भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने विनयभंग प्रकरणी रायखोडच्या तरुणास दिली १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : १७ वर्षीय युवतीचा सतत पाठलाग करुन तु मला खुप आवडते व मला तुला बोलायचे आहे म्हणून त्रास देणाऱ्या सतिश ऊर्फ रामकिशन भंडरवाड,रा. रायखोड ता.भोकर या तरुणा विरुद्धचा विनयभंगाचा गुन्हा सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने दि.१५ मार्च २०२५ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,भोकर चे जिल्हा न्यायाधीश १- वाय.एम.एच.खरादी यांनी त्यास १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
आई वडील शेताकडे व भाऊ भोकर येथे कॉलेजसाठी गेलेले असल्याने आणि घरी एकटीच असल्याने एक १७ वर्षीय युवती घराचे दार बंद करुन घरात इयत्ता १० वीचे पेपर वाचत बसली असतांना तिच्या घरा शेजारील सतिष व्यंकटी भंडरवार(२२) रा. रायखोड ता.भोकर हा तरुण दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान तिच्या घरासमोर आला व तिला हाक मारून म्हणाला की,तु दार काढ मला तुला बोलायचे आहे,मला तु आवडतेस.असे म्हणून तो एवढ्यावरच थांबला नाही तर दार उघडं म्हणत दारावर लाथा मारल्या.जवळपास ५ ते १० मिनीटे तो दार वाजवत होता.परंतू ती एकटीच असल्याने व गल्लीत कोणीही नसल्याने भितीमुळे तिने दार काढले नाही.तेव्हा तो तु घरी कोणाला सांगितलीस तर तुझा जीव काढतो म्हणून धमकी देऊन निघुन गेला.
रात्री ७:०० वाजताच्या दरम्यान तिचे आई वडिल शेतातुन घरी आले असता तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.त्यावेळी तिचे आई वडिल हे सतिश भंडरवार च्या घरी गेले असता तो तेथून पळुन गेला.यावेळी त्यांनी सतिश भंडरवार च्या आई वडिलांना विचारले की,तुमचा मुलगा आमच्या घरी का आला होता? यावर त्यांनी म्हटले की,तो असाच आगाऊ आहे,आम्ही त्याला समजावून सांगतोत.पिडीत युवतीचे आई वडील घरी परत आल्यानंतर तिने त्यांना सांगितले की,सतिष भंडरवाड हा ब-याच वेळेस रस्त्याने जाताना येतांना तिच्या पाठीमागे येवुन तुला बोलायचे आहे,असे म्हणून वाईट उददेशाने सतत पाठलाग करीत आहे.हे ऐकून झाल्यावर पिडीत मुलंगी,तिचे आई वडिल व भाऊ यांनी भोकर पोलीस ठाण्यात येऊन दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री पिडीत युवतीने सतिश उर्फ रामकिशन भंडरवाड विरुद्ध रितसर तक्रार दिली.यावरुन गु.र.नं. २७६/२०१९ कलम ३५४ (ड),५०६ भा.द.वि. व सह कलम ११ (४),१२ पोक्सो कायदा प्रमाणे विनयभंग केल्याचा गुन्हा भोकर पोलीसात नोंदविण्यात आला.सदरील गुन्ह्याचा सखोल तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुनम सुर्यवंशी यांनी केला व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र दाखल केले.
दरम्यानच्या काळात सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर चे जिल्हा न्यायाधीश १- वाय.एम. एच.खरादी यांच्या समोर झाली.त्यामध्ये पोलीसांनी केलेला तपास व सरकारी वकीलानी तपासलेल्या महत्वाच्या साक्षीच्या आधारे आरोपी सतिष उर्फ रामकिशन व्यंकटी भंडरवार हा दोषी ठरला. यामुळे मा.न्यायाधीशांनी दि.१५ मार्च २०२५ रोजी कलम ३५४ (ड)अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व ५००/- रूपये दंड, तसेच कलम ८,१२ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व ५००/- रूपये दंड, अशा प्रकारे १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.अशी शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.सौ.अनुराधा रेडडी (डावकरे ) यांनी भक्कमपणे बाजू मांडली.तसेच त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी फिरोजखॉन पठाण यांनी खटल्या दरम्यानच्या काळात सहकार्य केले.