निवडणूक बंदोबस्तात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या भोकर पोलीसांचा पो.नि.अजित कुंभार यांनी केला सत्कार
श्री गणेशोत्सव,श्री नवरात्रोत्सव व निवडणूक बंदोबस्तामुळे दसरा,दिवाळी सण कुटूंबियात साजरा करता न आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन पाठीवर शाब्बासकीसह दिली मायेची थाप
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक या अनुषंगाने रजा, साप्ताहिक सुट्या रद्द करुन २४ तास ‘ऑनड्युटी’ राहून कठोर परिश्रम घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरम्यानच्या काळात दसरा आणि दिवाळी सारखे सण देखील कुटूंबियात साजरे करता आले नाहीत. असे असतांनाही कर्तव्यास प्रथम प्राधान्य देऊन कायदा, शांतता,सुरक्षा व सुव्यवस्थेसाठी कठोर परिश्रम घेऊन निवडणूक सुरळीतपणे पार पाडल्याने भोकर पोलीस ठाण्याचे कुटूंब प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी आपले सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन पाठीवर शाब्बासकीसह मायेची थाप दिली आहे.
ज्या शासकीय कार्यालयांचे दार कधीच बंद केलेले नसते व २४ तास ‘ऑनड्युटी’ असते असा विभाग म्हटलं की,पोलीस विभागाचे नाव समोर येते.यावर्षी सदरील विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेली काही महिने सलग बंदोबस्तात कठोर परिश्रम घ्यावे लागले आहेत.श्री गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर लगेच राज्यातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आणि रजा,साप्ताहिक सुट्या रद्द करुन पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रुजू व्हावे लागले.याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर रहावे लागले.विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्याचे लक्ष असलेला विधानसभा मतदार संघ म्हणजे भोकर विधानसभा मतदार संघ होय.महत्वाचे म्हणजे या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे, परंतू मनुष्यबळ मात्र खुपच कमी.६ अधिकारी व केवळ ४४ कर्मचारी असलेले हे पोलीस ठाणे.त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सर्वात अधिक ताण तणाव असणारच हे साहजिकच आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व भोकर विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक लागली व भोकर पोलीसांचा दसरा,दिवाळी सण निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत गेला आहे.भोकर पोलीसांच्या रजा,साप्ताहिक सुट्या दि.२५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत व सर्वांना कर्तव्यावर हजर रहावे लागले.त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसमवेत दसरा,दिवाळी सणात सहभागी होता आले नाही आणि कुटुंब प्रमुखाशिवाय कुटूंब सदस्यांना हे सण साजरे करवे लागले.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलीस बंदोबस्तात व्यस्त होते.थोड्या दिवसाची विश्रांती मिळाली व पुन्हा श्री गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामुळे पोलीसांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावे लागले.यातून बाहेर पडणार असे वाटत असतांनाच विधानसभा निवडणुकीचा धमाका याच दरम्यान सुरू झाला.निवडणूक म्हटली की,उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलीसांना दक्ष राहावे लागते. कायदा,शांतता,सुव्यवस्था व सुरक्षा कायम ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांना रात्रंदिवस सज्ज राहावे लागते.यंदा तर दसरा,दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक या दोन्हीकडे पोलीस यंत्रणेला लक्ष द्यावे लागले आहे.दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली व अगदी थोडासा विश्रांतीचा श्वास घेता आला.यानंतर लगेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर चे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे,उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे,महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड,पो.उप.नि.राम कराड,पो.उप.नि.सुरेश जाधव,पो.उप.नि.केशव राठोड,सहा. पो.उप.नि.संभाजी देवकांबळे,संभाजी हनवते,सोनाजी कानगुले,जमादार नामदेव जाधव,जमादार बोंडलेवाड,जमादार अंधारे,पो.ना. सय्यद मोईन,गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर,पो.कॉ. जी.एन.आरेवार,पो.कॉ.प्रमोद जोंधळे,चंद्रकांत आरकिलवार, यांसह एकूण ६ पोलीस अधिकारी आणि ४४ पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त कर्तव्य बजावले.त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करुन पाठीवर शाब्बासकी व मायेची थाप देणे गरजेचे असल्याने पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करुन पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.तर आज दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी असून निकालानंतरच्या राजकीय जल्लोषानंतरच या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तातून थोडी सुटका मिळणार आहे.कुटूंबिय,घरदार सोडून कठोर कर्तव्य बजावणाऱ्या या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार न्युज लाईव्ह परिवाराच्या वतीने ही खुप खुप हार्दिक अभिनंदन!