Thu. Dec 19th, 2024

भोकर तालुक्यातील टवटवीत ‘झेंडूला’ तेलंगणा राज्यात मोठी मागणी

Spread the love

खरीप जोड पीक म्हणून झेंडू फुल शेतीची मला चांगली मदत मिळत आहे-रामेश्वर उल्लेवाड(शेतकरी)

दिवाळी सणाला रोख रक्कम पदरी पडत असल्याने झेंडू फुल शेतीकडे शेतकरी वळत आहे-सुर्यकांत बिल्लेवाड

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप जोड पीक म्हणून यावर्षी जवळपास १ हजार ५०० एकर शेतीत ‘झेंडू’ फुल पिकाची लागवड केली होती.त्यामुळे तालुक्यात झेंडू फुल उत्पादनात वाढ झाली असून ताजी, टवटवीत,पिवळ्या व लाल रंगाच्या या फुलांची दिवाळी सणाच्या अनुषंगाने तेलंगणा राज्यात मोठी मागणी होत आहे.यातून शेतकऱ्यांच्या पदरी काही चांगली रक्कम पडणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

भोकर तालुक्यातील रायखोड शिवारात २०० एकर, नागापूर शिवारात १०० एकर व अनेक गावांत जवळपास १ हजार ५०० एकर शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील जोड पीक म्हणून झेंडू फुल शेती केली आहे.तर काही शेतकऱ्यांनी केळी व हळद या मोठ्या पिकांच्या अंतर्गत पीक म्हणून झेंडू पीक घेतले आहे.परतीचा पाऊस पडून गेला व यात काही शेतकऱ्यांचे नुकसान ही झाले आहे.परंतू त्यानंतर पोषक वातावरण निर्माण झाल्याने व कोणताही रोग न पडल्याने फुल उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.गडद पिवळ्या,लाल रंगाचे,ताजेतवाने,सुंदर व टवटवीत झेंडूची फुले बहरली आहेत. यंदा प्रथमच झेंडूला पोषक वातावरण तयार झाल्याने फुल शेती उत्पन्न वाढले आहे.

सोयाबीनला योग्य भाव मिळाला नसल्याने दसऱ्याच्या दरम्यान बाजारपेठेत मंदी आली होती व त्यामुळे झेंडूला ही योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली होती. परंतू नांदेड जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांच्या स्वागतासाठी झेंडू फुलांच्या  हारांची मागणी वाढली असल्याने फुल खरेदी विक्रीत ही वाढ झाली आहे.तर दीपावलीचा सण ही याच दरम्यान आला असल्याने भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांची झेंडू फुले भोकर सह नांदेड,हिंगोली व परभणी जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जात आहेत.तर तेलंगणा राज्यातील काही व्यापारी शेतात जाऊन झेंडू फुलांची खरेदी करुन तेलंगणा राज्यात नेत आहेत. यावरुन तेलंगणा राज्यात झेंडू फुलांची मोठी मागणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.अतिवृष्टीने नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना ही फुले तारणार असल्याचे ही दिसून येत आहे.

खरीप जोड पीक म्हणून झेंडू फुल शेतीची मला चांगली मदत मिळत आहे-रामेश्वर उल्लेवाड(शेतकरी)
मी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून खरीप पीकांसोबत जोड पीक म्हणून दीड ते दोन एकर शेतात झेंडू फुलांची लागवड करतो. निसर्गाने साथ दिली तर कधी नफा होतो तर कधी घाटा ही होतो.फुल झाडांवर रोग पडू नये म्हणून ३ हजार रूपये किमतीच्या वरील औषधांची फवारणी किमान ३ ते ४ वेळा करतो.मशागत,फुल झाडांची रोपे तयार करणे यावर ही माझा मोठा खर्च होतो.दीड एकर मध्ये साधारणतः दोन ते अडीच टन फुलांची तोडणी दिवाळी दरम्यान होते.नांदेड येथील फुल बाजार पेठेत ही फुले विक्रीसाठी पाठवतो,तर आता तेलंगणा राज्यातील व्यापारी थेट शेतात येऊन फुलं खरेदी करून नेत आहेत.जाग्यावर साधारणतः ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने हे व्यापारी फुले खरेदी करुन नेतात.यात माझा वाहतूक खर्च वाचतो.एकूण खर्च वगळता काही रोख रक्कम पदरी पडत असल्याने मी ही फुल शेती करत आहे,असे मत मौ.नागापूर ता.भोकर येथील शेतकरी रामेश्वर उल्लेवाड यांनी म्हटले आहे.

दिवाळी सणाला रोख रक्कम पदरी पडत असल्याने झेंडू फुल शेतीकडे शेतकरी वळत आहे-सुर्यकांत बिल्लेवाड
अवकाळी पाऊस व आदी नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीन, कापूस यांसह आदी खरीप पीकांचे मोठे हाणी होते व यातून आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशावेळी ऐन सणासुदीच्या काळात रोख रक्कम पदरी पाडणारे जोड पीक म्हणून झेंडू फुल शेतीकडे पाहिले जाते.यामुळेच फुल शेतीकडे शेतकरी वळत आहेत.आमच्या जय किसान हायटेक नर्सरी मधून उत्तम प्रतिचे फळ व फुलांची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात.तसेच लागवडी संदर्भाने माहिती ही दिली जाते.त्यामुळेच माझ्या रायखोड या गावातील शेतकरी ही झेंडू फुल शेतीकडे वळले आहेत.नव्हे तर गाव शिवारातील जवळपास २०० एकरमध्ये येथील शेतकऱ्यांनी झेंडू फुल शेती केली आहे.अशी माहिती माजी उपसभापती तथा प्रगत शेतकरी सुर्यकांत बिल्लेवाड यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !