भोकर येथील शिवजयंतीची पहिली कार्यकरिणी बरखास्त व दुसऱ्या कार्यकारिणीस पाठींबा
महापुरुषांविषयी चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून घेण्यात आला हा निर्णय-शिवाजी पाटील किन्हाळकर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भोकर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.जयंती सोहळा साजरा करण्यासाठी एकच सार्वजनिक शिवजयंती मंडळ गठीत करण्यात येते.परंतू यावर्षी दोन वेगवेगळ्या कार्यकारिणी गठित करण्यात आल्या असल्याने महापुरुषांविषयी जनसामांन्यात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून पहिली कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दुसऱ्या कार्यकारिणीस त्या सर्वांचा पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर व पहिल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष माधव पाटील वडगावकर यांनी दि.३ फेब्रुवारी रोजी माऊली मंगल कार्यालय भोकर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी मांडलेली सामंजस्याची भूमिका येथील मराठा समाज बांधवांनी मान्य केली असून शिवजयंती मंडळ व समाज बांधवाच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दि.३१ जानेवारी २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे समाज बांधवांची एक बैठक घेण्यात आली व त्यात सर्वानुमते माधव पाटील वडगावकर यांना सार्वजनिक शिवजयंती मंडळ -२०२४ च्या कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले व उर्वरित सर्व पदाधिकारी ही निवडण्यात आले.परंतू सदरील कार्यकारिणीवर नाराजी दर्शवून दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी हनुमान मंदिर,जेठीबा नगर भोकर येथे बहुजन बांधवांनी एक बैठक घेऊन दुसरी कार्यकारिणी गठित केली व या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदिप पाटील गौड कोंडलवार यांची निवड करण्यात आली.असे झाल्याने यावर्षी वेगवेगळे दोन जयंती सोहळे साजरे होतील अशी चर्चा सर्वत्र होत होती.हे योग्य नसल्याचे आम्हास वाटत असल्यामुळे मी व अन्य काही जणांनी माधव पाटील वडगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली.तसेच सर्वांनी एकत्र येऊन होणारा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावा असा सल्ला दिला.कारण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुष हे कोणत्याही एका जाती,पंथ,धर्माचे खाजगी मालमत्ता नसतात, तर ते सर्वांचे आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वांनी साजरी करायला पाहिजे व गावात शांतता सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे,अशी भूमिका सर्वांनी घ्यावी,असे सांगितले.आमचे म्हणने सर्वांनी मान्य केले असून गठित केलेल्या पहिल्या जयंती मंडळाने ती कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे,असे ही ते म्हणाले.तर माधव पाटील वडगावकर हे म्हणाले की,आम्ही गठित केलेली कार्यकारिणी बरखास्त करत आहोत व नव्याने गठित करण्यात आलेल्या जयंती मंडळास आमचा पाठिंबा असून त्यात समाविष्ट होऊन हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. त्यामुळे भोकर येथे दोन जयंती सोहळे होणार नसून एकच सोहळा होईल,त्यामुळे कोणीही गैरसमज पसरवू नये असे आम्ही आवाहन करतो,असे ते म्हणाले.
सदरील पत्रकार परिषदेस भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.शिवाजी कदम,सुरेश पाटील डूरे,विशाल माने,सतिश पाटील मोघाळीकर,आनंद पाटील सिंधीकर,माधव पाटील बोरगावकर,सचिन पाटील किन्हाळकर,सुहास पवार, सुनिल पाटील लामकानीकर,आनंद पाटील चिट्टे,हनमंत पाटील कामनगावकर,विठ्ठल पाटील धोंडगे यांसह मराठा समाज कार्यकर्ते व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.