मॉर्निंग वॉक करणाऱ्या खरबी येथील दोन विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
भावांनो… महामार्गावर मॉर्निंग वॉक करतांना काळजी घ्या…!-पो.नि.नानासाहेब उबाळे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मौ.खरबी ता.भोकर येथील दोन शालेय विद्यार्थी मॉर्निंग वॉक साठी भोकर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेले असता भोसी परिसरात दि.१२ जानेवारी रोजी पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान बेसुमार सुसाट वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना उडविले.यात ते चिरडल्या गेल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून आज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलीसात सुरु आहे.
कै.मोहनराव देशमुख विद्यालय,भोसी ता.भोकर येथे इयत्ता १० वीत शिक्षण घेत असलेला संकेत दत्ता पाशेमवाड (१७) व कै. लक्ष्मणराव घिसेवाड कनिष्ठ महाविद्यालय,भोकर येथे इयत्ता ११ वीत शिक्षण घेत असलेला वैभव दत्ता येळणे(१८) दोघे ही रा.खरबी ता.भोकर हे दोघे शालेय विद्यार्थी मित्र दि.१२ जानेवारी २०२४ रोजी पहाटे मॉर्निंग वॉक,रिंग व व्यायाम करण्यासाठी भोकर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेले होते. पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान भोसी शिवार परिसरातील गु-हाळाजवळ याच महामार्गावर भोकरकडून नांदेडकडे बेसुमार भरधाव वेगात जात असलेल्या एका अज्ञात वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व त्या वाहनाने रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या त्या दोघांना उडविले.त्या भीषण धडकेत ते दोघे चिरडल्या गेले व या हृदयद्रावक अपघात घटनेत त्या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.तर ते वाहन अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.
दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.मयत विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मयत संकेत च्या पश्चात आई,वडील,लहान बहिण असून तो कुटुंबातील एकुलता मुलगा होता.तो गेल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर मयत वैभव च्या पश्चात आई,वडील,लहान भाऊ आहे.एकाच घटनेत एकाच गावातील दोन उमदा होतकरु विद्यार्थांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून दुपारी एकाच वेळी समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर खरबी ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.तसेच कै.मोहनराव देशमुख विद्यालयाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करुन मयत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.सदरील भीषण अपघाताची माहिती मिळताच भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.परंतू ते वाहन अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाल्याने पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि.संभाजी हनवते हे त्या अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया करत आहेत.
भावांनो… महामार्गावर मॉर्निंग वॉक करतांना काळजी घ्या…!- पो.नि.नानासाहेब उबाळे
सर्व नागरिकांना भोकर पोलीस विभागाच्या वतीने सदरील भीषण अपघातात मरण झालेल्या विद्यार्थ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात येत असून पो.नि. नानासाहेब उबाळे यांच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येते की,वाहनांची ये जा,वर्दळ अधिक असणाऱ्या रस्त्यावर, महामार्गावर मॉर्निंग वॉक,रनिंग किंवा व्यायाम करत असाल तर थोडी काळजी घ्यावी.सद्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पहाटे धुके असते.या दरम्यान पहाटे जी वाहने ये जा करतात त्या वाहनांच्या बहुतांश चालकांची झोप झालेली नसते व अशा परिस्थितीत चालकाचा गतीवरील ताबा निसटण्याची शक्यता असते.त्यामुळे मॉर्निंग वॉक किंवा रनिंग करत असाल तर डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूनेच(रॉंग साईड) जावे.असे केल्यास समोरुन येणारे वाहन आपणास दिसते व चालकास ही आपण दिसू शकता आणि संभाव्य धोका टळू शकतो.तसेच अंधार असेल तर आपल्या कपड्यांवर रेडियम मार्क असावे किंवा बॅटरी चा वापर ही करावा.त्याचा उपयोग वाहन चालकांना होतो व संभाव्य धोका टळू शकतो.तरी सर्वांनी हे करावे व आपल्या जीवित्वाची काळजी घ्यावी.