अण्णा भाऊंचे सहकारी स्वातंत्र्य सेनानी काॅ.मुर्गप्पा खुमसे यांना अखेरचा लाल सलाम!
आज बेलवाडी ता.रेणापूर जि.लातूर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गप्पा काशिनाथप्पा खुमसे यांचे दि.२१ डिसेंबर दु:खद निधन झाले.त्यांच्या जीवनकार्याविषयी डॉ.मारोती कसाब यांचा विशेष लेख…
अंबुज प्रहार विशेष
स्वातंत्र्याच्या काही वर्ष आधी मराठवाड्याची पुरती दैना झालेली होती.१९४० ते ५० या दशकात निजामशाहीलाही उतरती कळा लागली होती.आपल्या राज्यकारभारावरचे निजामाचे नियंत्रण उडाले होते. प्रशासन पूर्णपणे जमीनदार- सरंजामदार आणि भांडवलदार यांच्या हातात गेलेले होते.कर वसुलीसाठी नेमलेले पाटील-पांडे त्याला जड झाले होते.तिकडे देशभर स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती आणि त्याच काळात निजाम आपले राज्य कायम ठेवण्यासाठी वाटेल ते करायला उतावीळ झालेला होता आणि याचाच फायदा रझाकारांनी घेतला.निजाम हैदराबादेत बसून रजाकारांवर आणि हजारो एकर जमिनी बळकावून गढ्या बुरुजावर डोमकावळ्यांसारखे बसलेल्या पाटील- पांड्यांवर अवलंबून राहिला.सामान्य जनता रझाकारांनी आणि सरंजामदारांनी अक्षरक्षः पिळून काढली. म्हणूनच स्वामी दयानंद सरस्वतींची आर्य समाज चळवळ मराठवाड्यात सुरु झाली.आर्य समाजाच्या ‘सत्यार्थप्रकाश’ या ग्रंथाच्या अकराव्या अध्यायावर निजामाने बंदी घातली.या काळात आर्य समाजाला दलित व बहुजन समाजातून मोठा अनुयायी वर्ग लाभला,कारण आर्य समाजाने जातीपाती मोडण्याचे,अस्पृश्यता नाकारून मानवतादाचे कार्य सुरू केले होते. अखिल भारतातून आर्यसमाजी कार्यकर्ते मराठवाड्यात येत होते.त्याच वेळेस शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले.मराठवाड्याच्या सीमेवर कसबे तडवळे मुक्कामी त्यांनी २२ व २३ फेब्रुवारी १९४१ हे दोन दिवस थांबून ‘महार मांग वतनदार परिषद’ घेतली.
याच काळात मराठवाड्यात कम्युनिस्ट विचारांची मंडळीही कामाला लागली.दलित,शेतकरी- कष्टकऱ्यांच्या एकजुटीसाठी शाहीर अमर शेख,द.ना.गवाणकर,विश्वासराव फाटे,शाहीर जंगमस्वामी,शाहीर लहरी हैदर अशी मंडळी मराठवाड्यात येत होती आणि त्याचवेळी ज्यांची प्रतिभा कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाजूने तलवारीसारखी तळपत होती असे लोकशाहीर,साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे हे ही मराठवाड्याशी जोडले गेले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी अण्णा भाऊ पहिल्यांदा १९४९ च्या सुमारास मराठवाड्यात आले होते. “बेळगाव,कारवार,डांग,निपाणी,भालकी-बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”,या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे यांसह कैक शाहीरांनी आणि कलावंतांनी अक्षरक्षः जीवाची बाजी लावली होती.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबरोबरच मराठवाड्यात डाव्या पुरोगामी नेत्यांचा शिरकाव झाला. राज्यात काँग्रेस हा एकाच वरचढ जातीचा पक्ष असून,तो बहुजनांना न्याय देऊ शकणार नाही या भूमिकेतून ब्राह्मणेतर चळवळीचे नेते एकत्र आले.त्यांनी शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला.
भारतात कम्युनिस्ट पक्षाने आपले कार्यकर्ते सर्वत्र निर्माण केले.अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर कार्यकर्ते होते.त्यामुळे तेही मराठवाड्यात आले.मराठवाड्यात शेतकरी,कष्टकऱ्यांची आणि दलितांची एकजूट करण्यासाठी अण्णा भाऊंनी जवळ जवळ तीन चार महिने मराठवाड्यात वास्तव्य केले.अण्णा भाऊंच्या मराठवाड्यातील वास्तव्याचा आणि कामगिरीचा शोध घेताना अण्णा भाऊंचे एक तत्त्वनिष्ठ सहकारी ‘कॉम्रेड मुर्गप्पा खुमसे’ हे लातूर जवळच्या रेणापूर येथे राहायला असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी यांच्याकडून समजली.त्यामुळे रविवार दि.८ मार्च २०२१ रोजी ठरवून आम्ही रेणापूर गाठले.रामराव गवळी आणि मी सकाळीच अप्पांच्या घरी पोहोचलो.
कम्युनिस्ट पक्षाचा जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ता कसा असतो,याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड मुर्गप्पा खुमसे..!’
दोन-अडीचशे वर्षांपूर्वी कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील खुमसगी या गावचे एक लिंगायत कुटुंब स्थलांतरित होऊन लातूर जवळच्या रेणापूर येथे येऊन स्थिरावले.मुर्गप्पांचे वडील काशिनाथप्पा सातप्पा हे कसलेले पहिलवान होते.त्यांनी स्वकष्टाने शेती घेतली. मुर्गप्पा हे वयाच्या २१ वर्षांपर्यंत आपल्या आई-वडिलांना एकुलते एकच होते; त्यानंतर त्यांना एक भाऊ झाला.मुर्गप्पांचा जन्म १४ एप्रिल १९२१ रोजी झाला.मात्र जेव्हा त्यांना अंबाजोगाईच्या राष्ट्रीय विद्यालयात दाखल करण्यात आले,तेव्हा त्यांची जन्मतारीख १४ एप्रिल १९२६ अशी नोंदवली गेली.अंबाजोगाई हे तेव्हा बीड जिल्ह्यातील ‘मोमिनाबाद’ म्हणून ओळखले जात होते.तिथे स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे धाकटे बंधू बेथुजी गुरुजी खेडगीकर,बाबासाहेब परांजपे आदींनी राष्ट्रीय विद्यालय सुरू केलेले होते.या शाळेतील वातावरण देशप्रेमाने भारावलेले होते. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आपले दुःखद जीवन अनुभव सांगत होते.सरंजामदार आणि रझाकारांच्या छळाच्या कहाण्या ऐकून मुर्गप्पांचे बंडखोर मन पेटून उठले.१९४२ ला देशभर चलेजाव चळवळ सुरू झाली. याच काळात झेंडा सत्याग्रह केला म्हणून मुर्गप्पांना अटक झाली.बर्दापूरच्या गढीवर त्यांनी तिरंगा फडकवला.लातूरच्या दयाराम रोडवरील सरकारी पोस्ट खात्याच्या बोर्डावर काळ्या डांबराने स्वातंत्र्याच्या घोषणा लिहिल्या होत्या.
सातवीला असतानाच भारतीय स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना पहिल्यांदा दोन दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला.त्यानंतर भूमिगत झाल्यामुळे त्यांना शाळा कायमची सोडावी लागली.अगदी तारुण्यात मुर्गप्पा हे आर्य समाजाच्या संपर्कात आले.त्यामुळे त्यांचा देवाधर्मावरचा आणि खुळचट रूढी परंपरांवरचा, माणसात भेदभाव निर्माण करणाऱ्या जाती व्यवस्थेवरचा विश्वास उडाला.ते कट्टर विज्ञानवादी,नास्तिक आणि विवेकनिष्ठ बनले.ते शेवटपर्यंत आपल्या परिवर्तनवादी विचारांवर ठाम राहिले.त्यांच्या घरात कुठेही देवाधर्माचा फोटो दिसला नाही की,अंगावर गंडा दोरा.आम्ही भेटलो तेव्हा शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले मुर्गप्पा हे सळसळत्या चैतन्याचे मूर्तिमंत उदाहरण दिसले.या वयातही ते पहाटे लवकर उठत.थंड पाण्याने आंघोळ करत. व्यायाम करत आणि साधा आहार घेत.सातत्याने गोरगरिबांच्या बाजूने विचार करणारे कॉम्रेड मुर्गप्पा खुमसे हे शंभरीतही चष्म्याशिवाय वाचन करत,लिहित.मशिन शिवाय ऐकत.आम्ही त्यांच्या भेटीसाठी गेलो तेव्हा त्यांनी संभाव्य मुलाखतीची तयारी करून ठेवली होती.काही मुद्दे त्यांनी स्वतःच्या अक्षरात लिहून ठेवले होते.गेल्यागेल्या चहापाणी झाल्यानंतर ओळखीपाळखी झाल्या.थोडीशी बातचीत झाली.त्यानंतर मध्येच त्यांनी आग्रहाने आम्हाला जेवायला बसवले.तेही आमच्या सोबत खाली बसून जेवले.ते लढवय्ये कार्यकर्ते होते; तसेच हळव्या मनाचे कवीही होते.दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या बाजूनं नुकतीच लिहिलेली एक कविता त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.चार-पाच तासांच्या आमच्या भेटीत आप्पा सारखं बोलत होते.किती सांगू आणि किती नको असं त्यांना झालं होतं.चळवळीचा विषय निघाला की आप्पांच्या अंगामध्ये इन्किलाब संचारायचा.
आप्पांची संपूर्ण जडण-घडण आम्ही ऐकून घेतली. स्वातंत्र्याच्या चळवळीत लढलेला हा सच्चा कॉम्रेड सुभाष बाबूंच्या आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांनी भारावलेला.इंग्रजांच्या तुरुंगातून एका पानगावच्या गालफाडे नावाच्या मातंग तरुणाच्या सहाय्याने जेलचे गज कापून आप्पांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन धूम ठोकली होते. पोलिसांच्या बंदुका पळवल्या होत्या.पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अनेक वर्ष भूमिगत आयुष्य कंठले होते.स्वातंत्र्यानंतर आप्पांनी विविध सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेतला. ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र’ या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आप्पा झटत होते.१९५३ सालच्या जानेवारी महिन्यात ११ तारखेला मुंबईतील दादरच्या वनमाळी हॉल मध्ये झालेल्या लोकनाट्य परिषदेत अण्णा भाऊ साठे यांची व त्यांची पहिल्यांदा भेट झाली.या परिषदेत महामहोपाध्याय द.वा.पोतदार आणि न.र.फाटक हे प्रमुख पाहुणे होते.तिथेच अण्णा भाऊंची शाहिरी ऐकून आपण अण्णा भाऊंच्या प्रेमात पडलो असे अप्पा सांगतात.
आधी आर्यसमाजी,नंतर स्टेट काँग्रेसचे,त्यानंतर पीडीएफचे कार्यकर्ते असलेले मुर्गप्पा हे नंतर कट्टर कम्युनिस्ट बनले ते अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या शाहीरांमुळेच.अप्पांनाही शाहिरीचा छंद लागला.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही आप्पा कविता करत राहिले. ‘माझे जीवन गाणे’ हे त्यांचे काव्य प्रसिद्ध आहे.त्यांच्या कवितांचा एक संग्रहही प्रसिद्ध झाला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या अनेक आठवणी त्यावेळी अप्पांनी सांगितल्या.अहमदपूर जवळच्या खानापूर या गावचे काॅम्रेड विठ्ठलराव देशपांडे हे हैदराबाद येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण करून आले होते.त्यांनीच रेणापूर जवळच्या मोहगाव येथे कम्युनिस्ट चळवळीतील शाहिरांच्या प्रशिक्षणाचे शिबिर ठेवले होते.या शिबिरासाठी अण्णा भाऊ साठे हे त्यांच्या कलापथकासह मुंबईहून आले होते.या शिबिरात जवळपास शंभर कलापथकांनी सहभाग घेतला.शिबीर संपल्यानंतर जवळच्याच कामखेडा या गावात गावकऱ्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीचा मोठा कार्यक्रम ठेवला होता.कामखेडा हे मुर्गप्पांचं आजोळ.मोहोगावहून अण्णा भाऊ साठे हे पायी पायी चालत कामखेडा येथे आले होते.तेथील काॅम्रेड पांडुरंग गुडे( माजी साखर आयुक्त के.ई.हरिदास यांचे सासरे) यांच्या वाड्यात अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कलापथकासह मुक्काम केला.कामखेड्यात झालेल्या कार्यक्रमाला लातूर,बीड परिसरातून लोक बैलगाड्या जुंपून आले होते.रात्र भर अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी चालू होती.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणेतून लातूर परिसरात सामाजिक प्रबोधनाचा जागर घालणारी अनेक कलापथके उदयाला आली.आम्हीसुद्धा त्यांच्या प्रेरणेतून ‘मराठवाडा कलापथक’ काढले होते,असे काॅम्रेड मुर्गप्पा खुमसे यांनी आम्हाला प्रदीर्घ मुलाखत देताना सांगितले होते.
कामखेड्याची शाहिरी परिषद संपल्यानंतर एक दिवस मुद्दामहून अण्णा भाऊ साठे आपल्या कला पथकासह रेणापूर येथे मुर्गप्पांच्या वाड्यात मुक्कामाला राहिले.
‘आमच्या लिंगायत गल्लीत सगळी काॅंग्रेसला माणणारी मंडळी.आमचंच घर लाल बावट्याचं.आमच्या घरी एक मोठा शाहीर आणि लेखक मुक्कामी आलेला आहे हे कळताच अण्णा भाऊ साठे यांना पाहण्यासाठी गावातील अनेक लोक जमले होते.माझ्या घरी साधी भाजी भाकरी अण्णा भाऊ साठे यांनी खाल्ली याचा मला खूप आनंद झाला’,असे आवर्जून आप्पांनी सांगितले.दुसऱ्या दिवशी आम्ही बैलगाड्या जुंपून अण्णा भाऊ साठे यांना लातूरला पोहोचविले.तिथे दयाराम रोडवर आप्पाराव गवळी हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता स्वतः सलून चालवत होता.त्याच्या सलूनवर जाऊन अण्णा भाऊ साठे यांनी दाढी केली.गवळीच्या दुकानात कार्ल मार्क्स,लेनिन आदी कम्युनिष्ट नेत्यांचे फोटो पाहून अण्णा भाऊ साठे यांना खूप आनंद झाला.त्यानंतर आम्ही अण्णा भाऊ साठे यांना लातूर रेल्वे स्टेशन वरून मिरज गाडीने मुंबईला पाठवून दिले, ही आठवण मुर्गप्पा मन लावून सांगत होते.
त्यानंतर त्यांची अण्णा भाऊ साठे यांच्याशी मुंबईत अनेकदा भेट झाली.अण्णा भाऊ साठे यांच्या बरोबर अनेकदा गप्पा मारण्याचा योग त्यांना आला.तेव्हा अण्णा भाऊ साठे आपल्या पूर्वायुष्यातील गोष्टी सांगत असत.१९५२ साली मुंबईतील संयुक्त मतदार संघात लोकसभेच्या जागेसाठी काॅ.डांगे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे होते.अण्णा भाऊ साठे यांनी डांगे यांचा प्रचार केला.काॅ.डांगे यांची निवडणूक निशाणी रेल्वे इंजिन होती.तेव्हा अण्णा भाऊ साठे यांनी एक गाणं तयार केलं होतं.
“डांगे ड्रायव्हर मिळालाय बाका
मतं इंजिनाच्या पेटीत टाका”
असं ते गाणं होतं.अण्णा भाऊ साठे प्रत्येक निवडणुकीला समितीचा,कम्युनिस्ट पक्षाचा.प्रचार करण्यासाठी बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात येत असत. याकाळात अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य बरेच दिवस अहमदपूर जवळच्या धसवाडी येथे होते.साकोळ जवळगा,माळेगाव यात्रा,उदगीर,अहमदपूर,लातूर, भालकी,बिदर अशा अनेक गावांमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या सभा झाल्या.गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आम्ही सोबत काम केले ही आठवणही कॉम्रेड मुर्गप्पा खुमसे यांनी सांगितली.
अण्णा भाऊ साठे हे हाडाचे कलावंत होते.तसेच ते निष्ठावंत कॉम्रेड होते.त्यांच्याकडे अफाट प्रतिभाशक्ती होती. बसल्या बसल्या ते गाणी लिहित.स्वतःच गाण्यांना चाली लावत.या चाली बहुदा लोक गीतांच्या असत. अण्णा भाऊ साठे यांचा स्वभाव एका जागी थांबण्याचा नव्हता.ते सतत घाईगडबडीत असत.शेवटी आयुष्याचीही त्यांनी घाईच केली,हे सांगताना अप्पांना गलबलून आले होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या स्वभावाचे अनेक पैलू यावेळी आप्पांनी आम्हाला उलगडून दाखविले.या मुलाखतीत अण्णा भाऊ साठे यांचे…
“दौलतीचा राजा
उठून सर्जा
हाक दे शेजाऱ्याला रे
शिवारी चला”…
हे संपूर्ण गीत त्याच आवेशात आणि आवेगात त्यांनी आम्हाला गावून दाखवले.यावेळी आप्पा पुर्णतः अण्णा भाऊमय झाले होते.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण जीवन लोकसेवेला वाहिले म्हणूनच ते महान होते,असेही या मुलाखतीच्या शेवटी आप्पा म्हणाले.
वयाची शंभरी पार करूनही अप्पा आरोग्य संपन्न जीवन जगले.ज्यांनी आप्पांना चळवळीत अखंड साथ दिली त्या त्यांच्या सहचारिणी निर्मलाबाई यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले.आप्पांचा एक मुलगाही ऐन उमेदीच्या काळात वारला. मात्र या धक्क्यांतूनही आप्पा सावरले ते केवळ लोक चळवळीमुळे.लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढे उभे केले.’आपलं कसं होईल’ हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही; लोकांचं कसं होईल? हाच विचार ते शेवटपर्यंत करीत होते.
अप्पांवर बुद्ध-बसव-फुले-शाहू-आंबेडकर, गाडगेबाबा-अण्णा भाऊंचे संस्कार झालेले होते.एकदा रेणापूर ग्रामपंचायत आप्पांनी लढवली आणि जिंकली.लोकांनी पैसेही दिले आणि मतही दिले होते.मात्र नंतरच्या निवडणुकांमध्ये आप्पांनी फक्त डाव्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार केला.
त्यांना भारत सरकारने स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल ताम्रपट देऊन गौरविले आहे.लातूर येथील पत्रकार महारुद्र मंगनाळे यांनी त्यांच्या छायाचित्रांचे आणि पत्रांचे संकलन करणारा एक संदर्भग्रंथ संपादित केला आहे.आपल्या जीवनात आप्पांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली.अनेक चळवळी पाहिल्या.ते कम्युनिस्ट असले तरी पोथीनिष्ठ कम्युनिस्ट नव्हते.मुळात ते मानवतावादी होते.सत्यवादी होते.जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय झाला, तेव्हा तेव्हा आप्पांनी त्या विरुद्ध आवाज उठविला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे या मागणीसाठी त्यांनी सत्याग्रह केला. जेल भोगली.त्याचबरोबर लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली पाहिजे,यासह अनेक न्याय्य मागण्यांसाठीही आप्पांनी आंदोलने केलेली आहेत. सामान्य जनतेच्या,शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांचे रक्त सळसळत असायचे.अन्यायाविरुद्ध त्यांची वाणी आग ओकायची.अशा बहुआयामी समाजसेवी स्वातंत्र्य सेनानीचे काल दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजता रेणापूर जि.लातूर येथे निधन झाले.स्वातंत्र्य चळवळीतील एक धगधगते अग्निकुंड निमाले. जनतेच्या प्रश्नांसाठी जागरूक असलेला एक नेता आपल्यातून निघून गेला…
आज दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता बेलवाडी ता.रेणापूर जि.लातूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.ते लातूर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर प्रा.डॉ.स्मिता खानापूरे यांचे चुलते होत.त्यांच्या एक मुलगा,तीन मुली,दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.स्वातंत्र्य सेनानी काॅम्रेड मुर्गप्पा खुमसे यांना भावपूर्ण आदरांजली…अखेरचा लाल सलाम..!!
-डॉ.मारोती कसाब
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर मो. ९८२२६१६८५३
स्व.स्वातंत्र्य सेनानी काॅम्रेड मुर्गप्पा खुमसे यांना संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली…अखेरचा लाल सलाम..!!