Sun. Dec 22nd, 2024

भोकर मध्ये एटीएम मशीनचे कॅश डीस्पेंसर उघडून पैसे चोरी करण्याचा झाला प्रयत्न

Spread the love

याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध भोकर पोलीसात झाला गुन्हा दाखल

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील बस स्थानक रस्त्यावरील एका व्यापारी गाळ्यात असलेल्या इंडिया -१ एटीएम मशीनचे कॅश डीस्पेंसर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न एका तरुणाने दि.१९ जुलै रोजी केला आहे.हे करतांना त्याने एटीएम मशीनचे १ लाख रुपयांचे नुकसान केले असून याप्रकरणी ‘त्या’ तरुणाविरुद्ध भोकर पोलीसात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

भोकर शहरातील बस स्थानक रस्त्यावर श्रीमती सुलोचना माधवराव ढोले यांचे व्यापारी गाळे आहेत.यातील एका गाळ्यात इंडिया -१ कंपनीचे चे एटीएम आहे.सदरील एटीएम मध्ये दि.१९ जुलै २०२४ रोजी रात्री ८:०० ते ८:३० वाजताच्या दरम्यान एक तरुण गेला व मांडी घालून खाली बसून एका स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम मशीन चे स्क्रु खोलू लागला.याच दरम्यान गाळे मालक आनंद माधवराव ढोले हे जेवन करून घरा बाहेर आले असता त्या एटीएम मध्ये एक तरुण खाली बसून एटीएम मशीन चे स्क्रु खोलत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.सदरील तरुणाची वर्तणूक संशयास्पद वाटत असल्याने आनंद ढोले यांनी आत जाऊन पाहिले.यावेळी सदरील एटीएम मशीनचे कॅश डीस्पेंसर उघडून पैसे काढण्याचा प्रयत्न तो तरुण करत असल्याचे दिसले.आनंद ढोले यांनी त्या तरुणास तु कोण आहेस व हे काय करत आहेस असे विचारले असता त्याने सोमेश नामदेव राठोड(२६)वय रा.वसंतनगर तांडा गोरठा ता.उमरी जि.नांदेड असे त्याचे नाव असल्याचे सांगितले. परंतू तो काय करत होता हे मात्र सांगितले नाही.यामुळे आनंद ढोले यांनी काही नागरिकांच्या मदतीने त्यास पकडून ठेवले व भोकर पोलीसांना याविषयीची माहिती दिली.यावरुन पो.नि.सुभाषचंद्र मारकड,जमादार नामदेव जाधव,पो. कॉ.चंद्रकांत आरकिलवार,जीप चालक पो. कॉ.पंकज हनवते हे तात्काळ घटनास्थळी पोहचले.त्या तरुणास ताब्यात घेतले व एटीएम ची पाहणी केली.यावेळी एटीएम मशीनचे कॅश डीस्पेंसर,लॉक व समोरच्या दरवाजाचे नुकसान झाल्याचे आणि समोरील काच फोडल्याचे निदर्शनास आले.एटीएम मशीनचे जवळपास १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. उपरोक्त मजकुराच्या आशयानुसार आनंद माधवराव ढोले यांनी फिर्याद दिली.यावरुन सोमेश नामदेव राठोड या तरुणाविरुद्ध गुरनं २४९/२०२४ कलम ३०३(२),६२, ३२४(४),(५) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे चोरीचा प्रयत्न केल्याचा भोकर पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्या तरुणाचा एटीएम मधून पैशाची चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास जमादार नामदेव जाधव हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !