भोकर मध्ये शौर्य दिनी विजय स्तंभास बहुसंख्य विचार अनुयायींनी केले अभिवादन
तर याच कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ आंबेडकरी नेते भिमराव दुधारे यांनी बी.आर.एस.ला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीत केला प्रवेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोरेगाव भीमा शौर्य दिन औचित्याने वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भोकर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली व रॅलीच्या समारोपानंतर प्रतिकात्मक ‘विजय स्तभास’ बहुसंख्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार अनुयायींनी मानवंदना दिली.तर याच कार्यक्रम प्रसंगी येथील जेष्ठ सामाजिक नेते भिमराव दुधारे यांनी श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बी.आर.एस.पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या या निर्णयाचे तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांसह आदींनी स्वागत केले आहे.
कोरेगाव भीमा या ठिकाणी दि.१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक घनघोर युद्ध झाले होते.महार बटालियनच्या बळावर इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात ते युद्ध पुकारले होते.त्या युद्धात महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव केला होता.यात अनेक योद्धे शहीद ही झाले.हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्या नंतर त्या योद्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे एक विजयस्तंभ बांधला.कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता.या ऐतिहासिक घटनेस दि.१ जानेवारी २०२४ रोजी २०६ वर्ष पूर्ण झाले आहेत.दि.१ जानेवारी १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या ‘विजय स्तंभास’ भेट देऊन महान योद्यांचा इतिहास पुढे आणला.तेव्हापासून या ठिकाणी ‘शौर्य दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.याच शौर्य दिनाच्या औचित्याने वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर शाखा भोकर च्या वतीने दि.१ जानेवारी २०२४ रोजी भोकर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ठिक ८:३० वाजता सुभेदार रामजी आंबेडकर चौक ते डॉ. आंबेडकर आंबेडकर चौक भोकर येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला व तेथे प्रथमच उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक ‘विजय स्तंभास’ बहुसंख्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार अनुयायी आणि भीम सैनिकांनी मानवंदना दिली.तसेच सुप्रसिद्ध गायक संतोष मंत्री व त्यांच्या संच्याचा ‘योद्यांची शौर्यगाथा व भीमगितांचा संगितमय’ प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार अनुयायी,भीम सैनिक यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.सदरील शौर्य दिनाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगीची एक विशेष बाब म्हणजे गत वर्षी बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांच्या सोबत तेलंगणा राज्यातील बी.आर. एस.पक्षात जाहीर प्रवेश केलेले भोकर येथील सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष भिमराव दुधारे यांनी बी.आर. एस.पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या पुढाकारातून आणि प्रा.डॉ.जे.टी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी.आर.एस.पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप के.राव,माजी तालुकाध्यक्ष सुभाष तेले,शहराध्यक्ष शेख रहीम यांसह आदींची उपस्थिती होती.सदरील पक्ष प्रवेशा बाबतची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांनी दिली असून त्यांच्या प्रवेशाने तालुक्यातील पक्ष वाढीस बळ मिळणार आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे.तर भिमराव दुधारे यांच्या पक्ष प्रवेशाचे उपरोक्त पक्ष पदाधिकारी व अनेकांनी त्यांचे स्वागत केले असून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.