भगवान श्रीकृष्ण वाचनालय भोकर येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्मार्टफोनच्या डिजिटल आभासी जगतात ग्रंथ वाचन संस्कृती लोप पावत असल्याने वाचनाची सवय व आवड निर्माण होण्याच्या हेतूने ग्रंथालयांच्या माध्यमातून राज्य शासन विविध उपक्रम राबवित असून भोकर येथील भगवान श्रीकृष्ण वाचनालयात दि.१४ जानेवारी रोजी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
भगवान श्रीकृष्ण वाचनालय भोकर येथे मंगळवार,दि.१४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २:०० ते ५:०० यावेळेत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन केले असता वाचनालय परिसरातील महिला,पुरुष व वाचन प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.सदरील वाचनालयात विविध प्रकारचे जवळपास २३ हजार ग्रंथ व वृत्तपत्र उपलब्ध आहेत.यावेळी उपस्थितांनी अनेक ग्रंथाचे वाचन केले.तसेच भागवताचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे यांनी वाचन वृत्ती वाढावी या अनुषंगाने प्रबोधन पर विचार मांडले.याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिलेल्या श्रीमती अलकाताई अंकुळनेरकर यांनी लहान मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी विशेषतः आईने काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
आठवड्यातुन एकदा तरी मुलामुलींना घेऊन वाचनालयात येणे महत्त्वाचे आहे.कारण सदरील वाचनालयाकडून दर महिन्याला एका सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.तसेच शालेय विद्यार्थ्यांना हे वाचनालय मोफत सेवा देत असून नागरीकांनी देखील शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिपक कपाटे यांनी केले आहे.तर वाचन प्रिय नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वाचनालय व्यवस्थापन समिती व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.