एकाने परस्पर जमिन नावे करुन घेतल्याने सावरगाव मेट येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भोकर पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक व गावकऱ्यांनी केला पोलिसांना मज्जाव ; अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मध्यस्थीनंतर पुढील कारवाईसाठी नातेवाईकांनी दिली संमती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.सावरगाव मेट येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवरचे कुळ कमी करुन देतो म्हणून गावातीलच एकाने त्या शेतकऱ्याची दिशाभूल करुन ती जमिन परस्पर आपल्या नावे करुन घेतली.तसेच त्या शेतकऱ्यावरच खोटी कारवाई करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याचा मानसिक त्रास व फसवणूक झाल्याने ‘त्या’ शेतकऱ्यांने दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील कोंडदेवनगर शिवारातील त्यांच्या शेतातील चारीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध भोकर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौ.सावरगाव मेट ता.भोकर येथील शेतकरी बाबू किशन कोळपेवाड(५४) यांनी दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील कोंडदेवनगर ता.भोकर शिवारातील गट क्रं.५४ मधील त्यांच्या शेतातील चारीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील बाब निदर्शनास आल्याची माहिती गावातील पप्पु बोईनवाड यांनी मयत शेतकरी बाबू कोळपेवाड यांच्या कुटुंबीयांना दिली.हे समजताच कुटूंबिय,नातेवाईक व गावकरी तात्काळ घटनास्थळी गेले.सदरील घटनेची माहिती भोकर पोलीसांना देण्यात आली.ही माहिती मिळताच भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.परंतू मयत शेतकऱ्याचे कुटूंबिय, नातेवाईक व गावकऱ्यांनी सदरील भोळ्या मयत शेतकऱ्याची फसवणूक करून ही जमिन परस्पर आपल्या नावे करुन घेणाऱ्या विठ्ठल लसमन्ना देवड यास तात्काळ अटक करण्यात यावी व ती जमिन परत पिडीत कुटूंबियांच्या नावे करुन द्यावी,तरच मयत शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात देऊ असा पावित्रा घेतला आणि पंचनामा करण्यास भोकर पोलीसांना मज्जाव केला.ही मागणी करत मोठ्या जमावाने रास्ता रोको केला.यामुळे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांना घटनास्थळी जादा पोलीस कुमक मागवावी लागली.यावेळी पो.नि.सुभाषचंद्र मारकड,सहा.पो.नि.शैलेंद्र औटे,पो.उप.नि.सुरेश जाधव,पो.उप. नि.केशव राठोड यांनी विनंती केल्यावरुन त्या संतप्त जमावाने रास्ता रोको माघे घेतला.परंतू मागणीवर ठाम राहिलेल्या त्या जमावाने तब्बल ८ तास पोलिसांना पंचनामा करु दिला नाही व मृतदेह खाली घेऊ दिला नाही.दरम्यानच्या काळात तर नातेवाईकांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न ही केला.यामुळे तणापुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
हे समजताच भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे घटनास्थळी दाखल झाले.तसेच भोकर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार पी.पी.कावरे,अव्वल कारकून सिद्धार्थ सोनसळे,तलाठी रमेश गड्डापोड हे देखील घटनास्थळी दाखल झाले.डॉ.खंडेराव धरणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य व मृतदेहाची विटंबना लक्षात घेऊन उपस्थित मयताचे कुटूंबिय, नातेवाईक व संतप्त गावकरी यांची समजूत काढली.पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने जे जे कायदेशीररित्या सहकार्य करता येईल ते आम्ही करु असे आश्वस्त केले.त्यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले व पुढील कारवाई करण्यासाठी नातेवाईकांनी पोलिसांना संमती दिली.यानंतर पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला व मयत शेतकऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्यात आला.तसेच मयत शेतकऱ्याची पत्नी यशोदाबाई बाबू कोळपेवाड(५२) रा.सावरगाव मेट यांनी भोकर पोलिसांत रितसर फिर्याद दिली.त्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, गावातील विठ्ठल लसमन्ना देवड रा.सावरगाव मेट ता.भोकर हे.मु.गंदेवार कॉलनी भोकर यांनी माझे पती बाबू किशन कोळपेवाड भंडारी यांच्या नावाने असलेल्या मौ.कोंडदेवनगर ता.भोकर येथील शिवारातील गट क्र.५४ मधील ० हेक्टर ५९ आर.शेत जमिनीवरील कुळ कमी करुन देतो म्हणून माझ्या पतीची फसवणूक करून दि.०४ मार्च २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय भोकर येथे नेऊन माझ्या पतीच्या नावाने असलेली शेतजमीन आम्हास कोणासही कल्पना न देता व कोणताही मोबदला न देता विठ्ठल लसमन्ना देवड यांनीच नावे करून घेतली.
माझे पती बाबू किशन कोळपेवाड हे निरक्षर असून त्यांना कोणतीही गोष्ट समजत नसल्यामुळे सदर खरेदी खताची कल्पना त्यांना आली नाही.त्यानंतर दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी माझे पती मला व माझ्या मुलांना म्हणाले की,विठ्ठल लसमन्ना देवड यांनी कुळ उडवतो म्हणून मला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये घेऊन गेले होते.त्यावेळी मला व माझ्या मुलांना संशय आल्यामुळे आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी खरेदीखताची प्रत मिळवली.त्यातून आम्हाला कळाले की,विठ्ठल लसमन्ना देवड यांनी माझ्या पतीच्या नावाने असलेली जमीन स्वताच्या नावाने करुन घेतली आहे.त्यानंतर मी,माझे पती बाबू किशन भंडारी व माझा मुलगा विठ्ठल बाबू भंडारी व सुन शोभा विठ्ठल भंडारी व डोणगाव (बु) ता.बिलोली जि.नादेड येथील माझा भाऊ दिगांबर मल्लु गंगाधरे असे मिळून दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी विठ्ठल लसमन्ना देवड रा.सावरगाव मेट ता.भोकर,ह.मु.गंदेवार कॉलनी भोकर यांच्याकडे जाऊन आम्ही विचारणा केली की, आमची जमीन परस्पर नावे का करुन घेतलास ? त्यावेळी विठ्ठल लसमन्ना देवड,त्याची पत्नी लक्ष्मीबाई विठ्ठल देवड व मुलगा प्रविण विठ्ठल देवड म्हणाले की,तुझ्या पतीने आम्हाला जमीन करून दिलेली आहे.त्यावेळी माझे पती म्हणाले की,तू शेतीवरील कुळ उडवतो असे म्हणून मला घेऊन गेलास व जमिन नावे करुन घेतलास.त्यावेळी विठ्ठल लसमन्ना देवड यांनी मी तुझी जमिन करुन घेतलो तुला काय करायचे ते कर,असे म्हणून आम्हा सर्वांसमक्ष त्यांनी माझ्या पतीला थापड बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई विठ्ठल देवड व मुलगा प्रविण विठ्ठल देवड हे माझ्या पतीला म्हणाले की,तुला तर जिवंत मारुन टाकतो तू शेतात पाऊल तर ठेव.अशी धमकी दिली.त्यामुळे माझ्या पतीला खुप मानसिक त्रास झाला.विठ्ठल देवडकडे खुप पैसा आहे,तो आपले काहीही करु शकतो व मला मारुन टाकेल म्हणून माझे पती रडू लागले.ते खुप दडपणाखाली होते व विठ्ठल लसमन्ना देवड यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ते खुप भयभित झाले होते.
भयभित होऊन मानसिक त्रास सहन न झालेले माझे पती दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी मी व माझा मुलगा विठ्ठल,सुन शोभा हे झोपेत असतांनाच सकाळीच शेताला गेले.आम्ही उठल्यानंतर आम्हाला वाटले की,ते शेतात गुरांना चारा आणण्यासाठी गेले असतील.परंतू तसे झाले नसून ही दु:खद वार्ता आम्हाला समजली.माझ्या पतीच्या नावाने असलेली जमिन विठ्ठल लसमन्ना देवड यांनी फसवणुक करुन त्यांच्या नावाने करुन घेतली व त्यांना मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला.त्या त्रासास कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली असून,यास जबाबदार असलेले विठ्ठल लसमन्ना देवड,लक्ष्मीबाई विठ्ठल देवड (पत्नी), प्रविण विठ्ठल देवड (मुलगा) सर्वजण रा.सावरगाव भेट ह.मु. गंदेवार कॉलनी भोकर या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. सदरील फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ व ३(५) प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप. नि.सुरेश जाधव हे करत आहेत.