ग्राहकांच्या नोंदी अद्यावत न ठेवणाऱ्या लॉज मालकांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अनेक तक्रारी येत असल्याने पुर्व सुचनापत्र (नोटिस) देऊनही ग्राहकांच्या नोंदी अद्यावत ठेवल्या नसल्याचे भोकर पोलीसांना तपासणीत ३ ग्राहक (प्रवासी)आढळून आल्याने दि.३ जुलै रोजी भोकर बस स्थानक परिसरातील न्यु.डी.एस. पी.लॉजच्या मालकासह त्यांच्या दोन मुलांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की,भोकर शहरात ३ लॉज व शहराबाहेर १ रिसोर्ट आणि काही धाबे आहेत.सदरील ठिकाणी विश्रांती व मुक्कामासाठी राहणाऱ्या ग्राहकांची(प्रवाश्यांची) ओळख नोंद नोंदवहित सबळ ओळखपत्रासह असणे बंधनकारक असते.परंतू भोकर बस स्थानक परिसरातील न्यु.डी.एस.पी.लॉज येथे विश्रांती व मुक्कामी राहणाऱ्या ग्राहकांची (प्रवाश्यांची) तशी नोंद ठेवली जात नसल्याच्या काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या.त्या अनुषंगाने दि.३० जून २०२४ रोजी भोकर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे व अन्य काही पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यु.डी. एस.पी.लॉज ची तपासणी केली असता एका खोलीत असलेल्या ग्राहकाची(प्रवाश्याची)नोंद वहित कसलीच ओळख नोंद घेतली गेली नसल्याचे निदर्शनास आले होते.यामुळे ग्राहकांची(प्रवाश्यांची) ओळख नोंद नोंदवहीत अद्यावत ठेवण्यात यावी म्हणून कलम १४९ प्रमाणे नोटीस (पुर्वसुचनापत्र) लॉज मालक गोविंद देवराव सोळंके पाटील यांना बजावण्यात आली होती.
परंतू सदरील लॉज मालकास पुर्वसुचनापत्र(नोटीस) बजावून देखील ग्राहकांच्या(प्रवाश्यांच्या) ओळख नोंदी नोंदवहित ठेवत नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने दि.३ जुलै २०२४ रोजी गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर, जमादार सोनाजी कानगुले,पो.कॉ. प्रमोद जोंधळे,महिला पो.कॉ.सिमा वच्चेवार, महिला पो.कॉ.पवार यांसह आदींचा सहभाग असलेल्या पोलीस पथकाने न्यु.डी.एस.पी. लॉज ची तपासणी केली. यावेळी खोली क्र.५, ७,व ८ मध्ये प्रत्येकी १ आणि त्यांच्या सोबत एक असे प्रवासी आढळून आले.या प्रवाश्यांची ओळख नोंद नोंदविहित घेतली आहे काय ? असे विचारण्यात आले व तपासणी केली असता ओळख नोंद घेतली नसल्याचे व तेथे नोंदवही देखील नसल्याचे निष्पन्न झाले.यावरुन लॉज मालक गोविंद देवराव सोळंके पाटील,त्यांचा मुलगा गजानन गोविंद सोळंके,कैलास गोविंद सोळंके,सर्वजण रा.भोकर यांना ताब्यात घेऊन भोकर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तसेच ग्राहकांची(प्रवाश्यांची) ओळख नोंद नोंदवहीत अद्यावत ठेवण्यात आली नसल्याची तक्रार गोपनीय शाखेचे पो.कॉ. परमेश्वर गाडेकर यांनी दिल्यावरुन गुरनं १९९/२०२४ भारतीय न्याय संहिता २२३,३(५) प्रमाणे उपरोक्त उल्लेखित लॉज मालक व त्यांचे दोन मुले अशा एकूण तिघांविरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार सोनाजी कानगुले हे करत आहेत.