Sun. Dec 22nd, 2024

एका तरुणीने एटीएम कार्डद्वारे मावशीचे ९ लाख ८३ हजार रुपये चोरले

Spread the love

त्या तरुणीस अटक करण्यात भोकर पोलीसांना आले यश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मावस बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथील मावशीच्या घरी आलेल्या १८ वर्षीय तरुणीने मावशीचे एटीएम कार्ड चोरले व विविध ठिकाणी त्या एटीएम कार्ड चा परस्पर वापर करून एस.बी.आय.बँक शाखा भोकर येथील खात्यातून ९ लाख ८३ हजार ५०० रुपये चोरले.याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध भोकर पोलीसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुन्ह्याचा तपास करत असतांना तो चोर शोधण्यात भोकर पोलीसांना यश आले असून मावशीचे पैसे चोरणाऱ्या त्या तरुणीस दि.१४ जून रोजी अटक करण्यात आली आहे.

नांदेड येथील रहिवासी असलेली एक १८ वर्षीय तरुणी मे २०२३ मध्ये मावस बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे राहत असलेल्या मावशीच्या घरी आली होती.मावस बहिणीचा वाढदिवस साजरा करुन ती काही दिवस मावशीच्या घरीच राहिली.या दरम्यान एटीएम मधून काही रक्कम काढण्यासाठी तिची मावशी गेली असता ती पण सोबत गेली होती.यावेळी मावशी वापरत असलेला पासवर्ड त्या तरुणीने आठवणीत ठेवला.आणि काही दिवसानंतर नांदेड येथे जातांना कपाटात ठेवलेले मावशीचे ते एटीएम कार्ड तिने चोरले.यानंतर तिने दि. २४ मे २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान त्या एटीएम कार्डचा वापर करुन अनेक ठिकणच्या एटीएम मधून ९ लाख ८३ हजार ५०० रुपये परस्पर चोरले.ही चोरी करतांनाची एक विशेष बाब म्हणजे पैसे उचलल्या नंतर बँक खातेदाराच्या मोबाईलवर जो संदेश येतो तो संदेश येणे तिने बंद(ब्लॉक) केला होता.त्यामुळे मावशीला खात्यातून पैसे काढल्याचे संदेश प्राप्त झाले नाहीत.

एके दिवशी काही रक्कम काढण्यासाठी मावशी बँकेत गेली असता तिच्या खात्यातून उपरोक्त रक्कम परस्पर कोणीतरी उचलल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले.त्यामुळे त्या मावशीने भोकर पोलीसात झालेल्या प्रकाराबद्दल रितसर फिर्याद दिली.यावरुन गु.र.नं.१६५/२०२४ कलम ३८० भादवि प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध भोकर पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पो.नि. शैलेंद्र औटे यांनी केला असता त्या तपासात धक्कादायक माहिती प्राप्त झाली.ती म्हणजे बहिणीच्या मुलीनेच उपरोक्त मजकूराप्रमाणे ती रक्कम चोरली होती.यावरुन सहा.पो.नि. शैलेंद्र औटे यांनी मोठ्या शिताफीने त्या तरुणीस ताब्यात घेतले व दि.१४ जून २०२४ रोजी तिला अटक करण्यात आली आहे. तर पुढील अधिक तपास शैलेंद्र औटे हे करत आहेत.तसेच आपल्या एटीएम कार्ड चा वापर सुरक्षितपणे करावा व त्याचे पासवर्ड इतरांना सांगू नये,अन्यथा अशा प्रकारे परिणामास सामोरे जावे लागेल,यांची दक्षता घ्यावी,असे आवाहन पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांनी एटीएम कार्ड धारकांना केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !