भोकर पोलीसांनी पकडली जीवघेणी रसायन मिश्रीत अवैध शिंदी
अवैध शिंदी विक्रेत्या दोघांना ताब्यात घेऊन ४३ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरात अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन येत असलेली रसायन मिश्रीत शिंदी भोकर पोलीसांनी दिवशी बु. चौक ता.भोकर येथे दि.२८ मे रोजी पकडली असून त्या अवैध शिंदी विक्रेत्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील ४३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर शहरातील अनेक ठिकाणी रसायनमिश्रीत बनावट सिंधीची अवैध विक्री होत असल्यामुळे अनेक नागरिकांसह अगदी शाळकरी विद्यार्थी देखील व्यसनाधीन झाले आहेत.या गंभीर प्रकारामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.याबाबद अनेकांतून रोष व्यक्त केला जात आहे.भोकर तालुका हा तेलंगाना राज्य सीमेवर असल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावात तेलंगाना राज्यातून आणलेली अवैध सिंधी विक्री केल्या जाते,तर त्याच सिंधीच्या नावाखाली रसायन मिश्रीत बनावट सिंधी तयार करून ही विक्री केल्या जाते. भोकर शहरात ही अशाच प्रकारे रसायन मिश्रीत शिंदीची अवैध विक्री होत असल्याने अनेक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी देखील व्यसनाधीन झाले आहेत.उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी वाढत्या तक्रारींची दखल घेऊन यापुर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून रसायनमिश्रित सिंधी व अवैध दारू जप्त केली होती,परंतू पुन्हा एकदा अवैध शिंदी विक्रेत्यांनी डोके वर काढले असल्याने पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी त्यावर आळा घालण्याची मोहीम हाती घेतली आहे.
याच अनुषंगाने दि.२८ मे २०२४ रोजी पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी लक्षटवार व पो.कॉ. नामदेव शिरोळे यांनी सापळा रचून तेलंगणा राज्यातून भोकर मध्ये अवैध विक्री करण्यासाठी एका दुचाकी वरुन घेऊन येत असलेली रसायन मिश्रीत शिंदी दिवशी बु.चौक ता.भोकर येथे पकडली.अवैध शिंदी घेऊन येत असलेल्या त्या दुचाकी स्वारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रविण कल्याण क-हाळे व शेख सुलेमान उर्फ पप्पू शेख युनूस असे त्यांची नावे असून दोघे ही रा.शेख फरिद नगर भोकर येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यांच्या जवळील अंदाजे ३ हजार रुपये किंमतीची अवैध शिंदीची १५० पॉलिथिन पाकीटे भरलेली दोन पोते व ४० हजार रुपये किंमतीची एम.एच.२६ सी.टी.२७६३ क्रमांकाची स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.तसेच गु.र.नं.१५८/२०२४ कलम ६५(इ) प्रमाणे उपरोक्त दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार बालाजी लक्षटवार हे करत आहेत.