मुक्ता साळवे यांचा-मांग -महारांच्या दुःखाविषयीचा निबंध-एक चिंतन…!
दलित साहित्याचे सुवर्णाक्षरी पहिले पान लिहणाऱ्या आद्य सत्यशोधक लेखिका मुक्ता साळवे यांची आज जयंती आहे…या औचित्याने प्रा.डॉ.भगवान वाघमारे यांचा लेख वाचकांसाठी देत आहोत…संपादक
अंबुज प्रहार विशेष
मुक्ता साळवे यांचा -मांग-महारांच्या दुःखाविषयीचा निबंध – एक चिंतन…!
“माझे तिसरे गुरु ज्योतिबा फुले.ब्राह्मणेत्तरांचे खरे गुरु तेच होत.शिंपी,कुंभार,न्हावी,कोळी,महार,मांग,चांभारांना माणुसकीचे धडे फुले यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतिबांच्या मार्गाने जात होतो.कोणी कुठे जाऊ,पण आम्ही मात्र ज्योतिबाच्या मार्गाने जाऊ; जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ…पण जोतिबाचा मार्ग सोडणार नाही”- डॉ. बाबासाहेबआंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या चिंतनशील वैचारिक ऋणानुबंधाच्या अन्वयार्थाने विचार करता,”माणसा माणसात भेद करणारे धर्म पृथ्वीतलावरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो”,असा निर्धारपुर्वक क्रांतीचे पलिते पेरणारी क्रांतीनायिका मुक्ता साळवे यांच्या निबंधाचे चिंतन करत असताना भारतीय इतिहासाच्या संदर्भाने विचार करता इतिहासातील थोर तत्वव्यथ्यानी त्यांच्या समकालीन विषमतावादी समाजाच्या विरोधात परिवर्तनाचे तत्त्वज्ञान पेरले असतानाही विषमतावादी भट-ब्राह्मणांच्या समाज व्यवस्थेने देव-धर्माच्या,जाती आणि कर्मकांडांच्या नावाखाली शोषित,दलित-कष्टकरी, स्त्री,या बहुजन मानवी समूहाचे स्वातंत्र्य,हक्क,अधिकार,न्याय, स्वाभिमानात्मक सन्मान नाकारले.इतकेच नव्हे तर शूद्र-अतिशूद्रांचा श्वासही बंदिस्त केला नि विषमतावादी ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवले.किंबहुना ते कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताची संकल्पना लादून बहुजनांना पूर्णता: उध्वस्त केले.त्यांचे माणूसपण,माणूस म्हणून त्यांची प्रतिष्ठा आणि मूल्य नाकारून स्वतःकडे अधिकार संपन्नता घेतली.अशा विषारी आणि प्रतिगामी समाज व्यवस्थेच्या विरोधात चार्वाक,महात्मा बुद्ध,राजा प्रेसनजित,संत कबीर,महात्मा बसवेश्वर,लहुजी साळवे, महात्मा फुले,माता सावित्रीबाई फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राम स्वामी पेरियार नायकर,सत्यशोधक अण्णा भाऊ साठे आणि राष्ट्र संत गाडगेबाबा अशा अनेक तत्त्वचिंतकांनी इथल्या शोषित मानवी समूहाला त्यांचे नैसर्गिक सर्वभौम अधिकार संपादित करण्यासाठी सम्यक विचाराच्या संचिताची निर्मिती केली.
हाच परिवर्तनवाद भट- ब्राह्मणांच्या बंदिस्त जात,वर्ण, धर्म, पुरुषप्रदान संस्कृतीला (समाज रचनेला) मुळासकट उपटून टाकण्यासाठी (Eradication) पोषक ठरतो आणि बहिष्कृत सर्वहारा मानवी समूहांचे सामाजिक हक्क आणि न्याय प्रदान करता येतो.हेच वास्तव लक्षात घेता,परिवर्तनवादी तत्त्वव्याथ्याच्या जातकुळीशी नाते जोडणारी,क्रांतीची मशाल क्रांतीनायिका मुक्ता साळवे हिने वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या बुद्धीला स्मरेल नि तोलेल अशा शब्दात भारतीय विषमतावादी संस्कृतीला चपराक देणारा आणि देव-धर्म विषम व्यवस्थेच्या दष्यमुक्तीतून बहुजन समाज मुक्त व्हावा म्हणून मांगा-महारांच्या दुःखाविषयीचा निबंध १८५३ साली लिहिला. त्या कालखंडात भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न मांडणारे, विठ्ठल रामजी शिंदे नि बहिष्कृतातील पहिले सत्यशोधक म्हणून ज्यांना ओळखले जाते गोपाळबाबा वलंगकर यांचाही कारकिर्दीच्या पूर्वी नि इतर समाजचिंतकाच्या जन्माच्या अगोदर १९ व्या शतकाच्या मध्यात अर्थात १८५३ च्या कालखंडातील निबंध,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे-क्रांतीपिता महात्मा फुले-क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्या संस्कारातून निर्माण झालेला सत्यशोधकी संस्कार होय.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
क्रांतीनायिका मुक्ता साळवे ही आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांची पुतणी,तर भारतीय शिक्षक इतिहासातील बहुजनांचे अर्थात महात्मा फुले यांच्या १८४८ च्या पहिल्या शाळेतील शिक्षक गणू शिवा मांग यांची मुलगी.मुक्ता साळवे यांचा जन्म ५ जानेवारी १८३९,मुक्ता साळवे यांनी वयाच्या नवव्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला. क्रांतीपिता महात्मा फुले आणि सावित्रीमाईच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही सतत अभ्यास करीत असे.विद्यार्थिनीच्या लेखन, वक्तृत्वगुणांना चालना देण्यासाठी सावित्रीमाई विद्यार्थिनीची सतत वक्तृत्व,निबंध स्पर्धा घेत असत.१२ फेब्रुवारी १८५३ रोजी मुक्ता साळवेनी तिसरी या वर्गाची परीक्षा दीली.परीक्षेचा भाग म्हणून मुक्ता साळवेनी “मांगा-महारांच्या दुःखाविषयीचा निबंध” पहिल्यांदा शाळेत वाचला गेला.१८५५ साली इंग्रज सरकारच्या शैक्षणिक अहवालात तो प्रसिद्ध करण्यात आला.हा निबंध अमेरिकन मिशनच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘ज्ञानोदय पत्राने’ छापला.मांगा-महारांच्या दुःखा विषयीचा निबंध ऐकण्यासाठी ज्ञानोदय पत्राचे संपादक रेव्ह,हेंरी, बॅलन्टाईन स्वतः हजर राहतात.त्यांना मुक्ता साळवेंचा निबंध आवडतो आणि १५ फेब्रुवारी १८५५ आणि १ मार्च १८५५ अशा दोन भागात निबंधाची प्रसिद्धी करतात.त्याही पुढे जाता मुक्ता साळवेचा निबंध ना.वी. जोशी यांनी “पुणे शहराचे वर्णन” या ग्रंथात १८६८ साली पुनर्मुद्रित केला.मांगा-महारांच्या दुःखासंबंधीचा निबंध भारतीय पारंपारिक देव-धर्म व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेच्या ठेकेदारांची चिकित्सा करणारा निबंध होय,हा परखड,विद्रोही,मार्गदर्शक आणि चिंता वाहणारा आहे. भट- ब्राह्मणांच्या विषमतावादी पारंपारिक संस्कृतीने कपोलकल्पित रचलेले आणि बहुजनांच्या माथे मारलेले मनुस्मृतीचे नियम नाकारणारा,स्त्री साहित्याच्या जगतातील आणि निबंध या साहित्य प्रकाराच्या इतिहासातील पहिला निबंध १८५३ साली मुक्ताने लिहिला.तेव्हा मुक्ता साळवे ही १४ वर्षाची होती. हे समजून घेण्याची गरज आहे.म्हणूनच १८७३ च्या सत्यशोधक समाजाच्या अहवालामध्ये स्पष्ट केले जाते. मुक्ता साळवेचा बौद्धिक नि वैचारिक दृष्टी प्रगत झाली आहे. जीवनात तत्त्वज्ञानाचे मूल्य किती असते.हे मुक्ताला पटले आहे, कालबाह्य मूल्यांच्या आचरणाने सामान्य लोकांच्या जीवनाची राख-रांगोळी कशी होते.मुक्ता साळवे विद्यार्थिनीला नेमकेपणाने कळले आहे.( संदर्भ- सत्यशोधकी साहित्याचा इतिहास,खंड -एक,लेखक-डॉ.श्रीराम गुंदेकर-पान नंबर २२३-२२५) मुक्ता साळवेंचा प्रचंड वादळी आणि क्रांतिकारी निबंध इथल्या प्रस्थापित भू- देवांना ज्वालामुखीचा हादरा देणारा आणि समाज परिवर्तनवाद्यांना अंतर्मुख करणारा आणि परिवर्तनवादी क्रांतीचे अनेक मार्ग निर्गमित करणारा आहे. १८५३ हा कालखंड म्हणजे मनुस्मृति अर्थात ब्राह्मण धर्माने निर्माण केलेले बनावट धर्मग्रंथ ईश्वरप्रणित असल्याचे बहुजनांच्या मेंदूत कोंबलेला,प्रचंड जातीयतेचा,अंधविश्वासाचा, पारंपारिकतेचा आणि माणसांचें सर्वस्व हिरावून घेणाऱ्या विषम संस्कृतीचा.अशा जीवघेण्या परिस्थितीत तेही पाखंडी संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या पुणे शहरात,देव-धर्माच्या विरोधात ‘ब्र’ काढणाऱ्यांची जीभ छाटली जायची,अशा स्फोटक नि अन्याग्रस्त परिस्थितीत फुले दांपत्याच्या शाळेत शिकणारी मुक्ता साळवे हिने देव-धर्माच्या विरोधात,हिंदू धर्माचे बाप म्हणून मिरवणाऱ्या भट्ट -ब्राह्मणांच्या आणि त्यांनी रचलेल्या धर्माच्या विरोधात मनुस्मृतीच्या काळात निबंधाच्या माध्यमातून बंड करणे म्हणजे त्या काळालाच मुक्ता हे एक आव्हान देते.नव्हे तर मुक्ताचं एक वादळी आव्हान होते.असे म्हणावे लागेल.
वयाच्या चौदाव्या वर्षात मुक्ता साळवेतील निर्भयपणा नि धाडस एका पारंपारिक बलाढ्य विषम संस्कृतीच्या विरोधात लिहिलेला सत्यशोधकी एल्गार हा सहजपणे निर्माण होत नाही. तर पाठीशी एका परिवर्तनवादी संस्काराची जडणघडण लागते. ते संस्कार मुक्ताला तिच्या साळवे घराण्याकडून अर्थात मुक्ता साळवे हिचे आजोबा, पणजोबा आणि खप्परपणजोबा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजांच्या स्वराज्य स्थापनेत निष्ठेने कर्तव्य बजावले म्हणून छत्रपती शिवरायांनी “राऊत” ही पदवी साळवे घराण्याला प्रदान केली होती.त्या साळवे घराण्याचे वैचारिक वारसदार आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे,क्रांतीपिता महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या सत्यशोधकी आणि सत्यवर्तनी क्रांतिकारी वैचारिक संस्कार आहे.म्हणूनच मुक्ता आणि मुक्ताचा निबंध.१८५३ मध्ये प्रकाशित झालेल्या “Native female school in Puna” या इंग्रज शासनाच्या द्विवार्षिक अहवालामध्ये त्या निबंधाची प्रशंसा केली आहे.आणि त्या अहवालात लिहिले, When the examination was over,prize of sarees and book’s we are presented to the girls by Mrs.E.C.Johnes,Patroness of the School.One litle girl informed that,she was to receive the prize,said,”Don’t give us prize; give us School Library.” This same little girl sits up every night till twelve o’clock to study for Marathi and English lesson!!!
इंग्रज सरकारच्या वार्षिक द्वितीय अहवालामध्ये मुक्ता साळवेच्या निबंधाच्या संबंधाने मांडलेले विचार आणि तिने इंग्रजी शासनाकडे मिळवलेली सामाजिक-शैक्षणिक अचीव्हमेंट ( Social and Educational achievement) ही भारतीय स्त्रियांसाठीच नव्हे तर जगातील स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट ठरते.मुक्ता साळवेच्या बुद्धिमत्तेनी पारंपारिक देव-धर्माची आणि कर्मकांडाची चिकित्सा केली.वैदिक धर्माला नाकारले, भट- ब्राह्मणांना आणि त्यांच्या धर्मग्रंथांनाही नाकारले.आणि सर्व बहुजन माणसांच्या दुःखाचे मूळ कोणते? त्या दुःखाच्या मुळाचे मुक्ताने संशोधन केले आणि दुःखाचे मूळ हे पारंपरिक जात-धर्मात आहे.हे शोधले.(जात-धर्म व्यवस्थेत माणसाला किंमतच नाही, तर ती त्यांच्या जातीला नि धर्माला आहे.माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरीही जात-धर्म ही त्यांच्या कृतृत्वापेक्षा मोठी असतात.हे ऐतिहासिक सत्य लपवता येत नाही.) त्याही पुढे जाता,भारतीय शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन मुक्ता साळवे परिवर्तनवादी चळवळीत सहभागी झाली.आणि रात्रीच्या शाळेमधून शेकडो अस्पृश्यांना शिक्षण देऊन,सत्यशोधनासाठी लायक बनवणारी शिक्षका ठरली.इतकेच नव्हे तर, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले.सत्यशोधक बनली.हे परिवर्तन चळवळीच्या दृष्टीने न चुकवता येणारा परिवर्तनाचा दस्तऐवज आहे.मुक्ता साळवेच्या निबंधावर विवेचन करत असताना जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आणि विचार करण्याची बाब ही की,क्रांतीबा ज्योतिबा फुले १८५३ साली “निर्मिकांचा शोध” (Quest of the Creatar) १४ खंडाची ही पद्यपुस्तिका प्रकाशित केली. हा ग्रंथ विश्वासंबंधी समाजात रुजलेल्या गैरसमजुती दूर करण्याकरिता आणि मनुस्मृतीने अखिल माणसांच्या जाती-जातीत विभाजन केले.त्यात माणूसच शिल्लक राहिला नाही. म्हणून मानवीमूल्य,नीतिमूल्य वृद्धिंगत करण्यासाठी हा ग्रंथ प्रसिद्ध केला.त्यानंतर १८५४ “मनुस्मृतीचा धिक्कार” या पुस्तिकेतून क्रांतीबानी हिंदूधर्माला पूर्णता: नाकारून धर्मपंडितांना,धर्मप्रेषितांना बडवून हिंदू धर्माची सर्व गुपित जगजाहीर केले,तरीही हिंदूधर्माचे शुद्धीकरण झाले नाही. परिणामी मुक्ता साळवेंचा मांगा-महारांच्या दुःखा विषयीच्या निबंधातील आक्रोशाचा मूळ गाभा अर्थात-१)आम्हास धर्म पुस्तक नाही.२)आम्ही धर्मरहित आहोत.म्हणून क्रांतीबा ज्योतिबा फुलेंनी एका नव्या समाज निर्मितीचा पर्याय म्हणून १८७३ साली सत्य शोधणारा,सत्त्यवर्तनी नवसमाज म्हणजे ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली.ही देशातील पहिली विज्ञाननिष्ठ सामाजिक स्वयंसेवी संस्था.या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेंतर १८८९ साली वयाच्या ६२ व्या वर्षी हिंदू धर्माला पर्याय म्हणून अर्धांगवायूने आजारात असताना,या पृथ्वीतलावरील मानवी समूह अर्थात सर्व बहुजन स्त्री-पुरुषांची भट्ट-ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामीतून मुक्तता व्हावी आणि समाज दाष्यमुक्त व्हावा म्हणून “सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक” हा धार्मिक ग्रंथ निर्माण केला.जेणे करून सत्यशोधनातून मानवी समूहाने विवेकी जगावे,त्यातून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा.यासाठी ‘सत्यमेव जयतेचा’ जयघोष करून, सत्यशोधन आणि सत्यवर्तन या पायाभूत तत्त्वज्ञानाच्या मूल्यांचा अविष्कार क्रांतीबानी “सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक” या ग्रंथ निर्मितीतून केला आणि बहुजन समाजाला सत्यवर्तन आणि सत्यनितीच्या मार्गावर घेऊन जाणे.त्यांच्यातील सनातन देव-धर्माची आणि त्यांच्या कर्मकांडाची भीती आणि अज्ञान कायमची दूर करणे,नैसर्गिक वास्तव जगाची बहुजनांना ओळख करून देणे.कारण बहुजनांना लुबाडणाऱ्या पारंपारिक देवतांची, त्यांच्या धर्माची आणि भट-ब्राह्मणांच्या पुरोहितशाहीच्या खऱ्या-खोट्यांची जाणीव १ एप्रिल १८८९ ला रचलेल्या सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकच्या माध्यमातून बहुजनांना करून दिली.क्रांतीबा फुलेंनी ईश्वराला लाथाडून सर्व समावेशक निर्मिक ही संकल्पना १८५३ “निर्मिकाचा शोध” या ग्रंथातून पेरली,ही संकल्पना आंधळेपणावर आधारित नसून निसर्गाच्या अधिष्ठानाला अग्रक्रमांकाने मानणारी आहे.मुक्ता साळवेंनी क्रांतीबा फुलेची निर्मिक हीच मूळ संकल्पना स्वीकारूनचं,मांगा-माहारांच्या दुःखा विषयाच्या निबंधाचा प्रारंभ केला.
मुक्ता साळवे यांच्या निबंधाचे आकलन आणि अभ्यास मांडताना,या निबंधाचे सात भाग करणे नि त्याचे तंत्रशुद्ध विवेचन करणे मला आवश्यक वाटते.त्या शिवाय मुक्ताच्या निबंधाला न्याय प्राप्त होऊ शकत नाही.म्हणून मी मुक्ताच्या निबंधाचे सात भागात रूपांतरित करतो आहे.
१)मज दिन-दुबळ्याच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग-महारांच्या दुःखाविषयी भरविले; तीच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे.२) वेदाधारेकरून आमचा द्वेष करणारे लोक त्यांच्या मताचे खंडन करावे तर…लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की,वेद तर आमचीच मता आहे.आम्हीच याचे अवलोकन करावे.तर यावरून उघड दिसते की, “आम्हास धर्म पुस्तक नाही”.जर वेद ब्राह्मणासाठीच आहेत तर….जर आम्हास धर्मासंबंधित पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही,तर “आम्ही धर्मरहीत आहो” असे साप दिसते की नाही बरे ? धर्माने एकानेच अनुभव घ्यावा...बाकीच्याने खदान माणसाच्या तोंडाकडे पाहावे. “तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा अभिमान करावा अशी आमच्या मनात देखील न येवो”.३)आम्हा गरीब मांगा-महारास हाकून देऊन… इमारतीच्या पायात आम्हास तेल-शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वेश करण्याचा उपक्रम चालवला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई-म्हशी पेक्षा नीच मानिले आहे…त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालीम खाण्यापुढून गेला असता,गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते…विद्या शिकण्याची मोकळीक कुठून मिळणार…कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले,तर तो म्हणे की,मांग- महार असून वाचतात.तर ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्याच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरायची की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.
४) दुसरे असे की,लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही…सोवळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की,काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहोत.असे मानणे… पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात? ह्याचा ह्या निर्दयांच्या अंत:करणात द्रव येतो की काय? नाही…पंडितहो,तुमचे स्वार्थी,अप्पलपोटे पंडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याच्याकडे लक्षपूर्वक कान द्या.ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात. त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते,म्हणून हिव-पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे!… ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा.५)भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रजाला येथे पाठवले…शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले,आपटे, त्रीकमजी,आंधळा पानसरे,काळे, बेहरे हे निरर्थक मांगा-माहारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते व गरोदर बायकांशी देहांत शासने करीत होते.ती बंद झाली… किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली…मांगा-महारावर ह्यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असता ते म्हणत की ह्यांनी चोरी करून आणले.हे पांघरून तर ब्राह्मणांनीच पांघरावे.जर,मांग- महार पांघरतील तर धर्म नष्ट होईल.असे म्हणून ते त्यास बांधून मारीत…मांगाची किंवा महारांचे डोके मारीत होते.ती बंद झाली…जुलमी बिगार बंद केली.६)आता नि:पक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून… ब्राह्मण दुःख देत होते,तेच…आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात…परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही.ज्यातून ज्याचा विचार सैतानाला नेला आहे.ते पूर्वीसारखच आमचा द्वेष करतात.आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्याच म्हणतात की,तुम्हास जातीबाहेर टाकू.७)आमच्या प्रिय बंधूंनी (क्रांतीपिता ज्योतिबा फुलेंनी) मांगा-महारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत…अहो,दारिद्र्याने आणि दुःखाने पिडलेले मांग -महार लोक हो,तुम्ही रोगी आहात,तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिमान व्हाल; तर तुमच्या रात्रं-दिवस ज्या जनावरा प्रमाणे हजऱ्या घेतात त्या बंद होतील,तर आता झटून अभ्यास करा.म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही…मग तुम्ही तर मांग- महारच आहात.
वरील संदर्भीय विभागलेल्या सात भागांतर्गत मी फक्त दोन भागावर विवेचन करणार आहे.भाग एक -” मज दिन-दुबळ्यांच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशु पेक्षा नीच मानलेल्या दारिद्री मांगा-महाराच्या दुःखाविषयी भरविले.तीच जगतकर्त्यांची मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्ती प्रमाणे विषय लिहिण्याचे काम हाती सरसवून घेतले आहे”.निबंधाची सुरुवातच अस्पृश्य आणि बहिष्कृत बहुजनांचे जीवन, पशुपेक्षा नीच मानले गेलेल्या सामाजिक स्तराच्या दुःख संबंधी मांडण्याची माझ्या बुद्धीला चालना मिळते.असे मुक्ताने कबूल करून,येथे निर्मिकाची जागा जगतकर्त्यांनी घेतलेली आहे.”निर्मिक” या शब्दाशी साधर्म्य साधणारा शब्द म्हणजे “जगनिर्माता” अर्थात जगतकर्ता होय.मांगा-महारांच्या दुःखाविषयी अंत:करणात भरविले.असे म्हणणाऱ्या मुक्तांचे अंत:करण किती स्वच्छ,पारदर्शक नि निर्मळ होते.हे स्पष्ट आहे.पृथ्वीतलावरील वास्तव नि अंतिम सत्य माणूस.माणसात अधिक महत्त्वाचे काय असेल तर त्याचे मन? मनाच्या गाभाऱ्यात जाणिवांचे अधिष्ठान असते. त्यातूनच नवनिर्मितीची जडणघडण होत असते.म्हणून मुक्ता साळवेंनी जाणीवपूर्वक मांगा-महारांच्या दुःखाविषयीचा निबंध सरसावून घेतला.दलित-उपेक्षित -बहुजनांच्या महापुरुषांनी काही जाणीवपूर्वक घटना घडवून आणलेल्या आहेत.उदा… १)क्रांतीपिता महात्मा फुले हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या वेशात इंग्रजांच्या समोर जाणे.२)जाणीवपूर्वक न्हाव्याचा संप घडवून आणणे.३)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करणे.४)
१९२० ला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह,त्याला इतिहास साक्षी आहे.अगदी त्याच पद्धतीने मुक्ताने मांगा-महाराच्या दुःखाच्या विषयाचा निबंध सरसवून घेतला. तो जाणीवपूर्वक घेतला,कारण मुक्ता साळवेचा जन्म, मुक्ता ज्या ठिकाणी जन्मली,राहिली,जगली,वाढली-अस्पृश्य आणि स्त्री म्हणूनच द्वेषाची घोट पित मुक्ता जगली.ती वस्ती तेव्हाची २९ गंजपेठ, पुणे.(जुनी गंज पेठ)आताची टिंबर मर्चंट,पुणे.मांग,महार, चांभार,कुंभार,ढोर,मेहत्तर,डक्कलवार,कोळी,माळी,साळी,शिंपी,न्हावी,लोहार,..आधी इतर आदिवासी,भटके आणि मुसलमान ज्यांना ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने बहिष्कृत केलेला असा बहिष्कृत भारत,जिथे अंधार आहे,प्रकाश नाही.जिथे अज्ञान नि अंधकार आहे.विज्ञान नाही.दुःख-दारिद्र्य,अज्ञानाने पोसलेला, अंधश्रद्धा.देव-धर्म- कर्मकांडानी लादलेल्या अंधश्रद्धेत जगवलेला समाज.जाति-भेदातून माणूस भेद नि जातबंधिस्त समाज.अशा गंजपेठेतील,मातंग समाजातील प्रचंड जातीचे चटके भोगलेली मुक्ता,तिचा समाज तिचे कुटुंब.समग्र दुःखाच्या चटक्याचा परिपाक म्हणून की काय ? क्रांतीपिता महात्मा फुले-सावित्रीमाई आणि क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रेरणेतून शाळेत गेलेली आणि तिसरी या वर्गात शिकत असणारी मुक्ता साळवे,मांगा- महारांच्या दुःखाविषयी निबंध लिहीते.हा निबंध अंतर्ग्यामी नि क्रांतीग्यामी आहे.आणि खरातर आतला आवाज आहे. जे-जे आपण भोगलो,आपल्या कुटुंबांनी भोगले, आपल्या समाजाने भोगले आणि आपल्या अवती भवतीच्या विविध जाती-जमातीतील निसर्गदत्त माणूस असणाऱ्यांनी तो भोगवटा भोगला.त्यांच्या दुःखाचा टाव्हो.(आक्रोश) म्हणजे मुक्ता साळवेंचा निबंध.मांगा-महारांच्या दुःखाविषयीची आंत:रिक तळमळ,मांगा-महारांचे दुःख जगाच्या वेशीवर टांगण्याची गरज व्यक्त करणे.कारण गेल्या हजारो वर्षापासून बहिष्कृत मांगा- महारांच्या हजारो पिढ्या इतरांच्या सुखासाठी उध्वस्त झाल्या,देशात ऐश्वर्य निर्माण करण्यात आणि देशाला सुंदर बनवण्यासाठी मांगा-माहारांच्या घामा-रक्तांनी भर घातली.अशा मांगा-महारांचे दुःख आणि त्यांच्यावर होणाऱ्या जीवघेण्या अन्ययाला सर्वदर्शी करण्यासाठीच मुक्ताचा निबंध.त्याही पुढे,मुक्त म्हणते,मानवाचा निर्माण कर्ता एक आहे.मग ते,ब्राह्मण असो की,मांग-माहार असो,त्यांना बुद्धी देणारा एकच ‘निर्मिक’ तर विषमता का? हा मूलभूत प्रश्न सुचकपणे निर्माण करून,ऐतखाऊ भट- ब्राह्मणाच्या,भट-प्रवृत्तीवर मुक्ता साळवे हल्लाबोल करते.मांगा-महारांची वास्तव दुर्दशा मुक्ता साळेवे दोनच शब्दांमध्ये मांडते,”पशुपेक्षा हिन आणि दरिद्री” भारत.
आमच्या देशात जनावरांचा विंटळ होत नाही,पण माणसांचा विंटाळ होतो.देवळात,पाण्यात कुठेही जनावरांचा संचार नि स्पर्श करण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य,बहुतांशी देवावर वाहिलेले तेल किंवा नैवद कुत्र- मांजरे जिभेनी चाटून किंवा उचलून खातात.जनावराच्या स्पर्शाने देव,धर्म,माणूस,पाणी, अन्न,नैवद आणि श्रदांचा विंटाळ होत नाही.पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने विंटळ होतो.असे पशुपेक्षा हीन मांग-माहारांच्याकडे ज्ञान नाही,संपत्ती नाही,अधिकार नाहीत,विचार नाहीत,शिक्षण नाही,निर्भयता नाही,सर्व अर्थाने नाकारलेला वंचित आणि दरिद्र्यत पिचणाऱ्या मांगा-महारांचे वास्तव नि वस्तुनिष्ठ दुःख मुक्ता साळवे मांडते.आम्हास धर्म पुस्तक नाही.आम्ही धर्म रहित आहोत,भेद-भाव करणारे धर्म पृथ्वीतलावरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो “.
भाग दोन- मुक्ताच्या निबंधातील भाग दोन अधिक महत्त्वाचा आहे.मुक्ता म्हणते,”आता जर वेदधारी करून आमचा द्वेष करणारे लोक,ह्यांच्या मताचे खंडन करावे तर ते आमच्यापेक्षा उच्च मानविणारे,विशेष करून लाडूखाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की,वेद तर आमचीच मता आहे.आम्हीच त्याचे अवलोकन करावे.तर यावरून उघड दिसते की,आम्हास धर्म पुस्तक नाही.जर वेद ब्राह्मणासाठीच आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय.जर आम्हास धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही.तर आम्ही धर्मरहीत आहोत.असे साफ दिसते की नाही बरे?” निबंधाची सुरुवात ही बंडखोरीची आहे.वेदाची मालकी आमचीच आहे.असे समजणाऱ्या ऐतखाऊ भट-ब्राह्मणांच्या धर्मसंकल्पनेचे मुक्ता साळवे खंडनच नव्हे तर खांडोळी- खांडोळी करते.हजारो वर्षांपासूनच्या पारंपारिक समाज व्यवस्थेच्या विरोधात,त्या व्यवस्थेने लादलेल्या संस्कृती आणि पारंपारिकतेच्या विरोधात संघर्ष करायचा असतो.कधी-कधी स्वतःशी संघर्ष करून नव्या उमेदीने,नव्या जाणीवांची,नव्या मूल्यांची निर्मिती करायची असते आणि त्या मूल्यांचा स्वीकारही करावा लागतो. सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि काही नवे स्थित्यंतर घडवण्यासाठी केलेला तो संघर्ष नक्कीच असतो.त्या संघर्षातूनच नवा देश,नवा समाज आणि नवा माणूस निर्माण होत असतो.नव्या समाज धारणेची संस्कृती जन्म घेते.या निर्मितीलाच युगप्रवर्तन म्हटलं जाते.अशी युगप्रवर्तन परिवर्तनवाद्यांनी वैदिकसंस्कृती पासून ते आजपावोत मानव मुक्तीसाठी घडवून आणलेले आहेत.त्या युगप्रवर्तनातील एकोणिसाव्या कालखंडातील महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून मुक्ता साळवे आणि मुक्ताच्या निबंधाकडे पाहावे लागते.
मुक्तासाळवे वेद,मनुस्मृति आणि इतर सर्व धर्मग्रंथ नाकारते.
“जर वेद बहिष्कृताने पाहिले,वाचले,वेदाची चिकित्सा केली तर महापातक घडते,जर वेदाप्रमाणे जर वर्तन केल्यास किती महाप्रलय घडेल”? असा प्रश्न प्रथापिस्त वेदाच्याठेकेदारांना मुक्ता खडसावून विचारते.या प्रश्नाचे उत्तर ते ३३ कोटी देव देवतांच्याकडे नाहीच.भट -ब्राह्मणाकडेही नाही.जर वेदप्रमाण मानून वर्तन केल्यास,महापात घडत असेल,तर भट-ब्राह्मण सोडता समग्र माणसांना गुलाम बनविणाऱ्या वेदाची आणि वेदधारक भट-ब्राह्मणांची का नि काय म्हणून गुलामी सहन करावी? हा टोकाचा तीक्ष्ण प्रश्न येथील प्रस्थापित देव-धर्म व्यवस्थेला नि वेदवस्थेला विचारतेच आणि त्या कपोलकल्पित आणि लबाड वेदव्यवस्थेच्या वेद संस्कृतीला नाकारते इतकेच नव्हे,तर बहिष्कृत समाजाला वेदाची गुलामी आपण का सहन करावी? असा आवाहनात्मक सवालही करते.मुक्ता साळवेच्या निबंधातील सत्यशोधकी नि क्रांतिकारी यल्गार लक्षात घेता, मुक्ता ही पारंपरिक देव-धर्म,वेद नि जात-वर्गीय व्यवस्थिच्या विरोधातील पूर्वसूरीचा वैचारिक क्रांतीचा संघर्ष वाटतो. मुक्ताच्या निबंधात असणारा वैचारिक स्वयंपूर्णपणा, निर्भीडपणा,आणि कुठल्याही संकटाला न डगमगणारं नि आव्हानाला आव्हान देणारच आहे,त्याही पुढे जाता,बदलाच्या (Change) दिशेला प्रेरणा निर्गमित करणारा,एकविसाव्या शतकातील संघर्षहिन समाजाला अंत:र्बाह्य स्वातंत्र्याच्या आणि सन्मानाच्या संघर्षासाठी पेटवणारा आहे.ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला जाळून टाकणारा आहे.इतकेच नव्हे तर,मुक्ता साळवे, निर्मिकालाच प्रश्न करते,तुझ्याकडून आलेला धर्म कोणता? ते आम्हाला कळवं ; म्हणजे आम्ही बहिष्कृत,दलित-बहुजन त्या धर्माप्रमाणे वर्तन करू! त्या रीतीने अनुभव घेऊ! जर,एकानीच धर्माचा अनुभव आणि उपभोग घ्यावा आणि इतर बहुसंख्यिकाने एका स्वार्थी,अप्पलपोटी आणि खदाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे.तो व त्यासारखे दुसरे “धर्म” पृथ्वीतलावरून नष्ट होवोत.आणि त्या धर्माचा अभिमान बाळगण्याची कूबुद्धी आम्हा बहुजनांच्या मनात न येवो.असे निर्भयुक्त धर्मव्यस्थेच्या वंशावळीलाच मुक्ता साळवे ठणकावते. हा मुक्ता साळवेचा संताप आहे. तमाम बहुजनांच्या वतीने हा एका महिलेचा शाप आहे. जो धर्म,माणसाला माणूस मानत नाही.तो धर्मचं आणि त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीतलावरूनच नष्ट होवोत.हे क्रांतिकारी बंड मुक्ता साळवेच करू शकते कारण ती क्रांतीपित्ता महात्मा फुले आणि सावित्रीमाईची शिष्य आहे. म्हणून मुक्ता देव- धर्माचे अस्तित्व नाकारते,धर्माचे नियम खोडते आणि ती धर्म पृथ्वीतलावरून नष्ट होवोत. त्या धर्माचा नायनाट व्हावा.त्या धर्माची अवशेष सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहू नये.नव्हे तर थोतांड नि बुद्धिभेद करणाऱ्या धर्माची खूण सुद्धा या पृथ्वीतलावर जिवंत राहू नये.म्हणूनच,मुक्ता म्हणते, धर्माचे अभिमान बाळगण्याची कूबुद्धी सुद्धा आमच्या दलित-बहुजनांच्या मनात न येवो.अभिमान कशाचा बाळगायचां ? अभिमान सन्मानाचा,अभिमान विजयाचा,अभिमान स्वाभिमानाचा,अभिमान सत्य-नितीचा बाळगायचा असतो. अभिमान अपमानाचा,हिनतेचा, स्वाभिमानशून्यतेचा आणि पशुपेक्षाही हिन अशा अस्तित्वाचा बाळगायचा नसतोच.म्हणून आम्ही पाखंडी धर्माचा अभिमान बाळगणार नाही.म्हणूनच असे धर्म पृथ्वीतलावरून नष्ट होवोत.हा भारतीय स्त्रीचा अंत:करणनिर्मित शाप.या मुक्ताच्या शापाचा आम्ही काल,आज आणि उद्या नक्कीच अभिमान बाळगला पाहिजे.गेल्या हजारो वर्षापासून या भट-ब्राह्मणांच्या धर्माने निर्माण केलेला स्वर्गाचा बागुलबुवा बहुजनांच्या मेंदूत भूत-वर्तमान या दोन्ही काळात कायम ठाण मांडून आहे.म्हणूनच भट-ब्राह्मण सोडता,बहुजन समाज, ब्राह्मणीधर्माचा गुलाम म्हणून जगला नि जगतो आहे. आणि भविष्यातही गुलाम म्हणून जगण्याची शक्यता आहे, म्हणूनच ब्राह्मणधर्म पृथ्वीतलावरून नष्ट होवोत.ही धर्म उध्वस्ततेची टोकाची भूमिका भारतीय इतिहासात कोणत्याच बंडखोर-विचारवंत-तत्त्ववेत्यांनी घेतली नाही.पण,धर्माचे समूळनष्ट करणारी क्रांतिकारी भूमिका नि भाषा भारतीय स्त्री समूहाचा आत्मिक शाप होय.ही हिम्मत फक्त न फक्त क्रांती नायिका मुक्ता साळवेंनीच केली.यावर परिवर्तनवाद्यांनी चिंतन करण्याची गरज आहे.हा मुक्ताचा निबंध आजही सध्याच्या परिस्थितीत सुसंवादी आहे.जो विचार त्या-त्या कालखंडात, त्या-त्या समाज वस्तवाशी सुसंवादी असतो.तो विचार फक्त विचारच न राहता त्याचे तत्त्वज्ञानात रूपांतर होत असते. म्हणून मुक्ता साळवेचा निबंध आणि निबंधातील तत्त्वज्ञान चिरंतन आहे.खरेतर,जो विचार आणि विचारवंत त्या-त्या कालखंडात संवादी असतो,ते विचार, तत्त्वज्ञान म्हणून जिवंत राहते,तर तो विचारवंत, तत्त्वज्ञानी म्हणून जिवंत राहतो. आजच्या भारतीय परीपेक्ष्यात मुक्ता साळवेच्या निबंधातील तत्त्वज्ञानाच्या अन्वयार्थाने मुक्ता साळवेंच्या वैचारिक क्रांती आंदोलनातील रचनात्मक भूमिका पूर्णत्वाकडे नेण्यासाठी संपूर्ण क्रांतीची चिंता वाहण्याची गरज आहे.
ज्ञानज्योती सत्यशोधक मुक्ता साळवे यांना विनम्र अभिवादन!
-:लेखक:-
प्रा.डॉ.भगवान वाघमारे
प्रोफेसर व विभाग प्रमुख-वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्र, वनस्पतीशस्त्र विभाग,महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा जि.लातूर✒ ज्ञान तपस्विनी सत्यशोधक लेखिका मुक्ता साळवे यांना जयंती निमित्त कोटी कोटी त्रिवार वंदन !✒
आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचे परम् शिष्य क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या परम् शिष्या (गुरुवर्यांच्या पुतणी) ज्ञान तपस्विनी,क्रांती कन्या,दलित साहित्याचे पहिले सुवर्ण अक्षरी पान लिहणा-या आद्य सत्यशोधक लेखीका मुक्ता साळवे यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या पावन स्मृतिस कोटी कोटी त्रिवार विनम्र अभिवादन !!
अभिवादनकर्ते
सतिश कावडे,जेष्ठ सामाजिक नेते तथा संस्थापक अध्यक्ष- अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य
उत्तम बाबळे,संपादक,प्रदेशाध्यक्ष- अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य
परमेश्वर बंडेवार,प्रदेश उपाध्यक्ष -अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य
सर्व सन्माननिय पदाधिकारी व कार्यकर्ते…अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य