Thu. Jan 9th, 2025

पुरातत्व विभागाने भोकर येथील ‘ऐतिहासिक अवशेष’ जमीनदोस्त केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना केला सुपूर्द

Spread the love

हा ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ जतन करण्यात भोकर नगरपरिषद ठरली असमर्थ ! अहवालात ठेवण्यात आला आहे ठपका…

आता प्रतिक्षा ठोस कारवाईची ; शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ऐतिहासिक पुरातन अवशेष जमीनदोस्त करणाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याकडे लागले आहे अनेकांचे लक्ष !

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर येथील शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष’ जमीनदोस्त करुन नष्ट केल्याच्या बातम्या आम्ही प्रकाशित केल्या होत्या.त्या बातम्यांच्या संदर्भाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय महावारसा समिती,जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड यांनी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड यांना घटनास्थळाची पाहणी व चौकशी करुन योग्य त्या कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.त्या अनुषंगाने सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड यांच्या पथकाने भोकर येथील ‘त्या’ स्थळाची पाहणी व चौकशी केली असून सदरील अहवाल दि.२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय महावारसा समिती,जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड यांना सुपूर्द केला आहे.त्यामुळे आता ठोस कारवाई होण्याची प्रतिक्षा असून शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष’ जमीनदोस्त करणाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.तसेच सदरील ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ जतन करण्यात भोकर नगरपरिषद असमर्थ ठरली असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर शहर व तालुक्यात यादवकालीन ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ दर्शविणारे काही मंदिर आणि अवशेष आहेत.त्यापैकीच एक ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ म्हणजे ‘शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष होते. भोकर शहराच्या उत्तरेस भोकर-किनवट रस्त्यावर किनवटकडे जातांना डाव्या बाजूस असलेल्या गट क्रमांक ४५ मधील इनामी जमिनीत यादवकालीन शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ऐतिहासिक पुरातन अवशेष उभे होते.तसेच भोकर येथील यादवकालीन ही वास्तू जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा सांगणारे ठिकाण असून,नांदेड जिल्हा गॅझेटिअरमध्ये हा कलावंतीणीचा महाल प्राचीन दगडी बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे म्हणून नोंदविलेले आहे. याच परिसरात किनवट रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या इनामी जमिनीत सन २००३ मध्ये शेततळे खोदत असतांना कोरीव व रेखीव दगडी शिळा रचून बांधण्यात आलेले एक तलाव सापडले होते. यावेळी तो तलाव व त्या दगडी शिळा नष्ट करण्यात आल्या होत्या.यासंबंधी तत्काली संपादक उत्तम बाबळे यांनी लिहिलेले विशेष वृत्त लोकप्रिय दैनिक देवगिरी तरुण भारत ने प्रकाशित केले होते.यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये यादवकालीन शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे उभे असलेले ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष’ अचानकपणे जमिनदोस्त करुन नष्ट करण्यात आले आहे.सदरील गंभीर कृत्यामुळे ऐतिहासिक वारसा प्रेमींच्या भावना दुखावल्या.त्यामुळे प्रा.डॉ.व्यंकट माने,प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के,संपादक उत्तम बाबळे,साईदास माळवंतकर यांसह आदींनी ही बाब भोकरचे तहसिलदार व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.तसेच तो ऐतिहासिक वारसा नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन तो ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ पुर्ववत उभारण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दि.३ डिसेंबर २०२४ रोजी महसूल व पोलीस प्रशासनास एका शिष्टमंडळाने दिले होते.सदरील शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष जमिनदोस्त’ केल्या संदर्भाने संपादक उत्तम बाबळे यांनी अंबुज प्रहार न्युज लाईव्ह आणि लोकप्रिय दैनिक वीर शिरोमणी या वृत्तपत्रातून अनुक्रमे दि.५ डिसेंबर व ७ डिसेंबर २०२४ रोजी बातम्या प्रकाशित केल्या. याच बरोबर अन्य दोन वृत्तपत्रांनी देखील बातम्या प्रकाशित केल्या होत्या.

२१ वर्षांपूर्वी दैनिक देवगिरी तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले उत्तम बाबळे यांचे विशेष वृत्त,अंबुज प्रहार न्युज लाईव्ह व दैनिक वीर शिरोमणी आणि अन्य दोन वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांची नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय महावारसा समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी गंभीरपणे दखल घेतली.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन या यादवकालीन शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचा ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष जमीनदोस्त’ या मथळ्याखाली वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा संदर्भ देऊन बातमीमध्ये असलेल्या नमुद बाबींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करावी. घटनास्थळाची पाहणी करावी,तसेच कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करुन अनुपालन अहवाल त्वरीत या कार्यालयास सादर करावा.असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांचे पत्र क्र. २०२४/मशाका-१/ डेस्क-२/पुरातत्व /कावि दिनांक/१२/ २०२४,सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग नांदेड यांना देण्यात आले होते.या पत्राच्या संदर्भाने अमोल ना.गोटे(सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग नांदेड) यांच्या पथकाने भोकर येथील महसूल,पोलीस कर्मचारी व दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक यांच्या उपस्थितीत दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी त्या ‘यादवकाली शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा‌ कालावंतीणीच्या महालाचे ‘ऐतिहासिक पुरातण अवशेष जमीनदोस्त’ करण्यात आलेल्या स्थळाची पाहणी आणि चौकशी केली.तसेच सदरील पाहणी व चौकशीचा आणि योग्य कारवाईसाठीचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय महावारसा समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत दि.२ डिसेंबर २०२५ रोजी सुपूर्द केला आहे.
सदरील अहवालात भोकर येथील यादवकालीन ही वास्तू जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा सांगणारे ठिकाण असून,नांदेड जिल्हा गॅझेटिअरमध्ये कलावंतीणीचा महाल हा प्राचीन दगडी बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे म्हणून नोंदविलेला आहे. भोकर शहराच्या उत्तरेस असलेल्या गट क्रमांक ४५ ची पाहणी करण्यात आली असून सदरील पाहणीमध्ये साधारण ०.८० हेक्टर परिसरामध्ये विखुरलेल्या अवस्थेमध्ये यादवकालीन अवशेष आढळून आले आहेत व या मंदिराच्या अवशेषांमध्ये मंदिराच्या वितानाचा भाग,स्तंभाचे तुकडे,एक कलात्मक शिळा,स्तंभ शिर्षाचा भाग व मंदिराचे अनेक विखुरलेले अवशेष त्या परिसरामध्ये आढळून आले आहेत.संबंधित शेतकऱ्याने जमिन सपाटीकरण करतांना या मंदिराचे अवशेष जेसीबीच्या सहाय्याने या परिसरामध्ये असलेल्या तलावाकडे आणलेले दिसून येत आहेत.तसेच तलावाच्या परिसरात बरेच मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत.तर बरेच अवशेष मलब्याखाली दबलेली आहेत.असे नमुद करण्यात आले आहे.या सर्व उपलब्ध अवशेषांचे छायांकन करण्यात आले असून पोलीस प्रशासन,महसूल विभाग,पुरातत्त्व विभाग व इतिहास विभागप्रमुख यांच्या समक्ष सदरील स्थळाचा स्थळपाहणी पंचनामा देखील करण्यात आला आहे.

याचबरोबर सदरील परिसरात विखुरलेल्या अवशेषावरुन या ठिकाणी ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ दर्शविणारी वास्तू होती हे स्पष्ट होते.तसेच सदरील वास्तू ही असंरक्षित स्मारकामध्ये येत असली तरी भोकर शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणापैकी एक होती.ही वास्तू पाडून जमिनदोस्त कोणी केली यासंबंधीची माहिती पुरातत्व विभाग कार्यालयास नाही. त्यामुळे याबाबत आपल्या स्तरावरुन महसूल तथा पोलिस प्रशासन यांच्याकडे शहानिशा करण्यात यावी,अशी विनंती ही करण्यात आली आहे.तसेच सदरील ऐतिहासिक वास्तू पाडून जमिनदोस्त करणाऱ्या दोषींविरुद्ध तथा स्थानिक प्रशासनाविरुद्ध ऐतिहासिक स्मारक व पुरातन अवशेष यांचे जतन करण्यासंबंधी महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवायोजना विभागामार्फत निघालेले परीपत्रक क्रमांक एएनएम १७८१/ १६८८४०/ ३२४६ प्रशा क्रं.-४ दिनांक १० सप्टेंबर,१९८२ व महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम,१९६० व नियम- १९६२ नुसार कार्यवाही करण्यात यावी.असे त्या अहवालातून सुचविले आहे.त्यामुळे आता ठोस कारवाई होण्याची प्रतिज्ञा असून शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ‘ऐतिहासिक पुरातन अवशेष’ जमीनदोस्त करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी,भोकर उपविभागीय अधिकारी,भोकर तहसिलदार व भोकर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे काय कारवाई करतील याकडे ऐतिहासिक वारसा प्रेमी नागरिकांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.

हा ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ जतन करण्यात भोकर नगरपरिषद ठरली असमर्थ ; अहवालात ठेवण्यात आला आहे ठपका !

शासन परीपत्रक क्रमांक एएनएम १७८१/१६८८४०/ ३२४६ प्रशा क्रं.-४ दिनांक १० सप्टेंबर,१९८२ यामध्ये असलेल्या तरतूदीनुसार “केंद्र संरक्षित,राज्यसंरक्षित वा असंरक्षित,अशा ‘ऐतिहासिक पुरातन वारश्यास’ कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता नगरपरिषदेने घ्यावी.एखाद्या स्मारकास लागुन खासगी किंवा इतर प्रकारची जमीन असल्यास स्मारकाच्या चारही बाजूने योग्य ते संरक्षित क्षेत्र सोडण्याचे बंधन नगरपरिषदेने संबंधित विभागाच्या मालकांवर घालावे.
शहराच्या विकासाची योजना आखतांना पुरातन स्मारके जशीच्या तशी ठेवून तेथे पोहोचण्यास योग्य रस्ते, सार्वजनिक उद्याने करुन स्मारकांचे सौदर्य वाढविण्याचा प्रयत्न करावा. अशा महत्त्वपुर्ण तरतुदी या परिपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत.परंतू सदरील परिपत्रकाच्या नियमांचे अनुपालन भोकर नगरपरिषदेने केलेले नाही.
सदरील ऐतिहासिक पुरातन वास्तूची निघा राखने तथा त्यास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये तसेच सदर स्मारकाकडे जाणारे रस्ते व्यवस्थित ठेवणे ही भोकर नगरपरिषदेची जबाबदारी व कर्तव्य असतांना देखील त्यांनी याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.त्याचबरोबर सदर वास्तूची नासदुस करणे हा प्रकार घडत असताना सदर व्यक्तीविरुद्ध स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते.मात्र याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही.ही बाब अतिशय गंभीर आहे.तसेच असे प्रकार भविष्यात इतर कोणत्याही असंरक्षित वास्तुच्या बाबतीत घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरुन भोकर नगरपरिषदेसह सर्व स्थानिक प्रशासनाला वरील परिपत्रक तथा महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनयम १९६० व नियम १६६२ यातील तरतूदी व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत अवगत करावे.तसेच सदरील ऐतिहासिक पुरातन वारसा जतन करण्यात असमर्थ ठरलेल्या भोकर नगर परिषदेच्या संबंधितांवर योग्य व आवश्यक ती कारवाई करावी, असा ठपका ही सदरील अहवालात ठेवण्यात आला आहे. यावरुन सदरील ‘ऐतिहासिक पुरातन वारसा’ जतन करण्याची जबाबदारी असतांनाही तो नष्ट होण्यात भोकर नगरपरिषदेचा ही मोठा हातभार असल्याचे निदर्शनास येत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !