आता पडीक जमीनीवर ही फळ,फुलबाग व मसाले पीक लागवड अनुदानित योजना घेता येणार-कृषि अधिकारी दिलीप जाधव
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अमृत महोत्सवी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना पुर्वी पेरु,आंबा,सिताफळ यांसह आदी विशिष्ट फळझाड, फुलबाग पीक लागवडीचा लाभ घेत येत होता.परंतू लागवड जमीनीचे क्षेत्र मोठे असावे अशी अट असल्याने या योजनेपासून अनेक इच्छुक अल्पभूधारक व पडीक जमीनधारक शेतकरी वंचित राहत होते.यामुळे नुकताच शासनाने सलग शेतावर,शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर पुर्वीच्या पीकांसोबतच केळी(३ वर्ष),ड्रॅगनफ्रूट, ॲव्हाकॅडो,द्राक्ष,फुलझाड-सोनचाफा,मसाल्याची पिके-लवंग,दालचिनी,मिरी,जायफळ अशा प्रकारे फळझाड, वृक्ष लागवड,फूलपिक लागवड व मसाले पिकांची लागवड करता येणार असल्याचा निर्णय घेतला असून सदरील योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन बागायती क्षेत्र वाढवावे, असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना अमृत महोत्सवी फळ,वृक्ष व फुलबाग अनुदानित योजना घेण्यासाठी किमान १ हेक्टर जमीन असावी अशी अट टाकण्यात आली होती.तसेच दरवर्षी सरासरी १ लक्ष हेक्टर फळझाड/ वृक्ष / फूलपिक लागवड करण्यात येऊन स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा या योजनेअंतर्गत एकूण २५ लक्ष हेक्टर बागायती लागवड झाली पाहिजे असे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.परंतू सलग,बांध व पडीक जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपरोक्त अट असल्याने सदरील योजनेचा लाभ घेता येत नव्हता.म्हणून शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता सलग शेतावर,शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रमाअंतर्गत नव्याने केळी(३ वर्ष),ड्रॅगनफ्रूट,ॲव्हाकॅडो, द्राक्ष,फुलझाड- सोनचाफा,मसाल्याची पिके-लवंग,दालचिनी, मिरी,जायफळ ही पीके घेता येणार आहेत.
याच बरोबर सुधारित मजूरी दर रु २५६/- प्रमाणे अकुशल भागाचे मापदंड तसेच सामुग्रीकरीता कलमे रोपांबाबत संचालक फलोत्पादन पुणे यांनी दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रस्तावित केल्यानुसार नविन पिकांबाबत मनुष्यदिन संख्या गृहीत धरुन रासायनिक खतांचा खर्च वगळून “परिशिष्ट अ” प्रमाणे आर्थिक मापदंड निश्चित करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.रासायनिक खतांसाठी लागणारे मनुष्यदिन शेणखत या बाबीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून सुरवातीला खड्डा भरताना रासायनिक खतांमध्ये लागणारे सुपर फॉस्पेट,किटकनाशक भुकटी व इतर बाबी २ किलो पर्यंत वापरावे.रासायनिक खतांऐवजी नाडेप व व्हर्मी कंपोस्ट खतांचा वापर करण्यास अधिक भर देण्यात यावा. लाभार्थ्यांना आवश्यक वाटल्यास स्वः खर्चाने रासायनिक खतांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे.
केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या मजूरी दरानुसार अंदाजपत्रके(सामुग्री वगळून) सुधारित करण्याचे निदेश यापूर्वीच संदर्भाधीन दि.३० मार्च २०२२ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेले आहेत.त्यानुसार आयुक्त(कृषी) यांनी दरवर्षी सुधारित मजुरी दरानुसार अकुशल (सामुग्री वगळून) आर्थिक मापदंड सुधारित करुन क्षेत्रीय स्तरावर कळवावेत व शासनास त्याबाबत अवगत करावे असे सुचविले आहे.यासाठी ज्या कालावधीपासून मजूरी दर लागू केला असेल तोच कालावधी विचारात घेण्यात येणार आहे.राज्य शासनाचे परवानगी शिवाय कोणत्याही परिस्थितीत सामुग्रीच्या दरात वाढ करण्यात येऊ नये.असे ही म्हटले आहे.सदरील निर्णयाचा अध्यादेश दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.तो अध्यादेश www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२१५१५२४०८३५१६ असा आहे.तो पहावा व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच उपरोक्त योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन बागायती क्षेत्र वाढवावे,असे आवाहन भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.