जेष्ठ स्वा.के.एस.पाटील किन्हाळकर यांच्यावर शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.किन्हाळा येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किशनराव सटवाजी आहे पाटील किन्हाळकर (के.एस.पाटील,वय वर्ष ९८)यांचे वृद्धापकाळी अल्पश: आजाराने नांदेड येथे दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले.याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता गावी किन्हाळा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा सर्कल पोलीस इन्स्पेक्टर स्व. किशनराव सटवाजी पाटील किन्हाळकर हे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.भुजंगराव पाटील किन्हाळकर यांचे बंधू होत. जेष्ठ बंधूंसोबत त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे.तसेच आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या बळावर महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली व सर्कल पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले.दरम्यानच्या काळात त्यांनी उत्कृष्ट व निष्कलंक सेवा बजावत ‘सद्रक्षणाय,खल निग्रहणाय’ ची भूमिका बजावत अनेक अपराधींना गजाआड करण्याचे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य बजावले.भोकर तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून दिगांबरराव बिंदू महाविद्यालयाच्या उभारणीत ही त्यांचे योगदान आहे.निरोगी शरीरयष्टी लाभलेल्या किशनराव पाटील किन्हाळकर यांनी वयाच्या उत्तरार्धापर्यंत ही सायकलने प्रवास केला.एक उच्च पदस्थ पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या साधेपणाचे हे लक्षणीय उदाहरण आहे.माघील काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्यावर ते उपचार ही घेत होते.परंतू वयोमानानुसार त्या उपचारास यश आले नाही व नांदेड येथील घरी दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव मुळगावी किन्हाळा येथे आणण्यात आले.तसेच सायंकाळी ५:०० वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.महसूल प्रशासनाच्या वतीने तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे आणि नांदेड येथील पोलीस पथकाने मानवंदना दिली.तर त्यांचे जेष्ठ चिरंजीव विश्वास पाटील किन्हाळकर व कनिष्ठ चिरंजीव संजय पाटील किन्हाळकर यांनी मुखाग्नी दिला.माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर यांचे काकाश्री होत.या अंत्यसंस्कार समयी नातेवाईक,स्नेहिजण,शेतकरी,व्यापारी,राजकीय,प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.