Fri. Apr 11th, 2025
Spread the love

राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर हे समर्थकांसह लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दि.१६ जानेवारी रोजी समर्थकांची रावणगाव येथील फार्म हाऊसवर एक बैठक घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ‘हात’ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गटात) प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यांच्यासह अनेकजण लवकरच हातावर घड्याळ बांधणार असल्याने त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भोकर तालुका व विधानसभा मतदार संघात मोठी गळती लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.
लोकसभेच्या निवडणूकीत स्व.वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला व या विजयानंतर नांदेड जिल्हा आणि भोकर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे बोलल्या गेले.परंतू भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली गेली व राजकीय समिकरण बदलले आणि त्यानंतर झालेल्या भोकर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक व विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र झाली असता यात नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला.तर भोकर विधानसभा मतदार संघातून ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण या विजयी झाल्या. नियोजनाचा अभाव व तेलंगणा राज्यातून आलेल्या लक्ष्मी प्रसादाच्या वाटपात घोळ झाल्यानेच राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर हे पराभूत झाल्याची चर्चा सुरू झाली आणि तेंव्हापासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत हेवेदावे,धुसफूस सुरू झाली.यामुळे सर्वप्रथम कंत्राटदार दादाराव पाटील ढगे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत(अजित पवार गट) प्रवेश केला. पक्षातील रुसवे फुगवे व नाराजीचा सूर वाढत गेल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर हे देखील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली.
अखेर दि.१६ जानेवारी २०२५ रोजी रावणगाव येथील त्यांच्या फार्म हाऊसवर समर्थकांची एक बैठक घेतली व या बैठकीत सर्वानुमते राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय होताच त्यांच्यासह जवळपास २० जणांनी पक्ष पदाच्या जबाबदारीचा राजीनामा वरीष्ठांकडे सुपूर्द केला असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच लवकरच ते व असंख्य समर्थक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.यामुळे भोकर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागणार असून ही गळती थांबविण्यासाठी खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांना मोठे श्रम घ्यावे लागणार असल्याची चर्चा अनेकांतून होत आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेकांचा प्रवेश होत असल्याने भोकर विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय समिकरणे बदलण्याची ही शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !