माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २ लाखांचा चेक देण्यासाठी गेलेल्या डॉ.मोहन चव्हाण यांना अडविले

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्ते डॉ. मोहन चव्हाण गेले होते अवमान भरपाई देण्यासाठी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या महंतांनी दिलेला प्रसाद माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारला म्हणून नांदेड जिल्ह्याचे रहिवासी तथा भाजपाचे तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक डॉ.मोहन चव्हाण यांनी दाखल केलेल्या अवमान याचीकेवर मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने २ लाख रुपयाची भरपाई उद्धव ठाकरे यांना ३ आठवड्याच्या आत याचिकर्त्याने द्यावी,असे आदेश दिले होते.त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दि.१८ सप्टेंबर रोजी डॉ. मोहन चव्हाण हे पारंपरिक वाद्यांसह उद्धव ठाकरे यांच्या घरी वाजत गाजत गेले असता पोलिसांनी त्यांना अडविले व उद्धव ठाकरे यांनी देखील ‘तो’ चेक घेतला नसल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
सविस्तर असे की,दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी पोहरादेवी ट्रस्टचे महंत हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर गेले होते.त्यावेळी महंतांनी त्यांना प्रसाद दिला आणि पवित्र विभुती दिली.ते उद्धव ठाकरे यांनी स्विकारले.परंतू त्यांनी प्रसाद त्वरित खाल्ला नाही आणि तो सहकाऱ्याकडे दिला.विभुतीही घेऊन सहकाऱ्याकडे दिली आणि हात झटकला.या साऱ्या घटनेच्या व्हिडीओ चित्रिकरणाची बातमी एका वृत्तवाहिनीवर त्या दिवशी झळकली होती.तो व्हिडीओ मे-२०२४ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.उद्वव ठाकरे यांची ती कृती आमच्या बंजारा समुदायाचे दैवत असलेल्या पोहरादेवीचा अवमान करणारी आहे.तसेच त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत’,असा दावा करत डॉ.मोहन चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी नांदेड मधील मा.न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी संहिता प्रक्रियेच्या कलम १५६(३) अन्वये तक्रार दाखल केली होती.तर ‘विमानतळ पोलिस ठाणे नांदेड येथील पोलिस माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याने त्यांना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश द्यावा’,अशी विनंती त्यांनी त्यात केली होती.
यावर महंतांनी दिलेले उद्धव ठाकरे यांनी आदरपूर्वक स्वीकारले.त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा भावना दुखावण्याचा कोणताही हेतू दिसला नाही.तसेच कोणीही काही दिलेले खावे किंवा नाही,हे ठरवण्याचा हक्क त्या व्यक्तीचा असतो.शिवाय भावना दुखावण्याचा हेतू होता की नव्हता? ही वस्तुस्थिती देणाऱ्याला माहीत असते आणि त्याबाबत त्याने तक्रार करायची असते.या प्रकरणात तसे काही झालेले नाही.त्यामुळे तक्रारीत काहीच अर्थ नाही’,असे नमूद करत मा. न्यायदंडाधिकारी एस.एम.बिहारी-जगताप यांनी दि.३० मे रोजी चव्हाण यांची तक्रार फेटाळली.
त्यानंतर त्यांचा पुनर्विलोकन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दि.८ जुलै २०२४ रोजी अशाच स्वरूपाची कायदेशीर कारणमीमांसा देऊन फेटाळला.त्याला डॉ.मोहन चव्हाण यांनी ॲड.प्रभाकर सलगर यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका करून मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात आव्हान दिले होते. सदरील याचिकेतील सर्व कायदेशीर बाबी मा.न्यायमूर्ती एस. जी.मेहरे यांनी तपासल्यानंतर ‘हा निव्वळ कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करण्याचा प्रकार आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न आहे’,असे निरीक्षण नोंदवले.’अशा याचिकांमुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रतिमा मलीन होतात आणि अनेकदा अशा याचिका कुहेतूने केलेल्या असतात,असेही म्हटले.तसेच मा.न्यायदंडाधिकारी व सत्र न्यायालय या दोन्ही न्यायालयांचे निर्णय योग्यच आहेत’, असे नमूद करत मा.न्यायमूर्तींनी अखेरीस डॉ.मोहन चव्हाण यांना दंड लावून त्यांची याचिका फेटाळली.याच बरोबर दि.१९ सप्टेंबर २०२४ पर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत: व्यक्तिश: भेटून त्यांच्या हातात किंवा त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीकडे २ लाखांचा डिमांड ड्राफ्ट अवमान भरपाई म्हणून द्यावेत’,असा आदेश दिला होता.सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून याचिकाकर्ते डॉ.मोहन उत्तमराव चव्हाण हे बंजारा समाजाच्या पारंपारिक वाद्यासह वाजत गाजत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील घरासमोर दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी गेले.परंतू उद्धव ठाकरे यांच्याकडून यास कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने ‘तो’ चेक देण्यासाठी आलेल्या डॉ.मोहन चव्हाण व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अडविले.यावेळी उद्धव ठाकरे हे तो चेक घेण्यासाठी स्वतः ही आले नाहीत व त्यांचा प्रतिनिधी म्हणून अन्य कोणीही समोर आले नाही.डॉ.मोहन चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारले असता ते म्हणाले की,आम्ही कायदा व न्याय व्यवस्थेचा आदर करणारे असून मा. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आलो होतोत.परंतू आम्हास अडविण्यात आले असून भरपाईची रक्कम स्विकारण्यात आली नाही.आम्ही मा. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखला आहे व त्यांनी ती भरपाई रक्कम घ्यावी का नाही? हा त्यांची वैयक्तिक बाब आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निरर्थक याचिका करणे हे डॉ.मोहन उत्तमराव चव्हाण यांना भोवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.