Wed. Dec 18th, 2024

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस भोकर जिल्हासत्र न्यायालयाने दिली ७ वर्षाची कठोर शिक्षा

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पैशाची मागणी करुन सतत मानसिक व शारीरिक छळ करुन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा भोसी ता.भोकर येथील पती सबळ पुराव्यानिशी दोषी ठरल्याने दि.५ एप्रिल रोजी भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश-१ वाय.एम.एच.खरादी यांनी त्यास ७ वर्षाची कठोर शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

सविस्तर असे की,सलीम जमालसाब पिंजारी(३२) रा.भोसी ता.भोकर जि.नांदेड हा त्याची पत्नी महंमदी हिस ऑटोरिक्षा घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत मारहाण करुन,उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ करायचा.त्याच्या या छळास कंटाळून एकूण दिवशी ती मुलांसह मराठ गल्ली,मुदखेड येथे माहेरी गेली होती.याच अनुषंगाने सलीम पिंजारी हा दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २:०० वाजता दरम्यान सासरी मुदखेड येथे गेला व सासू बिसमिल्ला बी शादुला पिंजारी(६०) रा.मराठ गल्ली मुदखेड हिस म्हणाला की,तुम्ही मला ऑटोरिक्षा खरेदी करण्यासाठी ५० हजार रूपये कधी देणार आहात ? यावेळी सासूने सांगितले की सद्या आमच्याकडे पैसे नाहीत.हे सांगताच सलीम पिंजारीस राग आला व त्याने पत्नी महमंदी हीस भोसी येथे मी घेऊन जातो म्हटले.यावेळी सासूचे नकार दिला,परंतू तिचे न ऐकता त्याने पत्नी व मुलांना तेथून सोबत घेतले आणि मुदखेडहून भोसी ता.भोकर तेथे जाण्यासाठी निघाला.रस्त्यात सासरा भेटला व त्यांनी देखील मुलीस नेऊ नका म्हणून विनवणी केली.परंतू सासऱ्याचेही काही एक न ऐकता पत्नी व मुलांना घेऊन तो भोसी ता.भोकर येथे गावी गेला.

गावाकडे गेल्यावर सलीम पिंजारी ने परत पत्नी महंमदीस तू माहेरहून ५० हजार रुपये का घेऊन आली नाहीस म्हणत उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ दिला.हा अपमान व छळ सहन न झाल्याने दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास पत्नी महंमदी ने घरातील टीन पत्र्याच्या खालील लाकडास काळ्या रंगाच्या ओडणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदरील प्रकरणी सासू बिसमिल्ला बी शादुला पिंजारी(६०) रा.मराठ गल्ली मुदखेड यांनी भोकर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन सलीम पिंजारी विरूद्ध गु.र.न.४६३/२०२२ कलम ३०४ ब, ४९८ अ,भा.द.वि.प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील गुन्ह्याचा सखोल तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे यांनी करुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

दरम्यानच्या काळात सदरील खटल्याची सुनावणी वाय.एम. एच.खरादी मा.जिल्हा सत्र न्यायाधीश १ यांच्या समोर झाली. त्यामध्ये पोलीसांनी केलेला सखोल तपास,अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.सौ.अनुराधा रेडडी (डावकरे) व आरोपीचे वकील यांच्यातील झालेल्या युक्तीवादाअंती तपासलेल्या महत्वाच्या भक्कम साक्षीच्या आधारे सरकारी वकीलांनी दाखल केलेल्या लेखी युक्तीवादातील सबळ पुरावे,तसेच सदरील खटल्यास अनुसरून मा.उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे हे आरोपी सलीम पिंजारी विरूद्ध गेले.यावरुन सलीम पिंजारी हा पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मा.न्यायाधीश -१ वाय.एम.एच.खरादी यांनी आरोपी सलीम जमालसाब पिंजारी यास दि.५ एप्रिल २०२४ रोजी ७ वर्ष कठोर शिक्षा,१० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त वाढीव शिक्षा, अशी एकूण ७ वर्षाची कठोर शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.तर सदरील खटल्याच्या दरम्यान न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून जमादार फिरोजखॉन पठाण व ए.जी.पी.कार्यालयाचे लिपीक मारोती अटकोरे यांनी मदत केली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !