भोकर येथील पत्रकार भवनासाठी जागा व ५० लक्ष रूपये निधी द्यावा-इंजि.विश्वंभर पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार व अन्य सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली उपरोक्त मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : भोकर येथे पत्रकार भवन व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून पत्रकार बांधवांकडून केली जात आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विश्वंभर पवार यांच्याकडे उपरोक्त मागणी केली असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदस्यांनी दि.८ जानेवारी रोजी ती मागणी मान्यतेसाठी पालकमंत्री तथा नियोजन समिती अध्यक्ष गिरीष महाजन व जिल्हाधिकारी तथा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांच्याकडे प्रस्तावित केली आहे.
भोकर शहर व तालुका हे तेलंगणा राज्य सिमेवरील महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मोठा तालुका असून या तालुक्यास भौगोलिक,ऐतिहासिक,राजकीय व आदी प्रकारे मोठी उज्वल पार्श्वभूमी आहे.त्यामुळे येथील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक,दृष्ट्या मागासलेल्या व शोषित,पिढीत,वंचीत,शेतकरी,कष्टकरी, व्यापारी यांसह आदी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासन प्रशासनातील विविध योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने निस्वार्थ कर्तव्य सेवा बजावतात.हे करत असतांना ते सर्वजण कुठलेही वेतन अथवा मानधन न घेता निशुल्क सेवा कर्तव्य बजावतात.
हे कर्तव्य बजावतांना पत्रकारांना पत्रकार परिषद किंवा अन्य कार्यक्रम घ्यायचा असेल तर येथील मंगल कार्यालये,सभागृह भाड्याने घ्यावे लागतात.निशुल्क निस्वार्थ सेवा कर्तव्य करणाऱ्या पत्रकारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असतांनाच ती महागडी मंगल कार्यालये व सभागृह भाड्याने घेणे ही न परवडणारी आणि अशक्य बाब आहे.त्यामुळे येथील पत्रकार बांधव व विविध पत्रकार संघटनांनी आमदार, खासदार,नामदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पत्रकार भवन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.परंतू अद्याप तरी या मागणीस यश आलेले नाही.
याच अनुषंगाने दर्पण दिन-मराठी पत्रकार दिनी दि.६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार व त्यांचे सहकारी पदाधिकारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्याकडे उपरोक्त पत्रकार भवनासाठी जागा आणि भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांनी केली.तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,तालुका उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, तालुका सचिव आर.के.कदम,विठ्ठल सुरलेकर,विशाल जाधव, गजानन गाडेकर,अंबादास बोयावार व आदींच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदन त्यांना दिले.यावेळी इंजि.विश्वंभर पवार यांनी सदरील मागणी राज्याचे ग्रामविकास,पंचायतीराज मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व नांदेड जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष गिरीष महाजन आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांच्याकडे करेन व पाठपुरावा ही करेन असे आश्वासन दिले.
नव्हे तर दि.८ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तामसा ता.हदगाव येथील वीर नेताजी पालकर यांचे भव्य स्मारक,पिंपळगाव ता.हदगाव येथील श्री दत्त मंदिर येथील रस्ता व भोकर येथील पत्रकार भवनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.त्यात भोकर येथील पत्रकार भवनासाठी मोठी जागा व बांधकामासाठी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचा समावेश आहे.या मागणीचा होणाऱ्या विकास आराखड्यात नक्कीच विचार केला जाईल असे जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष पालकमंत्री गिरीष महाजन यांनी म्हटले असून नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार, श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख,खान इसाखान सरदारखान,माधवराव दिगंबरराव धर्माधिकारी,रामचंद्र नागनाथ पाटील बन्नाळीकर,राजश्री मनोहर भोसीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांची भेट घेऊन उपरोक्त मागण्यांचे निवेदन त्यांना दिले आहे.यावेळी त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.तर या प्रयत्नांना यश यावे व लवकरात लवकर भोकर येथील पत्रकार भवन उभारण्यात यावे अशी अपेक्षा पत्रकार बांधवांतून व्यक्त होत आहे.