Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

अंबुज प्रहार न्युज लाईव्ह ही भोकर येथून प्रकाशित होणारी पहिली ऑनलाईन वृत्तवाहिनी असून गेल्या ९ वर्षापासून न्यायीक लोकहितार्थ सेवारत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही या माध्यमातून ऑनलाईन दिवाळी विशेषांक-२०२३ आपणास उपलब्ध करून देत आहोत.यासाठी वाचक,हितचिंतक, जाहिरातदार,कवि,लेखक,पत्रकार अर्थातच आपण सर्वांनी आम्हावर भरभरून प्रेम केलं आहे व अमुल्य योगदानासह सहकार्य केले आहे.त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.सर्वांचे अगदी मनापासून खुप खुप धन्यवाद आणि दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
✍️✍️
संपादक

******************************************

संपादकीय…✍️

उत्तम वामनराव बाबळे
संपादक -अंबुज प्रहार न्युज लाईव्ह
संपादक -मानवहित-मराठी बातमी लाईव्ह

मुक्त समाज माध्यम स्वीकारलय… परंतू वाढती नागरिक पत्रकारिता आव्हान ठरतेय काय…?

मुद्रित(प्रिंट),रेडिओ,टी.व्ही,यांसह वेबपोर्टल,युट्यूब,डिजिटल, पॉडकास्ट,फेसबुक,व्हाट्सअपस,ट्युटर,इन्स्ट्राग्राम अशी अनेक माध्यमं पत्रकारितेत आली आहेत व येत राहतील.बदलणार नाही तो कन्टेन्ट,परंतू कन्टेन्टचा फॉर्म मात्र बदलत राहणार आहे.मराठी पत्रकारितेने नवीन प्रवाह आत्मसात करायला हवेत.नवनवीन माहिती घ्यायला पाहिजे व ती इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतांना न्यायीक दृष्टिकोन ठेवायला हवा.नवनविन भूमिका घ्यायला हव्यात.पारंपारिक मराठी पत्रकारिता व पत्रकार तशा भूमिका घेण्यात कधीही मागे नव्हते आणि आजही नाहीत.त्या भूमिका त्यांनी सदैव घेतल्या आहेत व त्या भूमिकांसाठी जी किंमत मोजावी लागते ती मोजलेली देखील आहे.त्यामुळेच पत्रकारिता टिकून राहिली आहे व पुढे तशी किंमत मोजण्याची तयारी ठेवली तरच भविष्यात पत्रकार आणि पत्रकारिता टिकू शकेल.नाहीतर पत्रकारितेचं स्वरूप निश्चितच परिनामशुन्य झालेले पहावयास मिळाले तर नवल वाटणार नाही.
वृत्तपत्रे,नियतकालिकांच्या विश्वाचे छपाई तंत्रज्ञानाच्या उदयानंतर वाढलेले अगाध असे महत्त्व असून ते येथील लोकांना स्वाभिमानी जीवनावलीकडे वळवण्याची बांधीलकी जपत होते व हे सारं व्रत स्वीकारलेल्या आणि ते आपले उत्तरदायित्व आहे असे मानणाऱ्या पत्रकारांच्या पत्रकारितेमुळे टिकून होते,नव्हे तर आजही आहे.पत्रकारितेचे स्वरूप इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या,दृश्य माध्यमांच्या,इंटरनेट, मल्टीमीडिया मुक्त समाज माध्यमांच्या माहिती महामार्गाच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बाह्य बदलत गेले.जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली पत्रकारिता देखील अंतर्बाह्य बदलत आहे.
पत्रकारितेबाबतची कर्तव्ये,उत्तरदायित्व,वास्तवाची सखोल व्यापक जाण पत्रकारितेचे रीतसर,व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसतानादेखील अगोदरच्या व हयात असलेल्या कित्येक जुन्या पत्रकारांच्या पिढ्यांना होती आणि आजही आहे,किंबहुना पत्रकारितेला दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानामुळेच पत्रकारितेची कर्तव्ये व उत्तरदायित्व काय असतात,त्याचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या त्या वस्तूपाठाची जाणीव पदोपदी दिसूनच येते.परंतू ती जाण आज संवादमाध्यमांचे शिक्षण घेऊन आलेल्या काही जणांत दिसून येत असली तरी पुढच्या पिढीच्या अनेकांतून अजिबात दिसून येणार नसल्याचे जाणवत आहे.माध्यम विश्वातली अभिव्यक्तपीठे काही मंडळींनी विशिष्ट विचार व्यक्ततेसाठी वर्ज्य केली होती.नव्हे तर त्या अभिव्यक्तपीठांची दारे बंद केली होती.परंतू मुक्त समाज माध्यम मीडियाच्या उदयामुळे पत्रकारितेच्या व  वार्तांकनाच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि मुक्त अभिव्यक्तपीठांची दारे उघडली आहेत.व्यवसाय पत्रकारिता, डेटा पत्रकारिता,ड्रोन पत्रकारिता,गोंझो पत्रकारिता,शोध पत्रकारिता,छायाचित्र पत्रकारिता,चलचित्र पत्रकारिता,राजकीय पत्रकारिता,सेन्सर पत्रकारिता,क्रीडा पत्रकारिता,टॅब्लॉइड पत्रकारिता,पिवळी पत्रकारिता,जागतिक पत्रकारिता,फेक न्युज पत्रकारिता,डीफफेक पत्रकारिता,मुक्त माध्यम पत्रकारिता यातून करता येणे शक्य झाले आहे.फेसबुक,व्हॉट्‌सअप, युट्यूब,ट्युटर,इन्स्ट्राग्राम सारख्या समाज माध्यमांनी त्या काही अभिव्यक्तपीठांच्या बंद झालेल्या दारांच्या मागे न लागता अभिव्यक्ततेसाठी नवी मुक्त सामाजिक माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत.आर.एन.आय.ने जशी कायदेशीर बंधने व नियमावली माध्यमांवर टाकलेली आहे.तशी नियमावली अद्यापही तरी या मुक्त समाज माध्यमांवर टाकलेली नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली यावर मुक्ततेने अभिव्यक्त होता येत आहे.परंतू यातून काही तथाकथित ‘नागरिक पत्रकारांचा व नागरिक पत्रकारितेचा’ उदय झाला आहे.काही माध्यमांचे मालक व संपादकाच्या कृपाभिलाषेचा कटाक्ष पडला तरच मजकूर प्रकाशित होत होता.परंतू आता या मुक्त समाज माध्यमातून नव्या लेखक आणि संपादकांची एक ऑनलाईन पिढी तयार होत आहे.मुक्त समाज माध्यमांमुळे या सगळ्या मक्तेदार्‍या मोडीत काढून अधिक वाचकसंख्या असलेले लेखक,ब्लॉगर्स आणि समाज माध्यम अभिव्यक्तीकार, पत्रकार निर्माण झाले आहेत.जुन्या मक्तेदार्‍या मोडीत निघत आहेत व पारंपरिक माध्यमांनाही आता स्वत:च्या समाज माध्यम ऑनलाईन वाहिन्यांवर सामील व्हावे लागत आहे.नव्हे तर त्या माध्यमांना व माध्यम पत्रकारांना समाज माध्यमांवर आपल्या बातम्यांचे कात्रने टाकावी लागत आहेत.पारंपरिक माध्यमांना गेल्या काही वर्षांत आपलं रूप बदलावं लागत आहे.तसं त्यांनी ते ‘इंटरनेट’च्या आक्रमणानंतर बदललेही आहे.आता प्रत्येक वृत्तपत्राची व इलेक्ट्रॉनिक माध्यमसमूहाची वेबसाईट,ट्विटर हॅण्डल, युट्यूब आदी मार्गाने सुरू आहेत. त्याचबरोबर वाचक व दर्शक यांना त्यात सहभागी करून घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

पारंपरिक माध्यमांना ‘स्मार्ट फोन’ मधली ही समाज माध्यमे शह देऊ पाहत आहेत.डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीने इंटरनेटवरील बातम्यांच्या प्रकाशनासह पत्रकारितेची भूमिका आणि स्थिती गेल्या दोन दशकांमध्ये बदलत आहे.यामुळे प्रिंट मीडिया व चॅनेलच्या वापरामध्ये ही बदल झाला आहे,कारण लोक -रीडर,स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे बातम्यांचा वापर वाढवत आहेत.आता तर अगदी ग्रामीण भागात ही वेबसाईट,वेब पोर्टल,ब्लॉग,युट्यूब चॅनेल्स सुरू झाले आहेत.त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलण्याचं आव्हान पत्रकारांसमोर प्रतिदिवस उभे राहत आहे.बातमी देण्याची स्पर्धा आता गाव-खेड्यापर्यंत पोहोचली आहे.अनेक स्थानिक चॅनेल्स सुरू झाले आहेत.त्यामुळे या २४ बाय ७ च्या स्पर्धेत टिकण्याची गरज स्थानिक पातळीवरील पत्रकारांत निर्माण झाली आहे.त्यामुळे आज जो तो स्वत:च या मुक्त समाज माध्यमांवर व्यक्त होण्याचा व स्वत:ला आवडलेला मजकूर पुढे पाठवण्याचा (फॉरवर्ड) प्रयत्न जोमानं करत आहे.यातूनच ‘ब्रेकिंग न्युज’ ची स्पर्धा ही सुरु झाली असून या स्पर्धेत राहण्यासाठी काही पारंपारिक व समाज माध्यम पत्रकारांना ती बातमी खरी का खोटी यांची शहानिशा करण्यात वेळ घालविण्यात रस राहिला नसून ‘कॉपी-पेस्ट’ करुन आपली बातमी पुढे ढकलण्यात आनंद होत आहे.तर काही पत्रकारांना मुक्त मसाज माध्यमांवरील उपलब्ध असलेला तो मजकूर उसना घेऊन बातम्या द्याव्या लागत आहेत.लोकशाही व्यवस्था ही ज्या कार्यपालिका,न्यायपालिका व कायदेमंडळ या तीन स्तंभांवर आधारलेली आहे व तिचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला जगभरच स्थान प्राप्त झालेले असले तरी दुसरीकडे आजघडीला हा आधारस्तंभ बहुतांशी आर्थिक निकष आणि सक्षमतेवर उभारल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्याच्याजवळ अधिक आर्थिक क्षमता आहे त्यांचे माध्यम ही सक्षम आहे असे समजणे प्रचलित झाले आहे.यातून वेगवेगळ्या स्वभावाच्या पत्रकारितेने तथाकथित व्यावसायिक पत्रकारितेचा पोशाख आज धारण केला आहे.यामुळेच सध्या काही पत्रकारांमध्ये प्रशासकीय,राजकीय व वैचारिक पातळीवर विविध गट पहावयस मिळत आहेत.पत्रकारिता हा तसा वैचारिक, स्वाभिमानी व शोषित,वंचित,पीडितांना न्याय मिळवून देणारा प्रांत आहे.परंतू आता त्याला प्रशासकीय, पक्षीय,राजकीय,व्यावसायिक अभिनिवेशही जडला आहे. यातून काहीअंशी बातमीतली वस्तुनिष्ठता हरवत चालली आहे? सध्याच्या काळात प्रिंट,टी.व्ही.,डिजिटल हे मतभेद तितके काटेकोर राहिले आहेत असे मला वाटत नाही.आता वेगवेगळे माध्यमसमूह या तिन्ही माध्यमांतून समतोल साधण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्यामुळे मी प्रिंटसाठी काम करतो,मी टीव्ही किंवा डिजिटलसाठी काम करतो,असं म्हणण्यापेक्षा आता पत्रकारांनी या सगळ्या माध्यमांसाठी सारखेच काम करतोय असे म्हटले पाहिजे.तसेच डिजिटलसाठी कन्टेन्ट बनवायला शिकणं सुरु केले पाहिजे.त्याचा फायदा खऱ्या पारंपारिक पत्रकारांना होवो अथवा न होवो,काही कॉपी पेस्ट बहाद्दरांना मात्र नक्कीच होईल व काहींना होत असल्याचे ही निदर्शनास येत आहे.

मुक्त समाज माध्यमांमुळे पारंपारिक पत्रकारांच्या स्पर्धेत आता सहजरित्या नागरिक ही उतरल्याचे निदर्शनास येत आहे. सामान्य व सुज्ञ नागरिक मुक्त समाज माध्यमांचा सदुपयोग करत आहेत व सर्वांनी देखील करणे अपेक्षित आहे.परंतू यातून उदयास आलेल्या नागरिक पत्रकारितेचा काही लोक फायदा व गैरफायदा ही घेतांना दिसत आहेत.इंटरनेटच्या माध्यमातून ते शक्य ही होत आहे.व्हिडिओ कॅमेरा-सुसज्ज स्मार्टफोन्स वापरून पत्रकारां ऐवजी काही सोशल मीडिया पदाधिकारी व काही नागरिक आता विविध कार्यक्रम,सोहळे,घटनांच्या बातम्यांचे फोटोज् व फुटेज रेकॉर्ड करुन फेसबुक,ट्युटर, व्हाट्सअपस,युट्यूब सारख्या चॅनेलवर अपलोड करण्यास सक्षम झाले आहेत.हा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ असला तरी काही ‘लोभी’ लोक याचा गैरफायदा ही घेत आहेत.जसे की, वर्षातील एक मोठा सण व एका विशिष्ट महिन्यात पत्रकारितेचा कसलाही गंध नसलेले तथाकथित काही लोक नागरिक पत्रकारितेचे लाभार्थी पत्रकार म्हणून उदयास येतात.तसेच जाहिरातींच्या माध्यमातून ‘..‌.मागणी’ करतात.हे करतांना प्रशासकीय अधिकारी,राजकीय पदाधिकारी,प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या बाजूने असणाऱ्या ‘त्या’ काही जणांना थोडे झुकते माप देतात.तर केवळ हंगामी नागरिक पत्रकारिता करणाऱ्यांना बाजूला सारतात.यातून द्वेषी पत्रकारिता उदयास येते व त्या लोकांच्या विरुद्ध मुक्त समाज माध्यमांवर लिहण्याचे दबावतंत्र वापरल्या जाते.यातून खंडणी व अब्रूनुकसानीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार ही होतात.यामुळे काही अपवादात्मक असलेल्या ‘त्या’ लोकांकडून पत्रकारिता क्षेत्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय काय ? यावर चिंतन करणे व तशा लोकांवर आवर घालणे गरजेचे आहे.कारण खऱ्या व प्रामाणिक पारंपरिक पत्रकारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.मग ते खरे पत्रकार कोणत्याही माध्यम क्षेत्रातले असोत…परिणामी आपल्या उपद्रवी शक्तीचे भय निर्माण करून वसूली तंत्राचा वापर करणाऱ्या ‘त्या’ तथाकथित पत्रकारांविरोधात पारंपारिक व समाज माध्यमातील खऱ्या पत्रकारांना बोलावं,लिहावं व निवेदनबाजी करावी लागत आहे. तसेच या नागरी पत्रकारितेतून ४ जी पत्रकारितेचे नवे आयाम जोडले गेले असले तरी यांच्या परिमाणावर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून विविध माध्यमांसाठी ही अमर्याद शक्यतांची व्याप्त परिस्थिती आणि वाढती नागरिक पत्रकारिता आव्हान ठरतेय काय…? असा प्रश्न उपस्थित करत आहे.
मुक्त समाज माध्यम पत्रकारिता क्षेत्रात ही बहुसंख्य खरे, प्रामाणिक व स्वाभिमानी पत्रकार आहेत.काही अपवादात्मक उपद्रवी असतील ही… म्हणून काय मुक्त समाज माध्यम पत्रकारिता खऱ्या पत्रकारांनी सोडायची काय…? तर नक्कीच नाही.पारंपरिक माध्यमांपुढे ही मुक्त समाज माध्यम पत्रकारिता मोठं आव्हान ठरत आहे म्हणून त्यावर निर्बंध लादणे ही योग्य नसून नव्या युगाच्या,नव्या तंत्रज्ञानाच्या या नव्या प्रवाहात सर्वांनी सामील होणेच योग्य पर्याय असणार आहे.म्हणूनच अशा प्रतिकूल परिस्थितीतही असंख्य परंपरागत व समाज माध्यम पत्रकारांनी आदर्श पत्रकारिता,कर्तव्य आणि आपले न्यायीक उत्तरदायित्वाची जपण्याचा प्रयत्न करत आपापल्या संकेतस्थळांच्या’ माध्यमातून चौथा स्तंभ लोकहितार्थ सन्मानाने उभा ठेवलेला आहे.अशांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील गेल्या ९ वर्षांपासून ‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ ही मराठी समाज माध्यम वाहिनी लोकसेवेत अर्पण केलेली आहे.भोकर येथे सर्वप्रथम सुरु केलेल्या या माध्यमातून न्यायीक लोकसेवेचे व्रत हाती घेऊन निष्कलंक मुक्त समाज माध्यम पत्रकारिता आम्ही सातत्याने करत आहोत….होय आम्ही ‘मुक्त समाज माध्यम पत्रकारिता’ स्विकारली आहे व आपण आम्हास स्वीकारले आहे.याची जाण आम्हास आहे.तसेच वाचक, हितचिंतक,जाहिरातदार,कवि,लेखक,पत्रकार अर्थातच आपण सर्वांनी आम्हावर भरभरून प्रेम केलं आहे.आपल्या अमुल्य योगदानामुळेच या खडतर मुक्त समाज माध्यम क्षेत्रात आम्ही तग धरून आहोत.आपण सर्वांनी आजपर्यंत सहकार्य केलेले आहेच,करत आहात व पुढे ही करालच असा ठाम विश्वास आम्हास आहे.आपल्या योगदानरूपी सहकार्यामुळेच आमचा हा खडतर प्रवास सुखकर झालेला आहे.हे कदापिही आम्ही विसरणार नाही.तसेच जनसामान्यांचे प्रश्न हे आमच्या केंद्रस्थानी असल्याने ‘शोध सत्याचा वेध न्यायाचा’ हे ब्रीद कदापिही आम्ही विसरणार नाही.तसेच अर्थ प्राप्तीसाठी सोयीची किंवा उपद्रवी पत्रकारिता ‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ या समाज माध्यम संकेतस्थळावरुन आम्ही कधीही करणार नाही,अशी ग्वाही देतो व थांबतो.
सर्वांचे मनस्वी धन्यवाद व दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

✍️

*****************************************

स्वाभिमानाची भूक….
(सिनेमा : ट्वेल्थ फेल)

स्वाभिमानाची भूक….
(सिनेमा : ट्वेल्थ फेल)

चित्रपट गृहांमध्ये प्रवेश केल्यानंतर सिनेमा पाहायला सुरुवात झाला.‘(12th Fail Movie Review) हा चित्रपट ‘आयपीएस मनोज कुमार शर्मा’ यांच्या जीवनावर आधारित आहे.मनोज कुमार शर्मा हे सध्या कदाचित तुमच्या परिचयाचे असतील किंवा नसतील. पण 12th Fail Movie Review हा सिनेमा पाहिल्यांनंतर तुम्ही या व्यक्तीला नक्कीच सॅल्यूट कराल. आजच्या तारखेला आयपीएस शर्मा हे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ‘मुंबई एअरपोर्ट’ला नियुक्त आहेत. पण… जर कोणी तुम्हाला सांगितलं की,जी व्यक्ती आज आयपीएस आहे;ती व्यक्ती बारावी नापास झाली होती. यावर तुमचा विश्वास बसेल का? होय! इयत्ता बारावी नापास झालेला व्यक्ती‘आयपीएस’ कसा झाला? याचे प्रेरणादायी उत्तर देणारा हा सिनेमा आहे.

हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकावर आधारित आहे.आणि हे पुस्तक आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची सत्य जीवनकहाणी आहे.मनोज कुमार शर्माची कथा चंबळच्या एका गावातून सुरु होते.आता चंबळ म्हंटल्यावर जे जे तुमच्या मनात आलं आहे…ते ते तसंच आहे. समोर बंदूक रोखलेला माणूस तुमच्या नजरेत आला ना? अचूक तीच परिस्थिती सिनेकथानकाच्या पार्श्वभूमीत आहे. आयपीएस चा अर्थही माहीत नसलेला मुलगा यूपीएससी मध्ये कसा? आणि का? उत्तीर्ण होतो.त्याची मैत्रीण श्रद्धा आणि तिचे प्रेम त्याला या सगळ्यात कसा पाठबळ देते? या सर्व प्रश्नांची उत्तरंं हा सिनेमा देतो.त्याला जरी मित्रांची साथ मिळाली,परंतु त्याच्या कष्टाने आणि जिद्दीने फळ प्राप्त करून दिलं.

जेव्हा तो ग्वालियरला जातो तेव्हा त्याच्या आजी कडून पेन्शनचे ते पैसे घेऊन जात असतो.त्यावेळेस बसमध्ये बाजूला बसलेली एक महिला त्याची बॅग पळवून घेऊन जाते.तेव्हा त्याची मात्र फजिती झालेली पाहायला मिळते.इथून पुढे मनोज कुमार शर्मा याची खरी जगण्याची धडपड सुरुवात होते.विधू विनोद चोप्राचे सिनेमे पाहिल्यास त्यांच्या कथाकथनासोबतच सिनेमॅटोग्राफीमध्येही वेगळेपण दिसते.’ट्वेल्थ फेल’ ही त्याला अपवाद नाही.चित्रपटातील प्रारंभीची चंबळची दृष्ये अनेक प्रसंगांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रित केली आहेत. डॉक्युमेंटरी शैलीत हातात कॅमेरा घेऊन केलेलं चित्रीकरण आपल्याला चटकन कथानकाशी परिणामी सिनेमाशी जोडून घेतो.सोबतच आणखी एका दृष्यात मनोज त्याच्या जुगाड गाडीने जात आहे.

त्यासोबत ड्रोन कॅमेराही फिरत आहे.अचानक एक कार त्याच्या समोर येते.अशा स्थितीत कट नसतो,कॅमेरा मागे सरकतो आणि घट्ट फ्रेम ‘वाइड अँगल’ बनते.हा काही नवीन प्रयोग नाही,पण कथानकाला सूचक आणि नक्कीच सुंदर आहे.मात्र,पूढे जेव्हा मनोज दिल्लीत येतो…तेव्हा कॅमेरा वर्क आणि सिनेमॅटोग्राफी अगदी कसदार आणि शार्प होते.हा दिग्दर्शकीय आणि सिनेमॅट्रोग्राफी पैलू वाखाणण्याजोगा आहे.

सिनेमाच्या कथानकाचा विचार करताना.टिव्हीएफच्या ‘ऍस्परन्ट’ काही ठिकाणी डोकावतो.यामध्ये तुम्हाला संदीप भैय्यासारखे कॅरेक्टरही पाहायला मिळेल,जो सगळ्यांना मदत करतो.म्हणजेच यूपीएससी इच्छुकांचे आयुष्य कमी-अधिक प्रमाणात असेच असते.या चित्रपटातही असेच जीवन पाहायला मिळते.काही दृष्ये खूपच भावूक झाली आहेत.मनोज एका लायब्ररीमध्ये काम करून तिथल्याच पुस्तकांचा अभ्यास करून त्याची तयारी मात्र जोमाने चालू असते.काही काळ ओलांडल्यानंतर तिथून तो निघून जातो आणि पिठाच्या गिरणीत काम करत असल्याचे एक दृष्य आहे.त्याचे वडील त्याला भेटायला येतात.या सीनमध्ये ‘मौनाचा’ वापर खूप छान झाला आहे.

गिरणीची घरघर अचानक बंद होते.आता प्रामाणिकपणा सोडून ते काळाबाजार करावी असा परिस्थिती प्रश्न त्यांच्यासमोर असतो.कथानकातील हे वळण उत्कृष्टपणे दिग्दर्शित करण्यात आलं आहे.तांत्रिकदृष्ट्या सिनेमा अव्वल रीतीने बनवल्याने तो पाहताना प्रेक्षक म्हणून आपण समृद्ध होतो.विशेषकरुन सिनेमाचे पार्श्वसंगीत आणि बॅकग्राऊंड स्क्रॉल.चित्रपटाची कथा अतिशय सहज आणि साध्या पद्धतीने वाहत पुढे जाते.

कथानकाबाबत सांगायचे तर सिनेमात मध्यप्रदेशातील चंबळ भागातील बिलग्राम येथे एक सर्वसामन्य कुटुंब आपले जीवन जगत आहे.या कुटुंबात आई,मुलगा (रामवीर शर्मा),सून आणि नातवंडे…असा परिवार आहे. आजोबा सैन्यात होते,मुलगा (रामवीर) ही त्याच्या वडिलांप्रमाणे प्रामाणिक आहे आणि सरकारी नोकरी करतोय.एके दिवशी वरिष्ठ अधिकारी त्याला धान्याच्या काळाबाजारात मदत करण्यास सांगतात,पण प्रामाणिक असलेला रामवीर भ्रष्टाचार करण्यास नकार देतो. परिणामी त्याला निलंबित केले जाते.

अगोदरच घरची परिस्थिती बेताची आणि आता नोकरी गेल्यानं आर्थिक अडचणही.रामवीरचा मुलगा अर्थात आपल्या सिनेमाचा कथानायक मनोज कुमार शर्मा (विक्रांत मैसी) आपल्या घरची दयनीय अवस्था पाहतोय. इयत्ता बारावीत नक्कल करुन उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवावी,या विचारात तो आहे.पण,त्याच्या आयुष्याला कलाटणी लागते आणि तो थेट आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहू लागतो.तो केवळ स्वप्नंच पाहत नाही तर…हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जीवाचं रान करतो.चंबळ पासून दिल्ली आणि दिल्ली पासून आयपीएस अधिकारी होण्याचा संघर्षमय प्रवास लीलया आपल्याला पडद्यावर दिसतो.

अभिनयाच्या आघाडीवर विक्रांत मेसीने आपली भूमिका पूर्ण आत्मविश्वासाने साकारली आहे.तो प्रत्येक टप्य्यावर त्याच्या पात्राला पूर्ण न्याय देतो.त्याच्या आत राग आहे,तो असहाय आहे.पण तो उभा आहे.हे सर्व भाव त्याच्या चेहऱ्यावर आणि देशबोलीत शिताफीने साकारले आहेत. प्रियांशू चॅटर्जी यांनी डीसीपी म्हणून आपल्या छोट्या भूमिकेतही छाप सोडली आहे. एक अभिनेता म्हणून त्याचे कौशल्य पाहण्यासारखे आहे जिथे तो मनोजला त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भेटतो.

येथे त्यांची प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल आदर दर्शवते आणि तरुणांना योग्य मार्ग निवडण्यासाठी प्रेरित करते,जे लाजवाब आहे.मनोजचे आई-वडील म्हणून गीता अग्रवाल शर्मा आणि हरीश खन्ना यांनीही छोट्या भूमिकांमध्ये आपली छाप सोडली आहे.एकंदरच सिनेमा तुम्ही पाहावा आणि आपापल्या परीने आपल्या क्षेत्राप्रमाणे (करिअर घडवण्यासाठी) त्यातून बोध घ्यावा. आणि स्वतःमध्ये जिद्द असल्यावर सिद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही,हे या चित्रपटांमधून पहायला मिळाले.आज समाजासमोर खूप मोठं आव्हान आहे की, आपली मुलं कुठे भरकट चाललेली आहेत ? त्याचा थोडाफार विचार करून प्रत्येक घरात मनोज कुमार शर्मा बनला पाहिजे, जर कोणी बनेल तर या देशाचा सर्जनशील नागरिक बनण्यासाठी त्यास वेळ लागणार नाही.आणि ज्यांना स्वाभिमानाची भूक लागते त्यांना अभिमानाचं सुख कळते.
– युवा साहित्यिक -सोनू दरेगावकर,नांदेड
– संपर्क मो. 7507161537 

****************************************

मसनातलं जिनं…

मसनातलं जिनं…
भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता. उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.बाभळगावात कोणतरी मेलं व्हतं,मनुन मसन राखायल ते निंघाले व्हते.आज दक्षिनाबी भेटलं आनं मेलेल्या मानसाचे जुने कपडे कुपडेबी भेटतीलं मनुन शिवराम मसनजोगी लगबगीनं निंघाला व्हता. बाभळगाव व शेजारची वाकडेवाडी आश्या दोन गावांत तो मसन राखायच काम करायचा.कव्हा या गावात तं कव्हा त्या गावात आसं सारखं त्यो भटकत राह्याचा.खरं पाह्यलं तं एखांद जिवन संपलं की लोकं मसनात जातात पण मसनजोग्यांचं मात्र जगनचं त्या एखांद्या जिवाच्या शेवटानंतर सुरू व्हायलं लागते. संसाराचं सगळं सामानं तेह्यनं संगच्या रेडकाच्या पाठीवर टाकलं व्हतं.आन लगबगीनं ते अंत्यसंस्काराच्या वढीनं झपझप पावलं टाकु लागले.
मसनाजवळ पव्हचताच शिवराम मडं जाळायसाठी सरण रचायच्या कामालं लागला.तं सारजी,शेवंता अन पिर्‍या पाल ठोकुन तेह्यचं सामान लावाण्यात गुतले.सारजीनं पटकनं पळत जाऊन एका मड्यावरची राख उचलुन आनुन भांडे घासले. तेव्हड्यातं राम नाम सत है चा आवाज यायलं लाडला.तसं शिवराम मसनजोगी सरसावला.त्याच्या हातातली भलीमोठी ‘टनमन’ घंटा ढनंऽऽ ढनंऽऽ वाजवत जोर्‍यातं शंकु फुंकला अन कपडा आथरून स्मशानाबाहेर घंटानाद करीत बसला.समोर एक कपडा आथरलेला व्हता.त्या कपड्यावर एक दोन देवायचे फुटु,आन जवळची साबुत कवटी ठुलेली व्हती.‘माती’ आटोपून लोक बाहीर यालं लागले की,“सोडवण टाका बापू सोडवण… हेच सोबत येणार हाय बापू, हे पुण्याचं काम हाय….सोडवण टाका…असं म्हणून पैसे मांघु लागला.बरेच लोकं त्या कपड्यावर पाच,दहा रुपये टाकु लागले,तं कुणी टाकतबी नावतं.तं मेलेल्या मानसायचे नातलग जे दक्षिना देतील ते तो घेत व्हता. स्मशानात प्रेताग्नी द्यायच्या आंधी शिवरामनं तिथं वाह्यलेले फळं,तांदुळ,मृताचे जुने कापडं गुंडाळुन घेतले. हळुहळु मैतीलं आलेले लोकं पांगलले.तेव्हड्यात जोराचा वारं वावदळ आलं.वावदळीत मसनात ठोकलेलं पाल मोडुन पडलं व्हतं.शिवरामच्या बायकोनं मयतीजवळ ठुलेले तांदुळ शिजवायलं टाकले व्हते‌.वावदळासंग कडुसा पाऊस झाल्यानं तांदळाखालचं सरपण वलबट व्हवून ईझलं व्हतं.संद्याकाळ झाल्यानं शिवरामनं सरणाच्या आडुशालचं रात काढायच ठरवलं व्हतं.सरनावर पतरं आसल्यानं त्यालं तिथं रात काढणं सोईच वाटलं.शिवरामनं त्याच्या बायकोलं गबाळं प्रेताजवळ हालवायलं सांगलं.तिनं बी गबाळं प्रेताच्या कडलं मांडुन प्रेताच्या ईखोरावरच ते भाताच भगुन ठुलं.तिथच जेवनं आटपले.आत्ता स्मशान सुन्न,शांत झालते.आत्ता रातभर ते स्मशान अन मसनजोगी हे दोघचं संगतीलं व्हते.
    शिवराम मसनजोग्याच्या आंगावर लाल भडक रंगाचा झब्बा आसायचा.झब्याखालं ढवळाशिपत पैजेमा, डोस्क्यात शंकुसारका पितळी पट्ट्यांनी अन मोर पखायनं सजवलेला टोप,गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या अन कवड्यांच्या माळा तं डोळ्यालं काजळ लावुन, गालायवर जाळलेल्या मड्याची राख फासलेलं आन कपाळभर कुखाच मळवट भरून शिवराम ‘फेरीवर’ निंघायचा.त्याच्या काखत झोळी आसायची.त्या झोळीतल्या एका खान्यात मानसाची कवटी आन शंकु आसायचा.त्याचा ह्यो आवतार पाहुन आम्ही लहान पोर्‍ह सोरं,बाळातीन बाया त्यालं घायबरून जायाचो. मसणजोगी गावात आला रे आला की लहान पोर्‍ह अन बायाबापड्यायची पळापळ व्हयाची,लोकं आसं मनायचे की,मसणजोगी पुरलेल्या बाळातणीचं मडं उकरून तिची कवटी काढून घेतो,तं जित्या बाळातणीची गोमाशी बनवतो,भानामती करतो.मनुन मंग बाळातणी पटापट खिडक्या-दरवाजं बंद करायच्या.दाराम्होरं आलं कि शिवराम मसनजोगी त्याच्या भसाड्या आवाजात हातातली ‘टनमन’ घंटा ढनंऽऽ ढनंऽऽ वाजवत जोर्‍यातं शंकु फुंकुन गानं मनायचा,
“हरऽऽ हरऽऽ शंभोऽऽ
हरऽऽ हरऽऽ महादेवऽऽ….
जय भोलेनाथ ऽऽ……
तुळजापूरची तुळजाभवानी ऽऽ…
आली आई आली फेरी ऽऽ…..
मसणजोग्याची ही फेरी ऽऽ….
फेरी आली दारा म्होरंऽऽ……
धरम कर पित्राच्या नावानं…..
मुक्ती भेटलं स्वरगातं ऽऽ….
पीकपाणी होईल आबादानऽऽ…
कुलदेवी पाठीशी राहीलंऽऽ…..
बोलो हर हर हर महादेव…..”
हे गाणं झालं की मंग पितराचं नावं सांगा मनायचा.आन मंग त्या पित्राच्या नावानं दानधरम आला मनुन गानं गायचा. शिवराम फेरीवर आला कि कोणी भिऊन तं कोणी पितरायल मुक्ती भेटाव मनुन दानधरम करायचे. गावचा मसनवटा आमच्या वस्तीजवळच व्हता.शिवराम मसनजोगी आमच्या गावात आला की हमखास आमच्या शेत वस्तीजवळच्या मसनवट्यातच पाल ठोकुन राह्याचा.त्याचा आसा फायदा व्हयाचा कि चोरं चिलटं आमच्या तिकडल्या वावराकडं भितीनं जायाचे नाहीत आन आमच्या रानाची राखनबी व्हयाची.मह्या बाचा आन शिवराम मसनजोग्याचा दोस्ताना व्हता.शिवरामनं कव्हा जंगलातून शिकार करून आणली तर ती आमच्या आखाड्यावरच शिजवायचा बेत आसायचा.मव्हा बा बी त्यालं मरणाची देशी दारू पाजायचा.दारू पिल्यावर तं शिवराम राकेसा सारकाच वाटायचा.आत्ताशानं मही दोस्ती शिवराम मसनजोग्यांचं पोरगं पिर्‍यासंग झालती.त्यो मलं तेह्यच्या जातीचे वेगवेगळे किस्से सांगायचा. त्याच्या जातीत लेकरू झालं कि त्यालं दोन नावं ठुतात मनं.एक नाव बोलायचं आन एक परंपरेनं आलेलं. परंपरेनं नात नातीचं नाव तेह्यच्या आज्या आजीच्या नावानं आसते.त्या नावानं कोणी पुकारायचं नाही,काऊन की पितरायच्या नावान पुकारलं तं पितरायचा अपमान व्हईल आस तेह्यलं वाटायचं.त्याच्या समाजात जातपंचायत भरायची.आंध्र परदेशातल्या आदिलाबादलं मसनजोग्यायची कुलदेवी अडेलामाताचं ठाणं व्हतं.जातीचे तंटे मिटविण्यासाठी तिथं जात पंचायत भरायची.मानवी विष्टा खायालं लावणं,मुताचं मडकं डोस्क्यावर फोडनं,तं कुनालं थुका चाटायलं लावणं आश्या शिक्षा तेथं देल्या जायच्या. मसनजोग्यांत जातीबाहेर लग्नालं परवानगी नाही.तसच लग्नातं दारूबी पिऊन येता येत नाही.
त्यादिशी स्मशानातं लगबग चालु व्हती.पिर्‍याच्या बहीन सारजीच त्यादिशी लगन व्हतं.लग्नालं खर्च नवरदेवाकडल्यायलच करावं लागते मनं.आज सनई चौघड्याचे मंगल सुर मसनात गुंजत व्हते.मलं तं नवलच वाटत व्हतं. मसनात कोणी लगन करते व्हयं…..!
नवरा नवरी नटले व्हते.शिवराम मसनजोग्यानं घराभवतालं एका जाळलेल्या प्रेताची राख आनुन त्यानं रिंगन मारलं व्हतं. संद्याकाळी त्या रिंगनाबाहीर कोण बी जायाचं नाही,आसा शिरस्ता व्हता.भुतापसुन वाचायसाठी ते त्या दिसाचं रक्षाकवच व्हतं.लग्नालं जातीतील बरेच मसनजोगी आलते.तेह्यचा आवतार पाहुन तं मलं मसनात आज भुतायची जत्राच भरली का काय आसं वाटु लागलं.लग्नाची गडबड सुरू झाली आन तेव्हड्यातं गावातुन एक प्रेतयात्रा आली.झालं शिवराम मसनजोग्याची धावपळ सुरू झाली.एकीकडं मेलेल्या मानसायचे नातेवाईक उर बडवत रडत स्मशानाकडं आलते.तं दुसरीकडं लगनघाई चालु व्हती.एका जिवनाचा अंत झालता तं दुसरं जिवन फुलण्याच्या मार्गावर आसं विरोधाभासी चित्र मलं तिथं दिसतं व्हतं.सनई चौघडे बंद झाले.शिवरामनं सरण रचलं. रिवाज पार पाडुन ती अंत्ययात्रा आल्यापावली वापस बी गेली. अंत्ययात्रा वापस गेल्यावर ईकडं पुन्हा लगीनघाई जोमात आलती.सरणावरचं ते मडं ढन ढन जळत व्हतं तं तिथुन जवळच दुसरीकडं डुकराछ आन बकर्‍याच मटन शिजत व्हतं.. काय विरोधाभास व्हता नं.तिथं हासु बी व्हतं आनं आसुबी व्हते.आसु अन हासुच्या मंधात जिवन संपत बी व्हतं आन आकार बी घेत व्हतं.
    पिर्‍या शाळलं जायाचा नाही.शाळा काय आस्ते हे त्यालं कायबी माईत नवतं.त्यालं जंगलातले जनावरं आनं झाड झुडपं यांची मातर तंतोतंत मायीती व्हती.मी तं हापकुनच जायाचो. त्याच्या जवळ एक कमटीचा बाण आन एक गुल्हेर व्हती. लाव्हर्‍या,चित्तोर आशा पाखरायलं तो त्या हात्यारायनं अचुक टिपायचा.मलं त्याच्या नेमबाजीच लय कौतीक वाटायचं.त्यालं म्या बर्‍याचदा ईचारलं बी व्हतं कि बा तुलं शाळतं जावा वाटत नाही का मनुन तं तेच मलं मनायचं कि शाळा काय आसते. काय करायच शिकुन मनुनं.मी तं मह्या बा वाणी मसनजोगीच व्हणारं हे.म्या शाळत गेलो तं आमची ही परंपरा कोण चालवल. मलं तं रानावनात आन मसणातल्या भुतांच्या जगातच रमावं वाटायचं.प्रेतांची राखन करणं हेच आमचं धर्माचं काम हे आसं पिर्‍या मलं नेहमी सांगायचा.पिर्‍यालं बापजाद्यायपसुन नं हक्काचं घर व्हतं नं शेताचा एखांदा तुकडा व्हता.भणंग गरीबी आन अंधश्रद्धेच्या जंजाळातं ते जिनं जित व्हता.एक दिस आसाच पिर्‍या मह्याजवळ पळत आला आन मलं मनु लागला उंद्या तु मसनातं ये.उंद्या मी मसनजोगी व्हणारं हे मुन.पिर्‍याच्या बापान पिर्‍यासाठी पारंपारीक झब्बा शिवला व्हता.एक टोपबी घेतला व्हता.घरातली आजाच्या काळातली कवटी,टनमन घंटा, आन झोळी आशी वडिलोपार्जित संपत्ती पिर्‍यालं भेटणार व्हती.पिर्‍या लयं आनंदात वाटत व्हता.मही दुसर्‍या दिशी शाळा आसल्यानं मलं जानं जमत नवतं तरीबी येळ काढुन मी थोड्या वेळासाठी मसनाकडं गेलतो.तिथं जाऊन पाहतो तं मलं पिर्‍या एका दगडावर बसला व्हता. दोनचार मसनजोगी घागरनं पिर्‍याच्या आंगावर पाणी वतत व्हते.तं एक दोघं हातानं डमरू वाजवत काही मंत्र फिंत्र मनत व्हते.पिर्‍यालं तेह्यनं नवा लाल रंगाचा झब्बा, पयजमा घातला व्हता.डोस्क्यावर टोप घालुन हातातं ढनमन घंटा देली.तसं पिर्‍याच्या बापानं जोरर्‍यातं शंखु वाजवला.त्या शंखाचा आवाज आसमंतात दुमदुमतं व्हता.म्या मागच्या पावली शाळकडं पळालो.शाळंत जन गन मण सुरू व्हतं.मी पोरांच्या सुरात सुर मिसळुन जन गन मण मनु लागलो. पण मव्ह मन कशातच लागत नवतं.मह्या डोळ्यापुढं राहुन राहुन सारखा पिर्‍या,त्याचं मसनातलं पाल अन त्याचा पेहराव दिसत व्हता.पोर्‍ह राष्ट्रगीत झाल्यावर भारत माता की जय मनत व्हते.मह्या कानात मात्र शंखुच घुमत व्हता. जोरजोरातं……!!!

गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली
9405807079 

****************************************

बसव्या

बसव्या
तू
डोंगरात डिरकत होतास
आमच्या बापजाद्यानी
उतरवला तुझा माज
घातली तुला वेसण
अंबाडीच्या सुताची
अन् जुपलं कामाला
जगाच्या कल्याणासाठी

जगाच्या कल्याणा
संताच्या विभूती

पण आम्हाला मात्र
बसव्या तू दिलास शाप
कडाडलास

“तुमच्या नशिबी खळ्यातलं नाही
तर पाळूतलं राहील”

तूझ्या शापाने आमच्या कित्येक पिढ्या
मातरं खाऊ खाऊ मेल्या

अन् आमच्या वेसणीने
तूझ्या पिढ्या वाकून गेल्या

वेसण घातल्याची शिक्षा
सारखीच भोगली
तूझ्या आणि माझ्या
अगणित पिढ्यांनी

तूझ्या नशिबी खांदेमळन
अन् आम्ही लक्ष्मी असल्याचं
जूनं दळण
दोन्ही साफ खोटं आहे…
मनोहर बसवंते
8830322659

***************************************

मानली ना हार मी

मानली ना हार मी

झेलले कित्येक असे
रोजचेच वार मी
झुंझले संकटाशी
मानली ना हार मी

काट्याच्या वाटेवरही
बिनधास्त चालले
रक्ताळली पाउले
मानली ना हार मी

विस्तवाचे कैक कावे
विझवत मी चालले
भाजले कित्येकदा
मानली ना हार मी

अपमानाचे कित्येक घोट
हसत हसत प्यायले
झाली हानी, मानहानी
मानली ना हार मी

अपयशाच्या वाटेवरही
ऐटीत मी चालले
जिंकले मग आयुष्य सारे
मानली ना हार मी!

कवयित्री – सुचिता गायकवाड

कणकवली
मो.7709291382

****************************************

पृथ्वी आणि पर्यावरण गायीं शिवाय अधुरे…

पृथ्वी आणि पर्यावरण गायीं शिवाय अधुरे…
गो – हत्या एक राष्ट्रीय समस्या,ज्या विषयावर मी काही सांगणार आहे.तो विषय सामान्य लोकांपासून फार वेगळ्या दृष्टीने भरकटलेला आहे.
सरकार व हिंदू समाज आणि अन्य काही धर्मीय गायीच्या संदर्भात अर्धज्ञानी दिसून येतात आणि हा विषय ‘एका विशिष्ट धर्मा विरोधी’ आहे असे समजतात ?
भारताला स्वतंत्र्य मिळून ७ दशकाच्या वर होत आहे तरी आम्ही अजूनही काही गोष्टीमध्ये गुलामीतून पूर्ण मुक्ती झालेली दिसून येत नाही.
बऱ्याच विषयांमध्ये अमेरिका व युरोपियन देशांमध्ये नियमांच्या चक्रविवादात आजही भारत अडकून आहे. एवढेच नसून आमचे खानपान,राहणीमान व शिक्षण प्रणाली पाश्चात देशांसारखे दिसून येते.

गोहत्या हे एक राष्ट्रीय समस्या झाली असून १८५७ ला शहीद मंगल पांडेसारख्या अनेक वीरांनी चर्भीयुक्त पदार्थांचा विरोध केला.१८५७ ला आजादीच्या पहिल्या लढाईचे कारण गायीच्या चर्भी पासून सुरु झाले.गोहत्या संदर्भात आजवर शेकडो साधुसंत वीर पुरुषांनी आपले बलिदान दिले असून आजही गोरक्षक या नावाखाली बलिदान चालू आहे.सनातन संस्कृतीमध्ये गाय ही विज्ञान्याच्या अविश्कारावर पुजल्या जात होती,जे की, एका भाकड गायीपासून तिचे शेण व गोमुत्रापासून शेतीउपयुक्त खते,आयुर्वेद व सौंदर्य प्रसाधने ७२ प्रकारच्या गोष्टी बनवता येतात.शेतीसाठी लागणारे जीवामृत, घनामृत,न्याड्प खत,गांडूळ खत अशा प्रकारची १८ खते एका गायीपासून १० एकर शेतीसाठी पूरक होतात.यातून विषमुक्त अन्न भारतील शेतीमध्ये घेतल्या जात होते.तसेच दुधाळ गायीपासून दुध,दही, चक्का,तुप,लोणी असे अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनवत होते.
देशी गायीच्या दुधात अनेकप्रकारचे पोषकतत्व असतात व आवर्जून गीर प्रजातीच्या गायीमध्ये तर स्वर्णप्राशाचे प्रमाण प्रचंड असते.जे की,वर्षभर गीर गायीचे दुध संस्कार करून पिल्यास शरीराला एक तोळा स्वर्णप्राश मिळू शकते.१ तोळा स्वर्णप्राशाची बाजारात किंमत अंदाजे दीड लक्ष रुपये असून स्वर्णप्राशामध्ये बौद्धिक,शारीरिक प्रचंड उर्जा निर्माण होत असून नर्वस सिस्टम एकदम चांगले होते.हे विज्ञानातून सिद्ध झाले आहे.तसेच शेतीउपयोगी शेंद्रीय खतामध्ये अशा प्रकारे अनेक तत्व असतात.
वेदांमध्ये गायीचे वर्णन अत्यंत वैज्ञानिकदृष्ट्या केले असून आजचा हिंदू समाज गायींच्या त्या वर्णना संदर्भात अज्ञानी झाला आहे.वेदांमधल्या गायीचा अध्यात्मीक व वैज्ञानिक अभ्यास करुन ब्राझील,अमेरिका,इझराईल,रुस अश्या अनेक देशांनी त्या काळी भारतातून अनेक देशी गायीच्या प्रजाती घेऊन गेल्या.त्या देशात सदरील गायींवर आजही वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक अभ्यासक्रम चालू आहेत.आपण गुगलवर ते सर्च करून पाहू शकता.
आज भारतासाठी गाय व शेती अभिशाप ठरत असून त्याचे मूळ कारण वैज्ञानिक अभ्यासाचा अभाव आहे. भारतीय गोवंश व शेंद्रीय शेती आजरोजी हिंदू समाज व शेतकऱ्यांनी संपून टाकली आहे.स्वातंत्र्या आधी व नंतर हिंदू समाजाने गायीला विज्ञानाच्या आधारावर न ठेवता अलीकडच्या काळात धार्मिक क्षेत्रात आणल्यामुळे गाय ही परधर्मीयांना शत्रू वाटू लागले.ज्या गायीमध्ये दिव्य विज्ञानाचा अविष्कार असतानाही आम्ही भावनिक हिंदुनी तिच्या विज्ञानाचा अविष्कार न दाखविता तीचे धार्मिक पूजन सुरु केले आहे.जरी त्या मागचा हेतू शुद्ध असला तरीही संपूर्ण भारत वर्षात अनेक कालखंडापासून धार्मिक वातावरण अत्यंत दुषित होत आहे.या संदर्भात आमचे साधूसंत,मठमंदिरात गाय सापडली आहे.सनातन भारतामध्ये गोपालन हे शेतकरीच करत होते.आपल्या अभ्यासात गाय हे शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पातला हिस्सा असून तिचे धार्मिक आचरणही तेवढेच महत्वाचे आहे.गायीच्या अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्वावर अत्यंत महत्व पटवून सांगितले आहे.आज शेतकरी,समाज व सरकार हे तिघेही गोहत्त्येला समान कारणीभूत आहेत ? देश विदेशातील मांसाहारी समाजाला समजून सांगण्याचा आजवर कुणीही प्रयत्न केला नाही. गोमांसाला बीफ म्हणून आवडीने खाणाऱ्या लोकांमध्ये हिंदूही अपवाद नाहीत ?

गोप्रेमी व गोरक्षकासाठी कोणालाच कसल्याही प्रकारचे यश मिळताना दिसत नाही.यापूर्वी अनेकजण सर्व शंकराचार्य,महर्षी दयानंद सरस्वती,बाळ गंगाधर टिळक संघाचे द्वितीय सरसंघचालक,हजारो साधुसंत व गोसेवक यांनी आपल्या प्राणांती लढा दिला असून आजवर गोहत्त्येच्या संदर्भात उचित मार्ग निघालेला नाही.ज्या पद्धतीने गोमांसाचा उपयोग होत आहे.त्यासाठी कुठलाही धर्म मान्यता देत नाही.वैदिक धर्म, सनातन धर्म, जैन धर्म,ख्रिश्चन धर्म,यहुदी व इस्लाम धर्म सुद्धा अत्त्याचाराच्या विरोधात असतात.सर्व धर्माचे सिद्धांत अहिंसावादी जरी असले तरी या धरतीवर गोहत्या म्हणजे मानव जातीला कालिमा फासणारा विषय आहे. या भूतलावर जोपर्यंत गायींच्या रक्ताचा सडा सांडत राहील तोपर्यंत हवन, पूजन,सत्संग,कुठलेही धार्मिक कार्य सफल होणार नाही.देशात व विश्वातील तमाम मानव जातीच्या शांती,उन्नती व धार्मिक कार्याच्या सफलतेसाठी गोहत्त्या बंद झालीच पाहिजे.

आजचा शेतकरी ८० टक्के च्या वर अल्पभुधारक झाला असून तेवढाच गायी विषयींच्या विज्ञान ज्ञानात अज्ञानी असल्या कारणाने गोरक्षक ‘गोसेवा’ करू शकत नाही. त्यामुळे या दोन दशकात संपूर्ण भारत वर्षात ८० टक्के गोधन संपल्यात जमा असून येणाऱ्या पिढीसाठी भारतासाठी,सनातन संस्कृतीसाठी, शेंद्रीय शेतीसाठी व तमाम मानव जातींसाठी गाय ही अत्यंत महत्वाची असून सरकार आणि हिंदू समाजाने संपूर्ण भारत वर्षात गाय ही वैज्ञानिक अविश्कारामध्ये आणावी.तरच देश, धर्म आणि शेती हे समीकरण व्यवस्थित राहील.गोशाळा व वृद्धाश्रम हे मानव जातीसाठी कलंक असून आता देशभरात गोविज्ञान केंद्र सुरु झाले पाहिजेत.ज्या दिवशी धरतीवरील शेवटची गाय संपेल त्या दिवसापासून कामधेनुच्या अभिशापात मानव जात सुखाने जगू शकणार नाही.म्हणूनच गोसंवर्धन व संरक्षण मी करण्यासाठी मानव जातींनी थोडा वेळ खर्ची घालायलाच पाहिजे,असे मी आवाहन करतो आणि आपण ते करालच अशी अपेक्षा करतो.
प्रशांत पोपशेटवार (गोभक्त)
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
नांदेड ग्रामीण उत्तर

***************************************

वेदनांचा शब्द प्रवास

वेदनांचा शब्द प्रवास

वेदना हा आयुष्याच्या खूप मोठ्या भागाला व्यापून टाकणारा घटक आहे,किंबहुना वेदना हा आयुष्याचाच खूप मोठा भाग आहे,असं म्हणायला हवं.
निसर्ग नियमाप्रमाणे ऊन आणि सावली,दिवस आणि रात्र,जन्म आणि मृत्यू तसेच सुख आणि दुःख या सगळ्यांचा समतोलच मानवी जीवनाचा अस्तित्व टिकवून आहे..
‘एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे’,आयुष्याचं जरतारी वस्त्र हे असच विणलं गेलंय.
दुःख किंवा वेदनेच्या ह्या जाणिवेला शब्दांनी नेहमीच नवा आयाम दिला आहे…
काही वेदना ह्या नक्कीच शब्दातीत असतात पण हे देखील समजायला शब्दच पुरेसे असतात.
शब्द ते चित्रपट गीतातील असो कवितेतील,लेखातील किंवा गझलेतील असो बऱ्याचदा वेदनेला भरजरी करण्याचं काम कित्येक वर्षापासून त्यांनी केलं आहे.
हिंदी चित्रपट गीतामधील गम-ए-जिंदगी ची जेवढी व्यापकता आहे,त्यात सगळ्यात मोठा हात हिंदी गझलांचा आहे,

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो…
ह्या ओळी कुणाच्या काळजाला भिडणार नाहीत… एखाद्याच्या हसण्यालाही अतिव दुःखाची किनार असू शकते,ती फक्त ओळखायला यायला हवी आणि वाचायला देखील.
फक्त प्रेमभंग,विरह ह्या वेदनांच्या पुढे जाऊन आयुष्यातील इतरही दुःख गझले मधून सहज संप्रेषित होतात.आपल्या एका गझलेतील शेरात शकील बदायूनी म्हणतात…
अब तो खुशी का गम है न गम की खुशी मुझे
बे हिस बना चुके है बहोत जिंदगी मुझे…

चित्रपटांच्या गीतांमध्ये सर्वात लोकप्रिय असणारी गाणी ही ब-याचदा sad songs असतात,कारण वेदनेचे शब्द आपल्या पर्यंत लवकर पोहचतात व आपले नसताना देखील आपले वाटून जातात…यात मराठी गीते देखील तेवढीच प्रभावशाली आहेत.

नकळता असे ऊन मागून येते
सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते…

दुःखाचा नुसता उल्लेख आहे सुखाची जाणीव दृढ करून जातो,म्हणूनच आपल्याला सुखाच्या क्षणी अत्यंत दुःखात, वेदनेत घालवलेला काळ आठवतो…आणि आपण आणखी सुखावतो…
एका गजलेच्या मतल्या मध्ये ममता ताई सपकाळ म्हणतात…
तू गेल्यावर दिनवाणी झाली होती,जी व्यथा तुझ्या निगराणी खाली होती.सुखापेक्षाही वेदना आपल्याला एकमेकांशी चांगली जोडते…
प्रसूतीच्या वेदना असो की अनेक प्रयत्नानी देखील न सुचणा-या सानीच्या एखाद्या मिस-याची घालमेल असो,जेव्हा एखादा जीव आणि शब्द जन्माला येतो तेव्हा सपशेल विसरली जाते.

माझा निवेदनेचा झाला असा घरोबा
ती ही मजेत आहे मी ही मजेत आहे
                       …प्रमोद खराडे
यांचा हा शेर असो किंवा,दिवाकर जोशी सरांचा खालचा शेर पहा…
पूर्वजन्मीची असावी ती खरी सहचारिणी
वेदना माझ्यासवे देहात नांदत राहिली

वेदनेचं,देहाशी असणारं सख्य दाखवतात.
पाण्यात सोडलेला दिवा जसा मंद प्रवाहासोबत एका काठावरून दुसऱ्या काठाकडे जावा,तशी वेदनाही ह्या शब्दांमार्फत एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे सहज वाहत जाते..
त्यात मराठी गझलांचा आवर्जून उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही…

तिच्यामध्ये जग बुडून जावे अशी उदासी मला मिळावी
प्रफुल्लतेवर तरंगणाऱ्या जगात रमणे कठीण असते…

वेदनांच शब्दात बांधून असणारं सौंदर्य सांगायला डॉ. शिवाजी काळे सरांचा हा शेर पुरेसा आहे.
अश्या प्रकारे अनेक वर्षापासून गझल वेदनेला आणि वेदना गझलेला समृद्ध करीत आहेत.
आणि आश्चर्य म्हणजे वेदनांचा हा शब्द प्रवास खूपच सुखावणारा आणि आनंददायी आहे…!
डॉ.स्वाती भद्रे आकुसकर
नांदेड
9975468023

***************************************

उबगुन_गेले_गाव_

उबगुन_गेले_गाव_
पाण्याचा एक थेंब तर सोडाच…इथ साधा जीव ही पहायला मिळणे कठिण…त्या ठिकाणी होत्या कधी काळातील त्या शिल्लक मानवाच्या पाऊलखूणा… माणसांने माणसांला जपलेल्या…आपुलकीच्या…सुख, दु:खाच्या…शेवटी माणसांचे हे गाव…का बरं असे उबगुन गेले असेल राव ? की भल्या मोठ्या दु:खाच्या तडाक्यात गावच्या गाव वाहून गेले असेल का ? 
गावात आज पांढरीची नुसती पडझड झालेली दिसत होती. काही ठिकाणी घरांचे मोठी मोठी सागवान दरवाजे अजूनही ताट मानेने उभी होती.तर त्या दाराला आजही पांढरीच्या भिंती उभे राहुन,सर्व काही त्या घरातले उघड्या डोळ्यांनी पहात जसास तश्या उभ्या होत्या. पडझडीच्या काळात प्रत्येक जण जसे कुणाला ही  ओरभडत असतो.तसेच या भिंतीला ही अनेकांनी जसे जमेल तसे ओरभडून काढलेले दिसत होते. एकेकाळी याच भिंती शेणाने सावळून चोपड्या तेल केलेल्या असतील.त्याच भिंतीचे आज वैभव निघुन गेल्या मुळे भिंतीच्या पोटात पोखळुन घरे करुन कुत्रे -मांजरे राहत होती.आता तर याच भिंतीला जसे जमेल तसे पांढरीला उकरुन माणसंही हळुहळू चोरुन माती घेवुन जात होती. अस्या भिंतीचे आज जरी भव्य दिव्य वैभव नसले तरी ते त्यांचे त्या काळातील मोठे अस्तित्व थोडे का होईना नक्कीच टिकुन ठेवलेले दिसत होते. आताही या पडझडीच्या काळात हे जाणवत होते.
आज ही उबगुन गेलेल्या या गावात,खिळखिळ होवुन गेलेल्या घरा-घरात…एकही माणुस नसलेल्या दारात… माणुस असल्याचे…खेळल्या बागडल्याचे… इथे नांदल्याचे…अस्थित्व मात्र कायम आजही शिल्लक दिसत होते.
पहा ना…त्या तिकडे…केवढे मोठे घर पडलेले दिसते. नक्कीच इथे जास्त माणसे असली पाहीजे.त्या शिवाय येवढे मोठे घर असु शकते का ? तरी त्याची एक पडत असलेली भिंत अन त्या भिंतीचा कसा बसा आधार घेत कोरीव काम असलेल मुख्य चौकट कशी तरी उभे राहुन अजूनही शेवटचा श्वास मोजत होती… त्या चौकटीवर वरच्या बाजुला किती सुंदर गणेश कोरलेला आहे.त्या काळातली ही कला आजही मोहीत करते. नाही का ?  घरात जाण्यासाठी त्या दाराच्या पुढेच केवढी लांब अन एक एक संपुर्ण दगडाची पायरी…आत इकडे तिकडे निखळुन पडलेली अनेक दगड…एका ठिकाणी मातीची अजुन ही चुल पडलेली…त्याच्याच बाजुला भला मोठा पाण्याचा फुटलेला रांजण…असं काही काही अस्थित्व दिसत असले तरी त्यातला जिवंतपणा केव्हाच निघुन गेलेला होता.शिल्लक होते ते सांगाडे…प्रंचड आठवणीचे असे अनेक घरांचे तिथे सांगाडे दिसत होते.एका घराच्या बाजुलाच बराच खोल आड पण कोरडा टन पडला होता. त्यात पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता.दुस-या एका घरातच हपशा…तोही पुर्ण गंजुन गेलेला.अनेक ठिकाणी तारांनी हपशा बांधुन चालु ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.
आज या गावात जीवंत असे काहीच नव्हते.होते ते तिथे फक्त एक उंच माथ्यावर चार पाच दगड…त्या दगडाला आज ही शेंदुर लावलेला…बाजूलाच नारळाच्या जटा पडलेल्या…अजुन काही काही पुजेचे साहीत्य…यात आकाराने थोडा मोठा असलेला एक दगड…ज्या माणसांच्या आकाराची मुर्ती असल्या सारखी दिसत होती.त्याला जरा जास्तच शेंदुर लावलेला…तेही आताच्या काळातला शेंदूर ताजा दिसत होता.यावरुन हा मुख्य देव असावा…या उबगुन गेलेल्या गावात फक्त या देवाचे आजही अस्तित्व होते.अधिकार होते.दबदबा होता.शेवट पर्यत एकटाच तो देव…तेही एक ही माणुसं नसलेल्या गावात तो आज ही कायम दिसत होता.बाकी काहीही दिसत नव्हते.एक मोठे झाड तेवढे कापुन नेलेले होते आणी बुडाचा खालचा भाग आडवा पडुन…अजुन ही काही मुळा कोरड्या पडलेल्या जमिनीत रुतुन जीवंत राहण्यासाठी पुन्हा धडपडत,हळूवाळ श्वास घेत…कुठं कुठं हिरवागार पुन्हा पाचवत होत्या.तेवढाच काय तो या भागातला हिरवेपणा नजरेला सारखा ठळक झोंबत होता.
त्या उधास गावात किती तरी वेळ पहात…इकडे तिकडे फिरत…बारीक न्ह्याळत…जड पावलाने… मनात अनेक प्रश्नाचा गुंता झालेला…येवढे मोठे पांढरीच बुळूज असलेलं गाव एकदाच असं…का बरं उबगुन गेले असेल ?बाजुला असलेल्या त्या देवाला मी मनात नकळत दोन्ही हात जोडुन नमस्कार करत…येवढा तु असुन ही या गावाचे गावपण कायमचे का नष्ट होवु दिलास बाबा ? तुझ्या तरी सेवेला आज शिल्लक माणुस आहे का ?  असा प्रश्न त्या देवाला करत तिथुन किती तरी वेळ पहात पुढे पुढे चालू लागलो….एकटाच…!

विजय चव्हाण 
छत्रपती चौक,नांदेड
9422349940 

****************************************

भारतीय समाज आणि दलित स्त्री

भारतीय समाज आणि दलित स्त्री

भारतीय समाजात स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे.हे तर जगजाहीर आहे.
मातृसंस्कृतीचा वैभवशाली वारसा असुनही आजही या समाजात स्त्रीची अवस्था अत्यंत वाईट आहे.

‘मातृसत्ता-स्त्रीसत्तेत प्रजोत्पादनात पुरुष-ब्रह्मन हा संततीला निमित्तमात्र असल्याने व प्रत्यक्ष प्रजनन स्त्री (क्षत्र) करीत असल्याने पुरुष-ब्रह्मनला त्यापलीकडे महत्त्व दिले जात नसे, तर स्त्रीला भूमातादी (स्त्रीसत्तेत राष्ट्री-देवी) मानले जात असे. पितृसत्तेत लैंगिक,धार्मिक, बौद्धिक,सामाजिक,आर्थिक व राजकीय भूमिका विरुद्धात बदलल्या.ब्रह्मनचे विश्वोत्पादक ब्रह्मदेवात परिवर्तन केले गेले.’
असं प्राच्यविद्या पंडित,शरद पाटील आपल्या प्रिमिटिव्ह कम्युनिझम,मातृसत्ता -स्त्रीसता व भारतीय समाजवाद या पुस्तकात सांगतात .

असं असुनही आपल्या स्त्रीची ही अधोगती का झाली असावी? असा प्रश्न उपस्थित होतो.कधीकाळी सर्व सत्ता स्त्रीच्या हाती होती.ती श्रेष्ठ,पुजनिय राष्ट्रीदेवी गणली जात होती.सत्ता, व्यवस्था बदलण्यासाठी शोषण व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्त्री जी मुख्य सत्ताधारी होती तिलाच गुलाम करणं आवश्यक होतं.तिच्या तेजस्वी अस्तित्वाभोवती काळीमा फासून गुलामीच्या गर्तेत लोटून देण्यात आले.शेकडो वर्षांपासून चालत आलेली गुलामगिरी तिच्या अंगवळणी पडली आहे.ती माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष करताना दिसत नाही .

     समता,न्याय,स्वातंत्र्य या तीन लोकशाही मुल्यानुसार आजच्या आधुनिक युगात मानव म्हणून प्रत्येकाला जीवन जगता यायला हवं.पण ते अजुनही शक्य झाले नाही. महापुरुषांच्या शोषणमुक्त समाजाचं स्वप्न अजुनही पुर्णत्वास गेले नाही.संविधानाने जरी सर्व मानव समान आहेत असं म्हटलं असलं तरी ती समानता कागदोपत्री दिसून येते.रोजच्या जगण्यात मात्र शोषण व्यवस्थेचे अलिखित नियमच अमलात आणले जातात .
हे सर्वज्ञात आहे.या शोषणाच्या कारणांचा शोध घ्यायचा तर आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. वर्ग,जाती,वंश यांच्या जोडीला लिंगभेद,पुरुषी वर्चस्व हा पुरूषसत्ताक व्यवस्थेचा अपरिहार्य भाग आहे.त्याच नुसार स्त्रीचे शोषण सुरूच आहे व पुरुषांचा विकास होत राहिला .
संपत्ती,शिक्षण,राजकारण,अशी सर्वच साधने पुरुषांच्या हाती राहिली.
कर्तव्य,नैसर्गिक धर्म,कौटुंबिक स्वास्थ्य,मातृत्व,प्रेम,या गोंडस नावाखाली स्त्रियावर लादलेले दुय्यम स्थान स्त्रिया स्विकारत राहिल्या.
स्त्रियांचे पंख पद्धतशीरपणे कापले गेले.त्यांना अबला बनविले गेले.त्यांची स्वत्वाची भावना नष्ट केली गेली.स्त्रीवर लादलेले निक्रुष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निक्रुष्टतेचे व दुरावस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.
इतिहासाचे थोर संशोधक आ.ह.साळुंखे यांच्या ” हिंदू संस्कृती आणि स्त्री ” या पुस्तकातील वरील ओळीवरून भारतीय समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान व त्यांच्यावर लादले गेलेले अन्यायकारक जीवन आपल्या लक्षात येते.
प्राचीन काळापासून स्त्रीला हीन लेखण्याची प्रवृत्ती
समाजमनाच्या विचारात कशी रुजलेली आहे आणि त्या प्रवृत्तीमागे कोणत्या धार्मिक अंधश्रद्धा आहेत,हे जाणून घ्यायला हवे असता त्या शिवाय त्या मानसिकतेच्या मुळापर्यंत पोहचून सध्याच्या परिस्थितीत बदल कसा करायचा हे लक्षात येणार नाही .
व्रत वैकल्ये,पूजा अर्चा,विविध सणवार करण्यात स्त्रियांना प्रचंड हौस असते असा दावा केला जातो.मात्र तो रूढी परंपराचा पगडा आहे हे कोणीही मान्य करायला तयार नसते. हा पगडा धार्मिक ग्रंथातून समाजमनावर रूजवला गेला.
वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये स्त्रीविषयक दृष्टीकोन मात्र सारखेच पहायला मिळतात.ते म्हणजे स्त्री ही पुरुषाच्या सुखाचं एक साधन आहे.इथे तिला वस्तूरूपात रूपांतरीत केलं जातं.
मातृसत्ताक अनार्य आणि पुरुषसत्ताक यांच्यात अनेकदा संघर्ष झाला.या संघर्षात अर्थातच आर्य विजयी ठरले.त्यांनी मातृसत्ताक पद्धतीच्या सर्वच खुणा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला खरा,पण ते पुर्णपणे यशस्वी झाले नाहीत.
हा संघर्ष मांडताना डॉ.आ.ह.साळुंखे म्हणतात,”भारतापुरते बोलावयाचे तर पुरुषप्रधान आर्यांचे भारतात आगमन झाल्यानंतर येथील मातृसत्ताक अनार्यांबरोबर त्यांचे संघर्ष व संकर झाले.या संघर्षात अखेरीस आर्यांचा विजय झाला,परंतु पराभूत अनार्याबरोबर त्यांना काही तडजोडीही कराव्या लागल्या.अनार्य,पराभूत झाले,तरी त्यांनी आपली मातृसत्ताक पद्धत सोडून दिली नाही.एकीकडे त्या पद्धतीचे शक्य तितके अंश जपण्याचा त्यांचा प्रयत्न होता.या प्रक्रियेमध्ये पुरुषप्रधानता अधिकाधिक स्थिरावत गेली आणि मातृसत्ताक पद्धतीचे काही अवशेष मात्र शिल्लक राहिले.”हे झालं भारतीय समाजाती सर्व स्तरातील स्त्रीयांच्या बाबतीत.
मात्र त्यातल्या त्यात दलित स्त्रीची अवस्था तर दयनीय  आहे.
एक तर वर्णव्यवस्थेनं लादलेलं शुद्रत्व,दुसरं स्त्री शुद्र म्हणून लादलेलं शुद्रत्व.अशा दुहेरी गुलामगिरीत ही स्त्री अडकलेली आहे.
स्त्रीला हीन लेखण्याच्या मानसिकतेतून तिच्यावर अन्याय होत असतो.
घराच्या आत व बाहेरच्या जगात ती अनेक शारिरीक व मानसिक अत्याचाराची बळी ठरत असते.तिचं शारीरिक, मानसिक,आर्थिक,कौटुंबिक,सामाजिक अशा सर्वच स्तरावर खच्चीकरण केले जातं.
जे क्रुर नियम ब्राह्मणी व्यवस्थेकडून दलित समाजावर लादले गेले तेच नियम आपण आपल्याच स्त्रियावर लागू केल्यामुळे स्त्रीचं दुहेरी शोषण होते.गुलामगिरी लादणारे तिचे आप्त असल्यामुळे त्यांच्या बद्दल तिच्या मनात प्रेम,जिव्हाळा,कणव, आदर असल्यामुळे ही गुलामगिरी आहे,असा विचारही तिच्या मनात येत नाही.ती याचा सहजपणे स्वीकार करते.
दलित समाजातील घटक असलेला मतंग समाज हा अर्थिक, सामाजिक व शैक्षणिक द्रुष्ट्या अतिशय मागासलेला समाज आहे.अशा अनेक कारणांमुळे या समाजतील स्त्रियांच्या शिक्षणाच्या,विकासाच्या वाटा अजूनही पाहिजे तशा मोकळ्या नाहीत.
मातंग समाज अजूनही अंधश्रद्धा,चुकीच्या रुढी,परंपरा यात अडकून आहे.या विचारांचा फटका स्त्रियांना बसतो .
मुलगी परक्याचे धन आहे.तिला कशाला शिकवायचे? तिच्या पगाराचा आपल्याला काय उपयोग ? किंवा शिकलेली मुलगी म्हणून लग्नासाठी स्थळ येईल म्हणून कामापुरते शिक्षण द्यायचे.
या आणि अशाच विचारातून मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते.
दारिद्र्यात एक ओझं कमी करण्याच्या उद्देशाने,तसेच इज्जतीच्या भ्रामक कल्पनेतून समाजातील मुलींचे लहानपणीच लग्न लावून दिले जाते.या मुलींवर अकाली मातृत्व लादले जाते.
शिक्षण घेण्याच्या,विकास करण्याच्या वयात या मुली संसाराचा गाडा ओढत असतात.मोलमजुरी करून पोट भरत असतात.
कोवळ्या वयात या मुली उसतोड करतात.विटभट्टीवर काम करतात.रोड बांधणिसाठी,घराच्या बांधकामासाठी दगड माती, विटा,खडी वाहून नेण्याचे अवघड कामंही करतात.
या कारणाने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
त्यांना होणारी मुले अविकसित व कुपोषित जन्माला येतात.

या समाजातील स्त्रियांची शैक्षणिक प्रगती झाली नसल्यामुळे त्यांच्यात अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी,परंपरा याचं प्रमाण इतर समाजातील स्त्रियां पेक्षा जास्त दिसून येते.
शिक्षण नसल्याने प्रबोधन नाही आणि त्या कारणाने परिवर्तनही नाही.म्हणूनच स्त्रियाचं कोणत्याही चळवळीतील प्रमाण नगण्य आहे.
सन २००१ मधील सर्वेक्षणानुसार पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मातंग स्त्रियांचे प्रमाण(०.३२) तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या स्त्रियांचे प्रमाण (०.१२) केवळ एवढे आहे.
असं म्हटलं जातं की,कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्री च्या प्रगती वरून लक्षात येते.
मातंग समाजाचे मागासलेपण या समाजातील स्त्रियांच्या मागासलेपणावरून लक्षात येते.
डॉ.सुरेश चौथाईवाले यांनी “मातंग चळवळीचा इतिहास”
या पुस्तकात असे म्हटले आहे की,’ब्रिटिशांनी आधुनिक मुल्यशिक्षणाचा प्रसार केला.परंतु या चळवळीत अनेक मागास जाती जमातींना सहभागी होता येण्यासारखी परिस्थिती निर्माण केली नाही.भिल्ल,रामोशी व इतर जातीसह मांग जातीला गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर अनेक निर्बंध टाकले. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक विकासच झाला नाही .
भारतीय घटनेने सर्वांना समान संधी दिली.पण त्या संधीचा मांग जातीला योग्य लाभ घेता आला नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला सामाजिक राजकीय व आर्थिक विकास मांगांना साधता आला नाही.’

डॉ.चौथाईवाले यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
याचाच परिणाम मातंग समाजातील स्त्रीवरही झालेला आहे.
काही प्रमाणात मातंग समाजातील जे लोक शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करतात.समाजातील सरंजामी पुरूषसत्ताक मानसिकतेतून तिच्यावर फक्त ‘चुल आणि मुल’ सांभाळायची जबाबदारी टाकून तिचे पाऊल उंबरठया आत अडविले जाते. त्यामुळे परिवर्तन वादी विचार तिच्यापर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे सुशिक्षित मातंग स्त्रिया सुद्धा त्याच जुन्या रुढी परंपरावादी विचारधारेत अडकून पडलेल्या दिसतात.
“द सेकंड सेक्स” या पुस्तकात रशियन लेखिका सिमोन द बोहुआर म्हणतात.. 
‘स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविली जाते’
कोणत्याही समाजातील स्त्री च्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करीत असताना सिमोनचे विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात.
मातंग समाजाला विकास साधायचा असेल तर स्त्रीला त्याच परंपरावादी साच्यात ठोकून बंदिस्त करण्याऐवजी तिला मुक्तपणे घडूदेणे आवश्यक आहे.तिच्या शिक्षणाच्या, विकासाच्या मार्गात अडथळे येणार नाहीत.याची दक्षत घ्यावी लागेल.
महामानवांचे प्रबोधनकारी विचार तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी स्त्रियांचा चळवळीत सक्रीय सहभाग कसा राहील हे पहावे लागेल.महात्मा फुले,माय सावित्री,मुक्ताईच्या विचारांचा जागर करून स्त्रियांना जागं करावं लागेल.
शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा,या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अमल करावा लागेल.
स्त्री च्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले तरच मातंग समाज व मातंग स्त्रियांचा विकास होवू शकतो.तेव्हाच मातंग स्त्री समाजात आपले स्थान निर्माण करू शकते.
सध्या तरी मातंग स्त्रीचे समाजात स्थान नसल्यात जमा आहे.
मातंग स्त्रीची नवीन पिढी शिक्षण घेऊन समाजात आपले स्थानिर्माण करील अशी अपेक्षा बाळगूया !!
छाया बेले
लेखिका

****************************************

सबसे बडा रोग,क्या कहेंगे लोग

सबसे बडा रोग,क्या कहेंगे लोग
अगदी काही महीन्यापुर्वी कोरोना व्हायरसने हजारो लोकांना प्राणाला मुकावं लागल.तेंव्हाच व्हायरस लोकांना कळला,तो आला अन् निघूनही गेला.असेच डोळ्याला न दिसणारे अनेक व्हायरस परीसरात,घरोघरी मनामनात नांदताहेत.
त्यापैकीच एक म्हणजे,”क्या कहेंगे लोग…
” यालाच मराठीत “लोक काय म्हणतील?” असे संबाधतात.हा व्हायरस,हा सर्वात मोठा रोग असतो.
सर्वात मोठा “रोग”
काय म्हणतील लोक?
     “माणूस हा सामाजशील प्राणी असल्यामुळे तो ज्या समाजात राहतो.त्या समाजाशी त्याला जुळवुन घ्याव लागतं.याचा अर्थ असा नव्हे की,आपल्याला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी,न पचणारी एखादी कृती जर का त्याने करायची ठरवली तर,’लोक त्याचा विरोध करतील असं त्याला वाटायला लागत.
‘काय म्हणतील लोक?’ या तीन शब्दांचा जेव्हा जेव्हा आपल्या मनात विचार येतो.तेव्हा ही निरर्थक भीती मानगुटीवर बसते. खरतर,हे कळुनही आपण मात्र ती बाळगत जातो.अनेकजण तर,या न्युनगंडाच्या,भीतीच्या इतके आहारी जातात की,त्यांच्या मनाची अवस्था उमलण्याआधीच तोडून टाकलेल्या कळीसारखी होते.जगण्यातल्या आनंदालाही ते पोरखे होतात. बहुसंख्यांक जसे वागतात,बोलतात,वर्तन करतात,त्यांच अनुकरण करीत त्यांच्यामागे जाण्यातच भलं असा विचार करत,धोपटमार्गाने मळलेल्या वाटेवरुन चालत जातात.आपले विचार आपण मनातच दाबुन ठेवतात.लोकलाजेस्तव आपल्यातल्या क्षमतांचा गुणांच्या खजीन्याचाही त्यांना विसर पडतो.त्यांचं जीवनच इतरांच्या प्रमाणपत्रावर,अभिप्रायावर अवलंबून असतं.अशा व्यक्ती आपल्या आसपासच नव्हेतर, आपल्या घरातही असतात.जी इतरांच्या अभिप्रायावर श्वास घेत असतात.अशा व्यक्तींच जीवन असमाधानी,चिंताग्रस्त असतं.
याची अनेक उदाहरणेही आपणास पहावयास, वाचावयास मिळतील.एवढच नव्हेतर,ते आपल्या सहवासातील लोकांनाही नकारात्मकतेच्या जाळ्यात ओढतात.
त्यांच्यात आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असल्यामुळे अशी माणसे कमकुवत मनोवृत्तीची असतात.ती खंबीरपणे कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यास असमर्थ असतात याचं कारण म्हणजे,त्यांना “लोक काय म्हणतील?”
“हे तीन शब्द आतून पुरतं पोखरून टाकतात.अशा माणसांना थोडेही मनाविरुद्ध झालं म्हणजे नकारात्मक विचारांनी संकटापुढे कोलमडून पडून लोटांगण घालतात.एवढी प्रचंड ताकद या तीन शब्दात असते.या तीन शब्दांचा आपण अधिकाधिक विचार करू लागलो तर,आपणही आपल्या जीवनातील निर्णयक्षमता गमावून बसू शकतो.
त्यात आपलेच नुकसान आपणच करून घेतल्याचा आपल्याला साक्षात्कारही होईल.तो कसा? यासाठी एक छानसा इंग्रजी विषयातला पाठ प्राथमिक शिक्षणात होता.त्याचं शिर्षक होतं.” The man who tried to please everbody” त्यात लोक काय म्हणतात? याचं उदाहरण दिलं होतं.ऐकावे जनाचे करावे मनाचे हा बोध त्यातुन विषद करण्यात आला.आपण लोकांचं ऐकलं अन तसच केल तर,आपलच कस नुकसान होतं.याचा बोध होतो.
आपणही पुस्तकातुन ही कथा ऐकली,वाचली असेलच.त्या कथेचा सारांशच असा आहे की,एक वडील आपल्या मुलाला आणि त्यांच्या गाढवाला सोबत घेऊन बाजाराला निघतात. त्यावेळी त्यांना भेटणारी माणसे ही कशाप्रकारचा विचार करत होती.याचा प्रत्यय येईल.
बापलेक गाढवासोबत शेजारच्या गावी पायी जात होते.तेव्हा एकाने त्यांना गाढव सोबत असूनही पायी चालले म्हणून दोष दिला.तेव्हा बापाने मुलाला गाढवावर बसवले,ते हळुहळू पुढे जात होते तेव्हा म्हाताऱ्या बापाला पायी चालवतो म्हणून मुलाला एका म्हातार्‍याने दोष दिला.मुलगा पायी चालायला लागल्यावर लहान लेकराला पायी चालवत आहे आपण थाटाने बसला म्हातारा..असा टोमणा…विहरीवर पाणी भरणार्‍या बायकांनी मारला.
पुढे थोडे अंतर कापुन गेले असता एकाने दोघांनाही गाढवावर बसायला सांगीतलं.तेव्हा त्याच ऐकून ते भोळे बापलेक बसले. गाढव या दोघांनाही पाठीवर बसवुन हळुहळू चालु लागले.
काही अंतर कापुन गेले असता,एका पांथस्थाने गाढवाच्या बाबतीत निर्दयपणे वागताहेत म्हणून बापलेकांना दोष दिला. त्यावर त्या भोळ्या बापलेकांनी सारं प्रवासवर्णन त्या माणसापुढे ठेवल.सारी कथा सांगीतली.विचारले,”आम्ही काहीही केलं तरी लोक बोलतात.आम्ही काय कराव?”
त्या पांथस्थाने नवीन कल्पना सुचवली.आतापर्यंत या गरीब गाढवाने तुम्हाला इथपर्यंत आणले,आता तुम्ही दोघं याला उचलुन घ्या…
गाढवाला उचलावं कसं?हे अवघड काम कसं कराव? यावर उपाय विचारला असता तो म्हणाला,”
गाढवाचे दोन दोन पाय काठीला बांधा मग त्याला उचला. पाय बांधताना गाढवाने मनसोक्त लाथा हाणल्या. कसंबसं गाढवाला बांधलं.काठी उचलली.
या विचित्र अवस्थेमुळे गाढव जोरजोरात हेलकावे देवून मोकळं होण्याचा प्रयत्न करत होते.कसंबसं बापलेक त्यांस उचलून नेत होते.
अशा विचित्र अवस्थेतल्या गाढवाला पाहून वाटेवरचे पांथस्थ हसत होते.शेवटी बापलेक ते गाढव ओझं घेवुन नदीवरच्या पुलावर आले.पुलाखालच पाणी पाहून गाढवाचे डोळे गरगरले. त्याने प्रचंड वेगाने हेलकावे दिले. ते गाढव नदीत पडले.
या कथेचं तात्पर्य तुम्हाला कळालेच असेल.
आपण कसेही वागलो तरी,लोकांचे दोष देणे सुरूच रहाणार आहे.आपल्या मनाला जे पटतं तेच करण्याचं धाडस करायला हवं.तुम्ही कसेही वागा,लोक तुमच्यासाठी विशेषणे घेऊन तयार असणारच,तुम्ही मोकळेपणाने खर्च करा-लोक उधळ्या म्हणतील,हात राखून खर्च करा-लोक कंजूष म्हणतील, मोकळेपणाने बोला -बडबड्या म्हणतील,कमी बोला- घमंडी म्हणतील,बाहेर लोकांत मिसळा लोक -भटकफकीर म्हणतील, बाहेर जास्त पडू नका -घरकोंबडा म्हणतील… तुम्ही कसेही वागा ही यादी लांबणारीच असेल.”लोक काय म्हणतील?” हे वैश्विक शब्द तुमचा पाठलाग करतच रहाणार आहेत.अनेकदा या तीन शब्दांमुळे लोक आयुष्यात खचून नामोहरम झालेली मी पाहीली आहेत. याचा दुष्परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नसेल तर,आपण आपल्या मनाला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे वागावं,आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार आणि झालाच तर,दुसऱ्याला त्याचा फायदा होईल. आपल्याला मात्र नुकसानच होईल.
माणूस कधीच अपयशाला भीत नसतो.अपयश आल्यानंतर त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल?याच विचाराने तो गोंधळून जातो.असा जर सगळ्यांनीच विचार केला असता तर,आपण अनेक चांगल्या गोष्टीपासून वंचित राहिलो असतो. या जगात संशोधन झालेच नसते,नावीन्याचा ध्यास आणि भविष्याची आस कुणाला लागलीच नसती.म्हणून लोक बोलतच रहाणार आहेत आणि आपण करतच रहाणार आहोत, ऐवढे जरी आपण आपल्या मनावर बिंबवले तरी,आपण जिंकलोत,असं समजू या आणि लोकांचं काय ? ते काहीही म्हणतील;लोकांचं ऐकावं जरुर पण त्यावर आपला विचार करावा.असा निर्मळ हेतू ठेवून वागलो तरी,बरंच काही साध्य होऊ शकते आणि आपल्या मनालाही शांती,समाधान लाभू शकते.अन्यथा आपण आपल्या मनाची शांती राखण्यात अयशस्वीच होतो.
विचार केला तर,आपण ज्या लोकांनी खुष व्हावे, आपल्याला चांगले म्हणावे म्हणून धडपड करतो. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक करायला जातो.अन तेथेच फसगत होते.चला,ती कशी होते.हे उदाहरणादाखल पाहू या..
भाऊंच्या मुलीच्या लग्नास लांब लांबचे नातेवाईक,मुंबई, दिल्ली,विदेशातून संबंधित नातेवाईक सुट्या काढून मुक्कामी राहीले.पाहुणचारात कसलीही कमतरता ठेवली नाही.
जवळपास दोन हजार लोकं लग्नाला आली.वॉर्डात, गावात रोषणाई केली.थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. पाण्यासारखा पैसा खर्च केला.
आपल्या जीवनभराची सर्व कमाई लग्नात खर्च झाली, वरुन कमतरता नको म्हणून उसनवारी,कर्जही काढले.जीवाचा आटापिटा करून धुमधडाक्यात भाऊने पोरीचं लग्न लावले.
गावात भाऊची कॉलर टाईट झाली.लग्न आटोपून दोन तीन महिने गेले.पण भाऊ लग्न नाही विसरला.लग्नानंतर जवळपास दोन महिने झाले तरी,लोक लग्नाच्याच चर्चा करायचे.अचानक भाऊ आजारी पडले.ICU.भाऊ बेडवर पडून होते.सात दिवसापासून भरती पडले कुणीच साधं भेटायला आलं नाही की,साधी विचारपुसही केली नाही.लग्नात आलेल्या २००० लोकांचा कुठं पत्ताच दिसत नव्हता,कुठे गेली ती पाहुणचार करणारी लांब लांबची माणसं? सात दिवसाचा ICU चा खर्च झाला.डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नव्हता.भाऊच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते.
एका जवळच्या मित्राने परोपरीन भाऊंना समजावले,भाऊ मुलीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कराल तर 100% return मिळेल. बिजनेस लँग्वेजमध्ये “Return On इन्व्हेस्टमेंट” म्हणतात. भाऊंना वेळ निघून गेल्याने शहाणपण सुचले. आता त्यांच्याकडे पैसा नव्हता.मोठेपणाचा उसना आव आणण्यासाठी ऐपत नसतानाही वारेमाप पैसा खर्च केला होता.
अब पछाताईके क्या हुआ..यासम भाऊंची स्थिती बनली होती. अगोदरच कर्ज आणि वरुन हॉस्पिटलमध्ये आणि सर्वांनीच मदतीचा हात काढून घेतला.नातेवाईकांना वाटत असेल की,ते पैसे परत कधी आणि कसे करतील?
नातं असो की,मैत्री सर्व सुखाचे भागीदार असतात. आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागत असते.   ही व्यथा सांगताना भाऊंच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.भाऊंच्या पत्नीला हे सार अनावर झालं.भाऊंच्या सेवेसाठी त्या आल्या अन दवाखाण्यातच त्या हार्ट अटॅकने दगावल्या.ही घटना सांगण्यासाठी गेलेल्या मित्रांना हे सांगण्याच्या आतच भाऊंचा ब्रेन ह्यामरेजने मृत्यू झाला.
जर भाऊने लग्नात तोरा मिरविण्यासाठी अति उत्साहात पैसा खर्च केला नसता तर भाऊ आज जीवंत असता.आपल्या क्षमतेपेक्षा अधिक करायला जातो अन् तेथेच फसगत होते. भाऊ सारखं हाल होऊ नये.हीच इच्छा ..
भाऊ हे जरी काल्पनिक पात्र असल तरी,अनेक अशाच घटना आपण पाहतो……. ,
“संकटाशी एकट्यालाच सामना करावा लागतो,लोकं काय म्हणतील याला बळी पडु नका …!”
सबसे बडा रोग,क्या कहेंगे लोग !!

    चंदु चक्रवार
     भोकर

****************************************

स्पर्धा परीक्षा…एक दृष्टिक्षेप…

स्पर्धा परीक्षा…एक दृष्टिक्षेप…
     लक्ष वेधणारे आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकसनाच्या टप्प्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना वेगळे करता येणार नाही.कारण स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.
मागील दोन-तीन दशकांपासून या दोघांमधील संमंध दृढ होत चालला आहे.यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी ही शालेय जीवनातील प्राथमिक स्तरापासूनच व्हायला हवी.म्हणजेच पाचवी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा,गणित संबोध,गणित प्रज्ञा,गणित प्राविण्य परीक्षा,MTS,BTS, ISO,IMO….अशा कितीतरी स्पर्धा परीक्षा आहेत ज्या प्राथमिक स्तरावर घेतल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण होण्यास व माहिती मिळण्यास मदत होते.काही शाळांमध्ये अशा स्पर्धा परीक्षांची सुरूवात ही इयत्ता तिसरीपासूनच श्रेया,MTS यासारख्या परीक्षेच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे स्पर्धा ही तीव्र होत चालली आहे.
वरील सर्व स्पर्धा परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांस बसवून त्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेची भिती तर नाहीशी होईलच त्याचबरोबर उत्तर देण्याची पद्धत,विचारांची अचूकता पडताळण्यास मदत होते.अशा स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती,आकलन क्षमता व वैचारिक पातळी वाढीस लागते.कोणत्याही परीक्षेला सामोरे जाण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढतो.स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या आकलनयुक्त व बुद्धीला,विचारांना चालना देणाऱ्या प्रश्नांमुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन प्रश्नांशी निगडित योग्य आणि स्वतंत्र विचार करावयास लागतो.यश-अपयश पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये याच वयात निर्माण होते.विविध विषयांचे वाचन तर वाढतेच पण कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय योग्य ठरेल याचीही जाणिव निर्माण होते,म्हणजेच निर्णयक्षमता वाढते.
प्राथमिक शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षा देत गेल्यास विद्यार्थ्यांचा कलही पालक व शिक्षकांच्या लक्षात येतो आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्यास सोईस्कर जाते.या सर्व स्पर्धा परीक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गुणकौशल्यांचा उपयोग बारावीनंतर इंजिनिअरिंग, वैद्यकीय,आयआयटी,किंवा इतर क्षेत्रातील प्रवेश परीक्षांसाठी होतो.प्राथमिक शालेय जीवनात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करतील अशा विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर उत्कृष्ट करून जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.
कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची स्वतःची भुमिका फार महत्त्वाची असते.त्यासाठी ध्येय,चिकाटी,कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन,सातत्य व सहनशीलता या गुणांबरोबरच सकारात्मक भुमिका महत्त्वाची आहे. कदाचित एक-दोन प्रयत्नात यश मिळणारही नाही, त्यासाठी सहनशिलता हा गुण येथे महत्त्वाचा आहे.तसेच नकारात्मक भुमिका मांडणारेही आपल्या आजूबाजूला बरेच असतात म्हणून विद्यार्थ्यांची कणखर व सकारात्मक भुमिका महत्त्वाची आहे.
शेवटी असेही नमूद करावेसे वाटते की स्पर्धा,करिअर व भविष्यात जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नात फक्त पुस्तकी ज्ञानच न मिळवता आदर्श नागरिक होण्याच्या दृष्टीने आपले आचार-विचार,संस्कार,संस्कृती व माणूसकी विसरून चालणार नाही.माणूसकीचे सुंदर रोपटे रूजवायचे असेल तर या गोष्टी फार महत्त्वाच्या  आहेत…”माणूसकी म्हणजे प्रेम,माणूसकी म्हणजे जाणिव,माणूसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर अन् आदर,माणूसकी म्हणजे माणसातील माणूस ओळखून निस्वार्थपणे केलेला मदतीचा हात…!”
माणूसकीचे शिक्षण अन् स्पर्धात्मक शिक्षण यांची योग्य सांगड घालून घेतलेल्या शिक्षणामुळे तयार होतो तो एक यशस्वी नागरिक…!
हंचनाळे एस.व्ही.
जि.प.के.प्रा.शा.नुतन भोकर 

****************************************

आठवणीतली दिवाळी

आठवणीतली दिवाळी
समृध्दीच्या कणाकणात सजावी,नटावी दिवाळी……!!
हासत,नाचत,गात यावी दिवाळी…!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,….!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…असा शुभेच्छांचा संदेश घेऊन येणारा दिवाळी हा सण सर्वत्रच खुप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच निमित्त मात्राने मैत्रीणींमध्ये माहेरी जाण्यासाठीची कुजबुज सुरु झाली. माहेर हा शब्द प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.आई-वडील,बहीण-भाऊ, नातलग इत्यादी माहेरची माणसं ही तिची सर्व आपली असतात.माहेराची आठवण येताच.मीना लहानपणीच्या दिवाळीच्या त्या आठवणीत रमून गेली…
प्रत्येक सणाचे वैयक्तिक मत,महत्व आणि त्याचे असे एक सौंदर्य असते.जसे की पाडव्याच्या गुडी-बत्तास्यानी गोड होती. गणपतीचे आगमन-मोदकाचा मानपान. घटाची स्थापना-दुर्गेचे माहेरपण.असेच सगळे सण आपले कौतुक सांगत असतात.
प्रेम,जिव्हाळा,आपुलकीचा सण म्हणजे दिवाळी,आनंदाचे वारे घेऊन येणार दिवाळीचा सण आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्व सांगत येतो.लहानपणी कळायचं नाही दिवाळी का साजरी करतात ते पण दिवाळीच्या सुट्ट्या म्हणलं की खूप धमाल वाटायची,बालकिल्ले बांधायचे जी की आता नामशेष झाले आहे,नवीन कपडे,वेगवेगळे पदार्थ फराळ म्हणून खायला मिळायचे,शाळेला सुट्टी,त्यामुळे गृहपाठाला सुट्टी,लवकर उठायचे उठण्याने आंघोळ करायची,मोठमोठ्या रांगोळी टाकायची,घर सजवायचे,दिवाळी म्हणून बस एवढंच कळायचं…
दिवाळी म्हटली की,नुकतीच थंडीची चाहूल लागलेली असायची,मग काय सकाळी लवकर उठणे म्हणजे आमच्यासाठी युद्धभूमीवर जाणे असं वाटायचं… उठण्याची आंघोळ,मग औक्षण करायचं व करून घ्यायचं,फराळ खायचा आणि मग नंतर आम्ही घराला सजवायला सुरू करायचो, पणत्या लावायचो आणि खरी धमाल सुरू करायचो फटाके वाजवायची,कोणी लवंगी फटाका,लक्ष्मी बॉम्ब,सुतळी बॉम्ब, पाऊस,भुईचक्र,तर कोणी चिली मिली वाजवायचे…फटाके वाजवायचे…
दिवाळीची सुरुवात वसुबारसने होई.‌‌..गाई-म्हैशींना नैवेद्य दाखवला जायचा आणि एक गाणे म्हणायचे,”दिन दिन दिवाळी,गाई म्हैशी ओवाळी”.
तर अशी गाणे बोलून दिवाळीची सुरवात व्हायची…
भावाला भाऊबीजेला ओवळण्यापेक्षा त्याने काय गिफ्ट आणलाय हेच बगण्यात उत्साही असायचो.आणि त्याने गिफ्ट नाही दिले तर त्याच्या आवडीचे फटाके आम्ही चोरायचो आणि त्याच्या पुढे वाजवायचो.ते थोडे हट्टी पण लाडीक वागणे हे नेहमीच घरात आवडे.दिवाळी पाडव्याला खास महत्व होते.
जेवढे रंग इंद्रधनुष्यात नसतील त्याहून अधिक रंग माझ्या या लहानपणीच्या आठवणीतल्या दिवाळीत दडले होते.
आठवणींच्या खुशीत बिलगून असतानाच तेवढ्यात कोण्या तरी मैत्रीणीने आवाज दिला चल उठ! जाऊ घरी…सकाळी माहेरी जाण्यासाठी निघायचे आहे म्हणून…पण आता मात्र माझ्या मनाची त्रिधा वाढत होती.
जेंव्हा आई-वडीलचं छत्रच निघून जातं तेंव्हा मात्र सगळी सण,उत्सव,नातलगं,आप्तसंबध,समस्त जग,माहेरचं अंगण ओसाड वाटू लागते.
घर,छप्पर,ओसरी सारं सारं क्षणात वाळवंट होऊन गेलेलं जाणवतं.फुलत नसतो कुठेच आपल्या कौतुकाचे मळे, डोळ्यांची फुलवात लावून दारी कोणीच वाट पाहत उभं नसतं…आपुलकी,काळजी आणि मायेच्या शब्दातले शिंपण ओंजळीत नसतं…
घरभर विखुरलेल्या वस्तू निराधार झालेल्या डोळ्यांनी पाहवत नाही…
चष्म्याचं घर,खुर्च्या,पलंग,कसली ती बिलं अन् कुठल्यातरी त्या झरझरत्या याद्या बिचार्याच्या सोबतीला कोणी कोणीच भरायला त्या घरात उरलेलं नव्हतं..
नुसतं घरभर विखुरलेल्या आठवणींना कवटाळून पाहत राहायचं फोटोतल्या क्षणांच्या शिदोरीत आपली ही माणसं जवळ नाहीत असं समजून सारं काही उसास्यात गिळायचं…
आई वडील गेल्यावर शिक्षा असते त्या घरात जाणं…
चार भिंती आणि फक्त छप्पर उरलेलं पाहणं ते घर माहेर म्हणून शिल्लक नसलेलं..लोक म्हणतात,मुलीची पाठवणी करणं फार कठीण असतं,पण आई वडीलांची पाठवण करणं हेही हवं तेवढं सोपं नसतं…एकेक वस्तू पसारा म्हणून आवरतं जाणं… त्यांच्याच वास्तू मधील त्यांचेच स्पर्श पुसत जाणं…कानढळ्या बसल्या गत ‘परत कधी येणार’ या माहेरच्या एकाच प्रश्नाने संयमाचा बांध सुटायचा.सासरची वाट धरताना ‘माहेराला’ बिलगायची त्या मिठीत माहेरची माणसं एकवटून घ्यायची. ओलावलेल्या पापण्यांमध्ये अवघे माहेरपण,तो आनंद,ते उनाडपण साठवून दाटलेल्या कंठाने हुंदके देतच सासरची वाट धरायची…पुन्हा एकदा माहेरी येण्यासाठी…पुन्हा एकदा माहेरपण जगण्यासाठी…पण गेलेली माणसं कधीच परत येणार नाही…हा कडवटपणाचा घास न गिळण्या पलिकडचा झाल्यावर आता काय माहेरपण जगायचं यांची खंत खुप कमी वयातच पदरी पडल्यावर…त्याच्या झळा कशा सोसायच्या…
आई-वडीलच्या नावाची चादर जेंव्हा आयुष्यातून निघून जाते…तेंव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारी ची जाणिव करुन देत असते…मग या माहेरच्या आठवणीत दिवाळी कशी साजरी करायची.स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडायचं…
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद…मध्यच अडखळायचं, सावरायचं…काही वेळेनंतर भानावर येऊन हातातील बनवलेली आंब्याची पान तोडून त्याची सुंदर तोरणं माळ दारावर चढवली होती.ती छान शोभत होती…घरात कोणीही नव्हतं पण घरातील आठवणींची वर्दळ डोळ्यासमोर थैमान घालत होती.
अगदीच थोडा सडा,रांगोळी,फुलं जमवून देवघरातल्या जागे जवळ दिवा लावून यंदा ची दिवाळी साजरी केली.
उजळलेल्या दिव्याच्या प्रकाशात आई वडिलांच रूप डोळ्यात साठवून मीना सासरी वळली होती.
पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,मन अजून घरातच रेंगाळतंय..
दिव्याच्या लखलखटात बाहेरून,पण,माहेरघर अंधारात आठवणी शोधतंय..
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211 

****************************************

“रिकामी जागा…”

“रिकामी जागा…”
दिवाळी निमित्ताने घरावर याला सुरू केले,साफसफाई करता करता अचानक एका कोपऱ्यात एक डायरी निपचित पडलेले दिसली,आत जवळपास पंचवीस-तीस पोस्टकार्ड खच्चून भरलेले,खूप साऱ्या आठवणी आणि अनुभव पोटात घेऊन बसल्यासारखी.तिचं आणि माझं खूप जुनं नातं आहे हे मला एका नजरेत समजलं आणि मी स्वतःला आवरू शकले नाही.
<span;>एखाद्या वाऱ्याची झुळूक यावी आणि प्राजक्ताचा सडा पडावा तसं काहीस झालं,डायरी हातात घेताच् त्यातून पंचवीस-तीस पोस्टकार्ड खाली पडले आणि मी त्या शब्द फुलांच्या गंधात हरवून गेले……

एक झालं की एक असं पत्र वाचता वाचता मी एकेक दिवस जगू लागले.मला आजही आठवतं १९९७,वर्ग ९ वा,नुकतीच पप्पांची बदली होऊन आम्ही परभणीला स्वतःच्या घरी राहायला आलो होतो.नव शहर नवी शाळा पण पाथरीतल्या देवनांद्रा शाळेची नाळ काही तुटता तूटेना…

आमचा मुलींचा वर्ग,तीस-पस्तीस मुली पण प्रत्येकाचा चेहरा आणि नाव डोळ्यात,मनात अगदी सेव्ह करून ठेवल्यासारखा आठवतो.सर्वांची खूपच आठवण येत होती म्हणून एक पत्र लिहिलं आणि सरळ शाळेच्या पत्त्यावर वर्ग ९ वा असा पाठवून दिलं.आणि काय जादू झाली माहित नाही…एखादा बी पेरावं आणि त्यातून हजार दाणे पिकावे तसंच काहीसं झालं…आठ दिवसानंतर मला पत्र यायला सुरू झाले एक,दोन,चार,आठ… करताकरता तीस-पस्तीस पत्र जमले मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा पोस्टमन काका चिडून म्हणाले होते…कोण आहे ही प्रीती? हे काय आहे ? एवढे  पत्र ?…
मी काय तुझेच पत्र घेऊन येऊ का? मला काय दुसरे काम नाही का ?
सॉरी काका…,थँक्यू काका…म्हणून रोज त्यांचे समाधान करायचं कधी चहापाणी विचारायचं…आणि परत त्यांचा राग झेलण्या साठी दुसऱ्या दिवशी तयार राहायच…त्या अनोळखी नव्या शहरात,नव्या जगात रुजताना या पत्रांनी मात्र मला खतपाणी घातलं.शाळेतून घरी येताना एक वेगळीच उत्सुकता असायची,आज कुणाचा पत्र आलं असेल का ?

आणि एक दिवस असं पत्र आलं की आनंद आणि अश्रू मला नेमकं काय होत आहे तेच कळत नव्हतं…ते पत्र असं होतं …
दि.२९ जानेवारी १९९७ चे

प्रिय मैत्रीण प्रीतीस,
मीनाचा सप्रेम नमस्कार!
तुझे पत्र मिळाले.पत्र शाळेत आले वर्ग ९ वा.वाचून आणि ऐकून फार आनंद झाला.हो ऐकून…कारण पत्र येताच सगळ्या वर्गात गोंधळ उडाला.सगळ्यांना उत्सुकता झाली तुझी पत्र वाचण्याची आणि सरांनी मग पत्र वर्गात मोठ्याने वाचायला लावले,सर्वांना ऐकून फार आनंद झाला.प्रीति तुझ्या जागेवर विजया बसत होती. पण सरांनी तिला बसू दिले नाही सर म्हणाले की ती जागा तशीच रिकामी राहील…
खरंच प्रीती,तुझी जागा आमच्या मनात तशीच रिकामी राहील. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.काका-काकूंना साष्टांग नमस्कार,तुझ्या बहिणींना शुभाशीर्वाद. छान अभ्यास कर आणि आम्हाला पत्र लिहीत रहा,
तुझीच मैत्रीण
मीना…!
प्रिती विलासराव कंठके (केतकी)
9527126226 

*****************************************

… आणि तू म्हणतेस मिशा ठेव ! 

… आणि तू म्हणतेस मिशा ठेव !

या
विषारी विद्वेषाच्या काळात
माझंच वाटू लागलंय
मला भेव
आणि तू मात्र म्हणतेस
खुशाल मिशा ठेव..!
अगं,
दिसण्याचं काय
असण्याचंच अवघड झालंय
ठिकठिकाणी विचारली जातेय ओळख
दाही दिशांनी
अभिमन्यू सारखं
कौरवांनी घेरलंय

सैतानांनाच चढला आहे चेव
आणि तरीही तू म्हणतेस
खुशाल मिशा ठेव..?
आरवाय मिरवायचं सोड
स्वतः ला शाबूत
राखायचंच पडलंय कोडं
ते बघ,
सगळीकडेच फुटलेय
अफवांचे पेव
आणि तरीही तू म्हणतेस
खुशाल मिशा ठेव..?

      – मारोती कसाब, उदगीर

****************************************

पाइप लाइन

पाइप लाइन
नववीची परिक्षा संपली.एप्रिलचा पहिला पंधरवाडा संपला.तरी शाळेचे हेडमास्तर नरवाडे सरांनी १ मे पर्यंत मराठी,इंग्रजी, गणित असे तीन विषयाचे वर्ग सुरू केले. पंधरा दिवस सकाळी दहा वाजता शाळेत जा आणि एक वाजता भर उन्हात घराकडे अनवानी पायानं निघा.‌‌.‌‌. कंटाळा यायचा.नको वाटायचं उन्हात. घरी राहून तरी कुठं सुखात होतं…काही ना काहीतरी काम असायचं.त्यापेक्षा शाळाच बरी वाटायची…अन त्यातल्या त्यात वाचनाची आवड निर्माण झाली होती.दहावीच्या २१ अपेक्षित प्रश्नसंच मधील उतारे,कविता वाचून मुखोदगत झाल्या सारख्या झाले होते.
आज १ मे चा झेंडा म्हणून सकाळी लवकरच गेलो.झेंडा संपला.निकाल लागला.वर्गातले सगळे जन पास झाले. मी मार्क मेमो घेऊन निट मधल्या वाटनं गावाकडं निघालो.सोबत कोणीच नव्हतं.एकटाच होतो.वाटेत कडुनिंबाच्या पिकलेल्या पानांचं अंथरूण झाल होतं.नवु पालवी फुटू लागली…मी उन्हात झाडाच्या सावलीनं रमत गमत जात होतो.घरी पोहचलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते.माय घरीच होती.मी शाळेत जातानाच मला लवकर यायला सांगितलं होतं.मी हात पाय धुतले.जेवण केलं.सहज मायच्या तोंडाकडं पाहिलं.नेहमी आनंदात राहणारी माय मला उदास वाटत होती.तिच्या तोंडावर नूरच नव्हता.मी राहून राहून तिच्या तोंडाकडं पाहत होतो…पण मला कळायला काहीच मार्ग नव्हता.माझं जेवण आटोपलं तसं मायंन ताट धुतलं.फाटकं लुगडं बदलं.देवाच्या फोटोच्या पाया पडली अन मला ऐकू येईल असं जोरानं “हेही दिवसं जाऊ दे रं पांडूरंगा” म्हणून  मज्याकड आली.
“बापु आपल्याला धानो-याला जायचं म्हण रं” माय “अन कश्याला ” मी “बापानं तुझ्या पाइप लाइन खंदायचं गुत्तं घेतलयं म्हणं ” माय.
मी काहीच न बोलता मायकडं पाहत होतो…आता पर्यंत शाळा, घर,शेत अन् ढोरं एव्हढंच माहीत असलेला मी… मला दुस-या गावात कामाला जावं लागतूय हे जरा वेगळच वाटत होतं… काही वाटलं तरी जावंच लागणार होतं…
माय काही विसरलं तर नाही ना म्हणून घरातून बाहेर; बाहेरून घरात दोन तीनदा चक्करा मारली…तीला हे असं बाहेर गावी कामाला जाणं नवीन नव्हतं.पण तिला हाताला आलेलं,नवसानं झालेलं लेकरू कामाला निघत आहे…म्हणून आतून गलबलून येत होतं…तिच्या डोळ्यांच्या कडा वारंवार ओल्या होत होत्या.ते जाणवू नये म्हणून पदराने पुसून टाकायची.     
अंथरूण पांघरूण,ताटतांब्या,विळा कु-हाड,हे सगळं एका नायलॉनच्या पोत्यात भरून तोंड बांधलं होतं… तिकास पोत्यातून तोंड बाहेर काढत होती.म्हणून तिला बाहेर हातात घ्यायचं म्हणून मी बाहेर ठेवली.
सगळा पसारा भरलेलं पोत्याचं गठोडं मी डोक्यावर घेतलं… हातात तिकास घेतली…मायनं घराला किली लावली.भाईरचा झोपाटा लावून घेतला…निघालोत धानोऱ्याला जायला.मी पुढे माय मागं…मे महिन्यातलं दुपारचं रखरखतं उन्हं…मी तसाच अनवाणी पायाने चालत होतो…पायांना जास्त पोळू नये म्हणून मी झाडाच्या सावलीचा आधार घेऊन थांबत असे….कसे बसे करत घरापासून बसस्टँडला आलोत… घर ते बसस्टँड एक कि. मी.चे अंतर…बसस्टँडला आल्यावर डोक्यावरच पोतं खाली ठेवलं.हातातील तिकास पोत्याला लागुनच ठेवली…माय अन मी लिंबाच्या झाडाखाली बसून वाहन यायची वाट पाहत बसलो होतो….बाबा गुत्तेदार येणार आहे म्हणून सकाळीच नायगावला गेलेले…जीप आली जीपच्या टपा वर पोत्याचन गठोडं टाकलं… तिकास मध्ये ठेवली.माय माघच्या सिटवर बसली.मला बसायला जागा नव्हती, म्हणून मी जीपच्या पायदानावर उभा राहिलो.नायगाव येईस्तोर माय वारंवार मला आवाज देऊन नीट धर… चांगलं उभा रहा म्हणायची…नायगाव आलं…मायनं पैसे दिले…आता इथून नर्सी अन् तिथून धानोरा फाटा असं जायचं होतं…
नायगाव ते नर्सी आटोनं आलो.बाबा गुत्तेदारासंगं धानोऱ्याला गेल्याचं गावातल्या माणसाकडून नायगाव मधे कळालं.
नर्सी ते धानोरा पाटी जाणारे जीपवाले घेत नव्हते ….डायरेक्ट नर्सी ते मुखेड जाणारे प्रवासी बसवित होते.धनोरा पाटी म्हणलं की कोणताच जीप वाला बसू देत नव्हता.बराच वेळ झाला. कोणताच जिपवाला बसून घेत नव्हता.तेव्हढ्यात पाव्हण्यातला चांदुदादा आला.त्यानं मायीला पाहून जवळ आला.ख्याली खुशाली विचारली.कुठं जायचं आहे म्हणून विचारलं.‌..तेव्हा मायीनं बराच वेळ झाला तरी कोणता जीपवाला घेत नसल्याचं सांगितले…तेव्हा चांदुदादाच्या ओळखीच्या क्लिनरला सांगून जिपमध्ये बसायला जागा मिळाली.धानोरा पाटीला उतरून अजून दोन तीन किलोमीटर चालत जायचं होतं…आता कुठे चार साडेचार वाजले असतील. तरी उन्हाची तिरीप कमी झाली नव्हती.पाय पोळतं होते. मी झप झप चालत झाड गाठीत असे अन थोडा वेळ बसत असे.असं करत करत धानोरा गाव आलं…बाबा अन् गुत्तेदार रोडवरच थांबुन होते…मी जवळ गेलो तसं ते दोघेही पाण्याच्या टाकीजवळ जायचं म्हणून तिकडं गेले…मी अन माय तसेच पाण्याच्या टाकीखाली जाऊन बसलो…
बाबा अन् गुत्तेदार पाईप लाईन मोजमाप काडायला अन् सुरवात करायला गेले.थोडा वेळाने दोघेही आले.‌..हातात खोबरं साखर घेऊन…माझ्या कडे आर्धा खोबळा देतं गुतेदार म्हणाला “साधु,पोरगं मोठं झालंय…आलं गड्या हाताला “…
मी धोंड्यानं खोबळा फोडून खात बसलो.तोपर्यंत माय, बाबा अन् गुतेदार यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या…दिवस मावळतीला आला होता.पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या एका मावशीच्या घरी रात्रभर मुक्काम करायचा होता…त्या मावशीच्या घरापुढीच मायनं चुल पेटवली.भाकरी थापली. पिटलं केलं…जेवणं करून ती मावशी अन माय बोलत बसल्या. मला कधी झोप लागली कळालीच नाही.

सकाळी लवकर उठून बाबा काल नारळ फोडलेल्या ठिकाणी मला घेऊन भेगिण्याच आले…माय पण भाकरी भाजी करून घेऊन आली…तोपर्यंत दहा वाजले असतील…मी खुसा घेऊन खंदत होतो…बाबा लोखंडाच्या टोपल्यात मातोडा भरुन काढीत होते… दुपार झाली…मायला बहीणीच्या घरी सोडायला गेले  बाबा…तसा मी एकटाच तिकासीनं खंदण भरत होतो… संध्याकाळ झाली…अजून बाबा आले नव्हते.मी कामावरच काम थांबवून बसलो…मला काहीच सूचत नव्हतं…तेव्हढ्यात रात्रीच जेवण घेऊन आले…मी शाळंच्या व्हरांड्यातल्या हापस्याला हातपाय धुवून भाकरी खाली…झोप कधी लागली कळालं नाही…

असं करीत करीत एक आठवडा संपला.मला करमतं नव्हतं… दिवसभर काम करून रात्री जेवण आपणच बनवायचा कंटाळा येत होता…असंच एका दिवशी रात्रीला चपात्या करताना हाताला चटका बसला अन् डोळ्यातून खळखळ पाणी आलं… तसच बाकिच्या चपात्या केल्या.उडादाची दाळ अन चपात्या खाताना मायीची सारखी ध्यान येत होती.घस्यातुन घास खाली उतरत नव्हता…दोन दिवसापासून गुजामायचा संजू आला होता.तो एकटाच खंदत होता…तो माझ्याहून वयाने मोठ्ठा असला तरी आम्ही सारखेच दिसत होतो…  
दिवसभर खंदणे भरणे यामुळे शरीर खूप थकून जायचं अन त्यातल्या त्यात आपुणच हातानं करुन खायचं…जरा जास्तच लोड येत होता…दुपारी टाईमपास म्हणून नरवाडे सरांनी दिलेले निबंध वाचून काडायचो…  तेव्हढाच विरंगुळा व्हायचा… 
आता जवळ जवळ एक महिना होत आला असेल.मे महिना संपत आला होता.एके रात्री दिवसभर काम करून जेवण करून झोपलो होतो…दोन दिवसापुर्वी संजू गावाकडं गेला होता.अचानक वारं वावदान आलं …म्हणून मी अन बाबा कदमांच्या खारीतून जि.प.च्या शाळेत गेलो.एका खोलीची चावी बाबाकडं दिली होती. ती उघडून आत अंथरूण करून झोपलो…गार हव्यानं कधी झोप लागली कळालं नाही… सकाळी उठताना पाया खालील गोधडी ओलीचिंब झाली होती. खोलीत पाणी साचलं होतं.तसंच उठून गोधडी बाहीर व्हरांड्यात आणुन टाकली…अन् समोर पाहतो तर काय पाइपलाइन खंदलेल्या खारीत तळंच झालं होतं…कुठच जमीन दिसतं नव्हती…
मी माझ्या हातात खुसा,तिकास धरून आलेलं फोड अन् ते फुटून निघालेल्या सालपटाकडे पाहत होतो…माझ्या डोळ्यात समुद्र भरून आला….माझ्या डोळ्यातल्या  धारात मला बहीणीच्या लग्नासाठी झालेलं कर्ज…जळालेलं घरं…मायीचा निस्तेज चेहरा हेच दिसतं होतं…मी तसाच वाडोळच्यान उभा पाहून बाबाही जवळ आले…दोघंही समोरच्या साचलेल्या तळ्यात  पाइपलाइन शोधत होतो..!
– मुरारी गायकवाड
पोलिस उपनिरीक्षक,पोलिस ठाणे,वाढवणा (बुद्रुक) ता.उदगीर जि.लातूर
मो.९७६७३ ४६३१८ 

*****************************************

उठ मित्रा

 उठ मित्रा
 उठ
अरे
तुझी माझी व्यथा एक
तुझी माझी कथा एक
तुझ्या माझ्या दु:खाच्या
वेदनेची नाळ एक
म्हणून म्हणतो
भेदाच्या नितीला
जातीच्या गतीला
धर्मांच्या भिंतीनां
छेदुया.
राष्ट्रीच्या एकतेला
संविधानिक मूल्यांन साधुं या.

      बघ बघ
      ती लोकशाही
      रंगा-रंगा मधून बाटवली  जात्यायं
      मतांच्या रेटयामध्ये थाटवली जात्यायं
      विरोधाच्या सुराला देशद्रोहाण हिनवल 
      जातयं
     राष्ट्रभक्तीच्या ऐक्सर्यात माणसांना 
     नागवला जातयं
      
उठ मित्रा
उठ
शिका,संघटीत व्हा,संघर्ष कराच बियान
कांहीं काकरीत बेरलाया
पुन्हा त्याला पेरुया
चळवळीच्या लिशाण्यावर स्वतःला पारजूया
विचाराच्या पात्याला धार नवी देऊया
तारुण्याचा परिसावर दारिद्र्याला घासूया
सोने की चिडियाला नव्या रुपात पाहुया
          एक ध्यानात घेऊन या
सर्वजन आपल्याला दाबतील
विचाराला जातिच्या हिरवळीवर नेतील
निर्धाराला अफू चालतील
पण
डगमगायच नाय
जळमटाणा जून्या छाटूया
परिवर्तनाचे कलम नवे जोडूया.
       
                           प्रा.व्यंकट सूर्यवंशी.
                                   उदगीर

✍️******************

माझा गाव माझ्या अंगावर आल्यावानी वाटतोयं

शेजारच्या हमीदवार
मांगाच्या शमेलवर
सोबतच्या कांबळे वर
दाढीवाल्या कॉम्रेड वर
विद्रोही शाहिरावर
देशभक्तीचा सीसीटीव्ही कॅमेरा
डोळे वटारूण पाहतोय
आमचं माणूस असण्याचं स्वातंत्र्य
 इदेनाश करून टाकतयं

माझा गाव
सांस्कृतिक शीत युद्धाची रणभूमी होताना पाहतोय
महामानवाच्या जयंत्यां -पुण्यतिथ्यां
रमजान,ईद,मोहरम
गणपती,दसरा दिवाळी
पोलीस फोर्सच्या तैनातीत साजरे होताना पाहतोय
गावात धर्मनिरपेक्षता
दुःखाचे गाणे गाताना पाहतोय
माझा गाव माझ्या अंगावर आल्यावानी वाटतोय

गावचा चौक
कुटानकिची कार्यशाळा झालेला पाहतोय
राजकारणाचा भुंगा तरुणांचे तारुण्य कुरताडताना पाहतो
हाताला काम नाही
खिशात दाम नाही
नोकरीचं काही खरं नही

आम्हाला त्याची फिकर नाही
पक्षाचा कार्यकर्ता हाय
जातीचा नेता हाय
धर्माचा रक्षक हाय
गावच्या वेशीवत
माझा बॅनरवर भला मोठा फोटो हाय
याचा आम्हाला सार्थ अभिमान हाय
मंदिर मज्जिद विहार चर्च
कब्रस्तान स्मशान भूमीला
निधीची काय कमतरता नाय
गावचा विकास माणसाच्या वर्तमानात नाय
इतिहासाच्या पानात हाय
माणसाच्या विकासापेक्षा
माणसाच्या अस्मितेला मान हाय

माझा गाव माझ्या अंगावर आल्यावानी वाटतोयं
गावातला गावकूस खिंडार होताना पाहतोय
आलुतेदार बलुतेदार गारद होताना पाहतोय
बाकी गाव
शेतपडी पिकविमा अंजुमन बचत गटाच्या कर्जावर
राशींणच्या गहू तांदळावर जगताना पाहतोय
माझ्या गाव माझ्या अंगावर आल्यावानी वाटतोयं

                   व्यंकट तुकाराम सूर्यवंशी
                              उदगीर

                      9096197516

*****************************************

 

‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ मराठी ऑनलाइन वृत्तवाहिणी वेब पोर्टलवर सदरील दिवाळी विशेषांक देण्यात आला असून या विशेषांकांतील छापील पाने लेखांची झेरॉक्स प्रतिलिपी असल्याने हा विशेषांक विक्रीसाठी नाही.तसेच यातील लेखक,कवि व आदींच्या मजकुराशी संपादकीय मंडळ सहमतच असेल असे नाही…
संपादक
पुन्हा एकदा सर्व सन्माननियांचे अगदी मनापासून खुप खुप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा!!

✍️✍️


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !