लोकसंग्रहासह संयमी आणि कुशल प्रशासनाचे धनी : प्राचार्य डॉ.वसंत बिरादार
अहमदपूर जि.लातूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने डॉ. मारोती कसाब यांनी लिहिलेला हा लेख खास आज आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
संपादक – अंबुज प्रहार न्युज लाईव्ह
“बाप हो,जेवायची ताटं विका,बायकोला कमी किंमतीचं हलकं लुगडं घ्या ; पण लेकरांना शाळेत पाठवा.विद्या हे मोठं धन आहे,बाबांनो विद्या शिका..!”
असा संदेश राष्ट्रसंत गाडगेबाबा आपल्या कीर्तनात देत असत. इ.स.१९४०-५० च्या दशकात गाडगेबाबांचे विदर्भातून मराठवाड्यात आगमन झाले होते.मराठवाडा तेव्हा निजामाच्या जुलमी राजवटीखाली दुहेरी शोषणात अडकलेला होता.या काळात भांबावलेल्या जनतेला गाडगेबाबांचा संदेश म्हणजे जणू दैवी आदेश वाटत असे.
” गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला..!” अशा सामुहिक जय घोषात गावकरी तल्लीन होत आणि एकाग्र झालेल्या मनांवर मग कीर्तन संपेपर्यंत गाडगेबाबांचेच अधिराज्य चाले.कीर्तनात तल्लीन झालेल्या भोळ्याभाबड्या जनतेला गाडगेबाबा हळूच उपदेशाचे बाळकडू पाजत.अज्ञान आणि अंधश्रद्धे शिवाय आपला दुसरा कोणताच मोठा शत्रू नाही.हे ते लोकांना पटवून देत.गाडगे बाबांच्या प्रेरणेतूनच मराठवाड्यात अनेक शाळा सुरू झाल्या आणि अनेक शेतकरी, कष्टकरी पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली.
उदगीर तालुक्यातल्या मादलापूरच्या माणिकराव बिरादार पाटलांनीही आपल्या मुलांना शेताऐवजी गाडगेबाबांच्या प्रेरणेतूनच शाळेचा रस्ता दाखवला. माणिकराव पाटलांना तीन मुलं,तीन मुली.त्यांनी या सहा जणांनाही शाळेत पाठविले.पैकी एका भावाने उदगीरला आडत टाकली.तर मधव्या भावाने वडिलांचा शेतीचा वारसा चालवण्याचा निर्णय घेतला.तिन्ही बहिणींची वयोमानानुसार लग्न झाले.मात्र उच्च शिक्षणापर्यंतचा मोठा पल्ला गाठला तो त्यांच्या वसंत नावाच्या सर्वात लहान असलेल्या मुलाने.घरातील बहीण,भाऊ आपल्या लहान्या व लाडक्या भावाला शिकवून मोठं व्हावं हा उद्देश ठेवून वसंताला शिकण्यासाठी प्रेरीत केले.गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बळीराम किशनराव कांबळे गुरुजींचा वसंता हा लाडका विद्यार्थी होता.या वसंताने आपल्या पहिलीच्या शिक्षणाची सुरुवात गावातल्या जि.प.च्या शाळेत केली.१९७४ ला चौधी बोर्डाची परीक्षा चांगले मार्क घेऊन पास झाल्यानंतर मादलापूर ते उदगीर असा दररोज पायी प्रवास करत उदगीरच्या शामलाल विद्यालयात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले. तर १९८२मध्ये बारावीला ६३ टक्के घेऊन उदगीर शहरात अव्वल आले.विशेष म्हणजे इतिहासात १०० पैकी ७८ मार्क मिळालेले होते.श्यामलाल माध्यमिक व माध्यमिक शाळेने त्यांचे त्यावेळी पॉंपलेटही प्रसिद्ध केले होते.पुढे आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट अवस्थेत शिक्षण सोडून देण्याचे अनेक प्रसंग आले.मात्र त्यातूनही खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचा संदेश खरा ठरविला.कारण साक्षात गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.
१९९० ते २००९ अशी तब्बल एकोणवीस वर्षे यशस्वी प्राध्यापकी बरोबरच पत्रकारिता केल्यानंतर डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारले.हे महाविद्यालय उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने २००० पासून चालविले जाते. डॉ.बिरादार यांचा किसान शिक्षण प्रसारक मंडळाशी जुना स्नेह आहे.त्यांचे ज्येष्ठ बंधू शेषराव बिरादार यांची उदगीरला मोंढ्यात आडत होती.किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर आडतीवर येत असत.त्यामुळे त्यांचा शेषराव बिरादार यांना स्नेह लाभला.तो कायम स्वरूपी वाढला.त्यामुळे डॉ.वसंत बिरादार यांना किसान शिक्षण प्रसारक मंडळाने नेहमीच आपुलकीची आपलेपणाची वागणूक दिली आहे.
त्यांच्या प्राचार्यपदाच्या सुरुवातीची काही वर्षे संघर्षाची गेली. त्यातही त्यांनी चांगुलपणा जोपासत एक कर्तव्यनिष्ठ,उत्तम, आदर्श,पारदर्शक प्रशासक म्हणून आपला जम बसविला. त्याकाळी अहमदपूर हे मराठवाड्यातील एक नामांकित शिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला आलेले होते.ते केवळ महात्मा गांधी महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेमुळे.डॉक्टर आणि इंजिनियर पैदा करणारे शहर म्हणून या अहमदपूरचा नावलौकिक झालेला होता.या शहराला खऱ्या अर्थाने विद्यापीठ पातळीवर पदवी स्तरावर गौरवान्वित करण्याचा बहुमान प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्याकडे जातो.इ.स.२००९ पासून त्यांनी स्वतःच्या अभ्यासातून,निरीक्षणातून आणि संशोधनातून स्वतःच विद्यापीठीय शिक्षणात स्वतंत्र असा ‘महात्मा फुले पॅटर्न’ निर्माण केला.महात्मा फुले महाविद्यालयात पदवीला पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची ते स्वतः मुलाखत घेतात.प्राध्यापकांना संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी पाठवून त्याची संपूर्ण कौटुंबिक,सामाजिक,सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती समजून घेतली जाते.ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी चांगली असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक काळात तिन्ही वर्षांसाठी महाविद्यालयातर्फे दत्तक घेतले जाते.अशा विद्यार्थ्यांना गणवेश,पुस्तकं महाविद्यालया तर्फे दिली जातात.तसेच प्रवेश फी आणि विद्यापीठ परीक्षा फी भरली जाते.विद्यार्थी एकाही विषयात नापास होऊ नये,हीच एकमेव अट असते.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेच्या क्षेत्रात चमकताना दिसत आहेत.
प्रचंड जनसंपर्क असलेले प्राचार्य डॉ.वसंत बिरादार हे स्वतः उत्तम लेखक,समीक्षक आणि जाणकार,संवेदनशील असे ज्येष्ठ पत्रकार,संयमी वृत्तीचे असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतात. त्यांच्या प्रेरणेतून आणि प्राध्यापकांच्या कौशल्यपूर्ण शिकवणीतून आतापर्यंत या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. २०१६ पासून तानाजी कांबळे,कैलास ससाणे,पूजा चव्हाण,राजश्री गुट्टे, दीपाली परतवाघ,समीक्षा कांबळे, सुप्रिया साबळे आदी विद्यार्थी आजतागायत म्हणजे २०२३ पर्यंत सातत्याने महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत पहिले,दुसरे आलेले आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या आणि परिसराच्या सामाजिक- सांस्कृतिक- ऐतिहासिक विकासाकडेही प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचे विशेष लक्ष असते.हे त्यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांवरून लक्षात येते.महाविद्यालय आणि परिसर यांचं एक सुंदर नातं त्यांनी तयार केले आहे. त्यांच्या पुढाकारातून परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी २०२२ मध्ये महात्मा फुले महाविद्यालयात पुणे येथील प्रिन्स्टाईन या आयुर्वेदिक संस्थेच्या माध्यमातून ‘विशेष महा आरोग्य शिबीर’ यशस्वीरीत्या घेण्यात आले.या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत औषधोपचारही करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसरातील अनेक गावांत शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.दोन्ही अध्यासन केंद्रांची स्वतंत्र ग्रंथालये असून,त्यांचा लाभ होतकरू व अभ्यासू विद्यार्थी घेतात.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांनी परिसरातील दानशूर नागरिकांना महाविद्यालयास ‘पंचाहत्तर ग्रंथ दान’ करण्याचे आवाहन केले होते.या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनीही ‘पंचाहत्तर ग्रंथ दान’ योजनेत सहभाग नोंदविला.एकंदरीत अल्पावधीतच आपल्या कुशल नेतृत्वाचा परिचय देत प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.त्यांच्या देखरेखीखाली व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाची भरभराट सुरू असून, महाविद्यालयाला बेंगलोर येथील ‘नॅक’ संस्थेने २०१६ मध्ये ‘बी’ तर २०२३ मध्ये मानाचा ‘बी प्लस’ हा दर्जा नुकताच बहाल केला आहे.
प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांचा लोकसंग्रहही मोठा आहे.शिक्षण,साहित्य व पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मित्रपरिवार वाढविला आहे.त्यांच्यावर राष्ट्रसंत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील,भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी बापूसाहेब पाटील एकंबेकर,भाई केशवराव धोंडगे यांच्या विचारांचा प्रभाव आहे.तद्वतच शालेय जीवनात त्यांच्यावर महर्षी दयानंद सरस्वती प्रणित आर्य समाजाच्या चळवळीचा आणि विचार तत्त्वांचाही प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसाकडे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभलेली आहे.
आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी शिक्षण क्षेत्रात, पत्रकारितेत आणि गौरविले आहे.आज दि.१ जानेवारी रोजी त्यांचा ५७ वा वाढदिवस.सरांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा..!
– डॉ.मारोती कसाब
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर
मोबाईल – ९८२२६१६८५३
सामाजिक चळवळीतील लढवय्ये नेते, सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे राज्य समन्वयक, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक,समाज भुषण सतिशजी कावडे यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य मिळो…मन: पुर्वक अनंत मंगल कामना!
उत्तम बाबळे,संपादक
प्रदेशाध्यक्ष – अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य
राज्य समन्वयक – सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती,महाराष्ट्र राज्य
मराठवाडा महासचिव – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ