Sat. Jan 11th, 2025

नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून इंजि.विश्वंभर पवार यांची नियुक्ती

Spread the love

तसेच माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायक कदम यांसह अन्य चौघांची ही झाली नियुक्ती

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उत्तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार व भोकर नगर परिषदेच्या लढवय्या माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख यांसह अन्य चौघांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर राज्य शासनाने नियुक्ती( नामनिर्देशित) केली असून या सर्वांच्या नियुक्तीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

प्रत्येक जिल्हास्थानी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते व त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी शासकीय निधी वाटपाचे नियोजन केल्या जाते.त्यामुळे जिल्हा नियोजन समितीस एक प्रकारे विशेष महत्त्व आहे व या महत्त्वपुर्ण निर्णायक समितीवर विद्यमान सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती (नामनिर्देशित) दिल्या जाते.सद्या राज्यात भाजपा,शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) या पक्षांच्या महायुतीचे सरकार सेवारत आहे.या सरकारच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) एक भागीदार पक्ष आहे.तसेच या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार हे विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर सेवारत आहेत.त्यामुळे प्रत्येक जिल्हा स्थानी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीवर या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य नियुक्त करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्फत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक यादी उपसचिव,महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडे काही दिवसांपुर्वी सादर केली होती.सदरील कार्यालयाने शासन निर्णय क्रमांक: डिएपी-२०२३/प्र.क्र.१००/का-१४८१-अ,मंत्रालय,मुंबई- ४०० ०३२,महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम,१९९८२) महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम,२०००,शासन निर्णय,दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी “महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कागे) (सुधारणा) अधिनियम, क्रमांक ३०/२०००” मधील कलम ३ चा पोटकलम (३) चार (फ) येथील तरतूदीनुसार सोबत जोडलेल्या विवरणपत्र “ख” मध्ये दर्शविलेल्या, सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या त्या प्रस्तावित यादीतील ०६ व्यक्तींना “विशेष निमंत्रित” सदस्य म्हणून नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती (नामनिर्देशित) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
त्या विशेष निमंत्रित सदस्य नियुक्तीत धडाडीचे कुशल समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर गोपाळराव पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम यांच्या मातोश्री तथा भोकर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख यांसह खान इरसाखान सरदारखान,माधवराव दिगंबरराव धर्माधिकारी,रामचंद्र नागनाथ पाटील बन्नाळीकर, राजश्री मनोहर भोसीकर या ०६ जणांचा समावेश असून नांदेड जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती, नांदेड यांनी शासनाचे सदरील आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावेत असे आदेश पत्र महाराष्ट्र शासनाचे उप सचिव नि.भा.खेडकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.जिल्ह्याच्या विविध विकास कामांच्या नियोजनात उपरोक्त सदस्यांचा अनुभव व ते ही कामी येणार असून त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच नवनियुक्त सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्व वरिष्ठांचे आभार मानले आहेत.

सर्व नवनियुक्त सदस्यांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी मनापासून शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !