भोकरचे वैभव असलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी-खा.अशोक चव्हाण
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : केंद्र व महाराष्ट्र राज्य शासन निराधारांना हक्काचे पक्के घरे देत आहे.असे असतांना मंदिरांसारख्या सार्वजनिक धार्मिक स्थळांना कोणीही पाडण्यासाठी हात लावू शकत नाही. श्रीकृष्ण ज्ञान मंदीर हे भोकर चे वैभव आहे.त्यामुळे सदरील मंदीरा संबंधीत काहीही समस्या पुढे आल्यास त्या सोडविण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील,असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांनी मंदीराचे मुख्य विश्वस्त महंत प्रभाकर कपाटे महाराज व शिष्टमंडळास दिले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,भोकर च्या जागे शेजारी भव्य असे श्रीकृष्ण ज्ञान मंदीर आहे.महंत प्रभाकर कपाटे महाराज यांनी भाविक,भक्त व नागरिकांच्या योगदानातून मोठ्या परिश्रमाने हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर ट्रस्ट उभारले आहे. तसेच मंदीर ट्रस्ट च्या माध्यमातून अनेकांच्या ज्ञानाची भूक भागविण्यासाठी त्यांनी एक सार्वजनिक वाचनालय ही येथे उभे केले आहे.सदरील मंदीराच्या विश्वस्तांना नुकतीच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भोकर च्या संबंधितांनी एक नोटीस पाठवून नको तो वाद घालून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.यासह आदी समस्यांच्या निवारणासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची नांदेड येथील निवासस्थानी मंदीराचे विश्वस्त महंत प्रभाकर कपाटे महाराज, सभापती जगदीश पाटील भोसीकर,भाजपाचे भोकर प्रभारी भगवान दंडवे,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे, सुहास पवार यांसह १०० पेक्षा अधिक महिला,पुरुष,युवक व भाविक भक्तांचा समावेश असलेल्या एका जंबो शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली.
यावेळी महंत प्रभाकर कपाटे महाराज यांनी व शिष्टमंडळातील सहभागींनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भोकर चे संबंधित अधिकारी व आदी लोक देत असलेल्या नाहक त्रासाविषयीच्या समस्या खासदार अशोक चव्हाण यांना सांगितल्या.शिष्टमंडळाचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर खा.अशोक चव्हाण म्हणाले की,मंदिराच्या बाबतीत येत असलेल्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मी समर्थपणे उभा आहे.याच बरोबर आपल्या मतदार संघाच्या आमदार ॲड.श्रीजया चव्हाण या देखील सदरील समस्या सोडविण्यासाठी आपल्या सोबत आहेत.हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून ते सामाजिक सेवा करणारे भोकर येथील एकमेव ठिकाण आहे. येथे सर्व समाजातील मुला मुलींना व वृद्धांना आधार देऊन त्यांची सेवा केली जाते.अशा संतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.आपल्या मंदिराचा सर्वोतोपरी विकास करायचा आहे.म्हणूनच मी स्वतः राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मंदिराच्या जागेचा प्रश्न सोडविला आहे.आपण लोक वर्गणीतून उभारलेले हे जन सेवेचे मंदिर व वाचनालय भोकर चे वैभव आहे.सदरील मंदिराच्या विकासासाठी जेथे अडचणी येतील तेथे आम्ही तुमच्या सोबत असून शासन ही पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे.त्यामुळे महंत प्रभाकर कपाटे महाराज व सर्वांनी कसलीही चिंता करु नये,असे त्यांनी शिष्टमंडळास आश्वस्त केले.
तसेच यापुढे तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.माझे कार्यकर्ते मी आपल्या सोबत देतो. कोणतीही अडचण व समस्या आल्यास मला,आमच्या कार्यकर्त्यांना कळवावे किंवा फोनद्वारे संपर्क साधावा.कपाटे बाबा आपण उगीच त्रास घेऊ नका,आपली उर्जा ही महत्वाची असून ती युवकांना मार्गदर्शन व संघटीत करण्यासाठी वापरावी,असे ही ते म्हणाले.याचबरोबर जगदीश पाटील भोसीकर,भगवान दंडवे,गणेश पाटील कापसे,सुहास पवार यांनी सदरील समस्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे,अशा सुचना ही त्यांनी उपरोक्तांना दिल्या.