवट महामार्गावरील गट क्रं. ४५ मध्ये यादव कालीन शिवमंदिराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेष अस्तित्वात होते.याबाबदची नोंद नांदेड जिल्ह्याच्या शासकीय गॅझेट मध्ये व ७/१२ च्या उताऱ्यावर आहे. तसेच पुरावाच हवा असेल तर प्रत्यक्षदर्शींची संख्या ही खुप मोठी आहे. सदरील ऐतिहासिक वारसा बाबद लोकप्रिय दैनिक देवगिरी तरुण भारत मध्ये गेल्या २२ वर्षांपूर्वी संपादक उत्तम बाबळे यांचा विशेष लेख प्रसिद्ध झाला आहे.काही लोकांनी त्याठिकाणची इनामी जमीन विक्री करण्याच्या उद्देशाने हा पुरातन वारसा नोव्हेंबर २०२४ मध्ये रातोरात जमीनदोस्त करुन नष्ट केला आहे.ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने दि.३ डिसेंबर २०२४ रोजी ऐतिहासिक वारसा प्रेमी प्रा.डॉ.व्यंकट माने,स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख तथा मंदिर व मुर्ती शास्त्र अभ्यासक प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर कदम देशमुख,संपादक उत्तम बाबळे,सोहम शेट्टे,मॉन्टी ऱ्याकावार यांसह आदींनी तहसिलदार विनोद गुंडमवार आणि पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्याकडे दोषीं विरुद्ध कारवाई करण्यास्तव लेखी तक्रार केली.यावेळी पो.नि. अजित कुंभार यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.तर तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी वरीष्ठांच्या आदेशाने उचित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतू कसलीही कारवाई न झाल्याने दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने साधू,संत,महंत व नागरिकांनी मुक मोर्चा काढून सदरील कारवाई संदर्भाने निवेदनाद्वारे पुन्हा एकदा मागणी केली.
यादव कालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेष जमीनदोस्त केल्याच्या शिर्षकाखाली संपादक उत्तम बाबळे यांनी अंबुज प्रहार न्युज लाईव्ह व दैनिक वीर शिरोमणी मधून अनुक्रमे दि.५ व ७ डिसेंबर २०२४ रोजी बातमी प्रकाशित केली.तभेच अन्य काही वृत्तपत्रांनी देखील बातमी प्रकाशित केली.लोकप्रिय दैनिक देवगिरी तरुण भारत मध्ये गेल्या २२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला विशेष लेख व ते अवशेष जमीनदोस्त झाल्यानंतर प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल नुकतीच बदली झालेले तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली.तसेच पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन घटनास्थळाची पाहणी व चौकशी करुन उचित कारवाई करण्याच्या संदर्भाने अहवाल सादर करण्यास्तव निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या स्वाक्षरीने पत्र दिले.त्या अनुषंगाने पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी पुरातत्व विभाग तज्ञ कर्मचारी,भोकर तहसिलचे कर्मचारी,पोलीस कर्मचारी, दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांच्यासह आदींना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली.यावेळी घटनास्थळाची पाहणी व चौकशी करुन काही पुरावे ही हस्तगत केली.यानंतर उचित कारवाई करण्याच्या संदर्भाने दि.२ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनास अहवाल सादर केला.
हा अहवाल जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाकडे प्राप्त झालेला असतांनाही ‘त्या’ दोषींवर कसलीही कारवाई होत नसल्याने परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी एका शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी नांदेड यांना तक्रारी निवेदन दिले.तसेच घटनास्थळ चौकशी समितीत सहभागी असलेले प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के व दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर च्या काही प्राध्यापक मंडळींनी देखील तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून दि.२० जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना स्मरणपत्र दिले.त्यास अनुसरुन जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी(सामान्य) नांदेड यांच्या स्वाक्षरीने सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड यांनी दिलेल्या अहवालानुसार यादव कालीन शिवमंदिराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेष जमीनदोस्त करुन ऐतिहासिक वारसा नष्ट करणाऱ्या दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व त्या ऐतिहासिक वारसा ची पुनर्बाधणी करण्यात यावी.तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनास द्यावा,असे पत्र दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस अधीक्षक नांदेड,उपविभागीय अधिकारी भोकर व मुख्याधिकारी,नगर परिषद भोकर यांच्या नावे काढले.परंतू उपरोक्तांनी देखील याची दखल घेतली नाही व त्यामुळे कसलीही कारवाई झाली नाही.
नुतन जिल्हाधिकारी तथा महा वारसा समिती अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला हा निर्णय…
नुतन जिल्हाधिकारी तथा महा वारसा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांनी दि.१९ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,उपवनसंरक्षक केशव वाबळे,पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, रूक्मिण रोडगे,डॉ.कामाजी डक,स्वा.रा.ती.म.विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख तथा महा वारसा समिती सदस्य प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांसह वरिष्ठ अधिकारी व जिल्हा वारसा समितीचे सदस्य यांच्या उपस्थित महत्त्वपुर्ण बैठक घेतली.यावेळी भोकर येथील शिवमंदिरा समोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे यादव कालीन पुरातन अवशेष जमीनदोस्त करुन ऐतिहासिक वारसा नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई का केली जात नाही? हा प्रश्न प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांनी मांडला.यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त केले.परंतू अद्याप तरी कारवाई करण्यासंबंधीत कसल्याही हालचाली दिसून येत नाहीत.तसेच ही कारवाई नेमके पोलीस,महसूल किंवा नगर परिषद विभाग प्रशासन यापैकी कोण करणार? याविषयी अद्याप तरी ताळमेळ लागत नसल्याचे बोलल्या जात आहे.
….ही कारवाई कोण करणार,कशी व कधी होणार ? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच !
जिल्हाधिकारी तथा महा वारसा समिती अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी भोकर व मुख्याधिकारी नगर परिषद भोकर यांनी यादव कालीन शिवमंदिराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेष जमीनदोस्त करून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा ज्यांनी केला आहे त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी,असे सुचविले आहे.यामुळे ही कारवाई करण्यासाठी नेमके कोणता विभाग पुढे येणार? याविषयी जाणून घेतले असता असे समजले की,तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील तपास करणे,कायदा,शांतता व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे.त्यामुळे भले ही हा गुन्हा अज्ञातांनी केला आहे,असे म्हटले जात असले तरी तो इनामी जमीन खरेदी व विक्री करण्याच्या उद्देशाने झाला असल्याने त्या जमीनीशी संबंधित असलेले दोषी शोधणे महसूल विभागाचे कर्तव्य आहे.त्या जमीनीच्या ७/१२ वर ज्यांची नावे आहेत त्यापैकी बहुतांश जण हयात नाहीत.परंतू त्यांचे जे वारसदार आहेत व ज्यांनी ती जमीन ताब्यात घेतलेली आहे ‘त्यापैकी’ जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध महसूल विभागाने रितसर तक्रार द्यायला पाहिजे.तर पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालात भोकर नगर परिषदेने हा पुरातन ऐतिहासिक वारसा जपण्यात,विकसित व संरक्षित करण्याबाबद अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवलेला आहे.त्यामुळे हा गुन्हा घडल्याच्या दरम्यानच्या काळातील मुख्याधिकारी व नगर परिषद प्रशासन यास जबाबदार असल्याने सदरील गुन्ह्यात ते देखील सह आरोपी होऊ शकतात व तसे व्हायचे नसेल तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्थातच नगर परिषद प्रशासनाने पुरातत्व विभागाने सुचविलेल्या अपराधिक कलमानुसार व फौजदारी गुन्ह्यास अनुसरून भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यासाठी भोकर पोलीसात रितसर तक्रार द्यायला पाहिजे.तरच महसूल विभाग व नगर परिषद प्रशासनाच्या तक्रारीवरुन पोलीस विभाग पुढील कारवाईस्तव गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करु शकेल.याच बरोबर त्या ऐतिहासिक वारसा ची पुनर्बांधणी होईपर्यंत सदरील जमीन खरेदी,विक्री व आदी व्यवहारासाठी जिल्हा प्रशासन प्रतिबंधित करु शकेल ? असे असले तरी उपरोक्त विभागांच्या अधिकाऱ्यांत कारवाई संदर्भाने ताळमेळ लागत नसल्याचे बोलल्या जात असून ही कारवाई कोण करणार,कधी व कशी होणार ? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या गंभीर गुन्ह्यांत उपरोक्त विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून रितसर तक्रार देण्याबाबत ताळमेळ घातला पाहिजे.तरच कारवाई होऊ शकेल,अशी अपेक्षा ऐतिहासिक वारसा प्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहे.