Sat. Apr 19th, 2025

इंजि.विश्वंभर पवार हे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आंदोलनात झाले सहभागी

Spread the love

तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी मराठा आरक्षणासाठी टाकला पक्षीय कामावर बहिष्कार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सकल मराठा समाजास ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आरक्षण योध्या मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सबंध राज्यातून वाढता पाठिंबा मिळत असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अनेकांतून नाराजीचा सूर दिसत आहे.१५ टक्के राजकारण व ८५ टक्के समाजकारण करणाऱ्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेत्यांची भूमिका विसंगत वाटत असल्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठीकडे सोपविला असून आता प्रत्यक्षरित्या ते सामाजिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.तर भाजपाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी देखील मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षीय कामकाजावर बहिष्कार टाकला असून या निर्णयाबाबत त्यांनी पत्राद्वारे पक्ष श्रेष्ठीला माहिती दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सकल मराठा समाजास ओबीसी मध्ये समाविष्ट करावे व सरसकट आरक्षण द्यावे ही मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे.या न्यायीक मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी विविध आंदोलने केली असून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.परंतु या गंभीर प्रश्नाकडे विद्यमान राज्य व केंद्र सरकारने कमालीचे दुर्लक्ष केले आहे.तसेच विरोधी पक्ष नेते व कार्यकर्त्यांची भूमिका देखील दुटप्पी दिसत असल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.त्यामुळे मंत्री,खासदार,आमदार व विविध पक्ष पदाधिकाऱ्यांना राज्यातील अनेक गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
एकूणच मराठा समाजास न्याय मिळावा म्हणून उपरोक्त मागणीच्या व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ खासदार,आमदार,पक्षपदाधिकरी,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,यासह आदींनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे सत्र सुरू केलेले आहे.याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)उत्तर ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार व त्यांचे सहकारी आनंद पाटील सिंधिकर या दोघांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात पक्षश्रेष्ठीकडे नुकताच आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.तर भाजपा उत्तर ग्रामीणचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर यांनी देखील मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पक्षीय कामकाजावर बहिष्कार टाकला असून याबाबदचे पत्र जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांना दिले आहे. विद्यमान राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या उपरोक्त दोन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा अभिनंदनीय निर्णय घेतला असल्याने अनेकातून त्यांचे कौतून होत आहे.
तर राजीनामा दिलेले इंजि.विश्वंभर पवार हे मुंबईहून नुकतेच परतले असून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या विविध आंदोलनात प्रत्यक्षरित्या ते सहभागी झाले आहेत. भोकर तहसील कार्यालया समोर सुरू असलेल्या साखळी व अमरण उपोषण स्थळी दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन पाठींबा दिला आहे.याठिकाणी अमरण उपोषण करत असलेल्या बालाजी कदम पाटील बटाळकर व नागेश पाटील जाधव यांच्या अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने उपोषणकर्ते बालाजी कदम पाटील यांची तबीयत खालावली असून औषीधोपोचार घेण्यास त्यांनी नकार दिला होता.उपोषणकर्ते बालाजी कदम पाटील व नागेश पाटील जाधव यांनी आम्ही समाजासाठी मेलो तरी अमरण उपोषण मागे घेणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.परंतू एकाची तबियत खालावल्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन सामाजिक आंदोलनात सहभागी झालेल्या इंजि.विश्वंभर पवार,गणेश पाटील कापसे,विठ्ठल पाटील धोंडगे यांसह प्रशासनाने त्यांना विनंती केल्यावरुन त्या उपोषणकर्त्यांने शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार घेतला आहे.यावेळी इंजि. विश्वंभर पवार हे म्हणाले की,पक्षीय कामापेक्षा सामाजिक कामास प्रत्येकाने अधिक प्राधान्य द्यायला पाहिजे,म्हणूनच आम्ही सामाजिक कार्यात सहभागी झालो आहोत.तर किशोर पाटील लगळूदकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,सकल मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी राजकीय व्यासपीठावर जाणार नाही व पक्षीय कामकाज करनार नाही असा संकल्प केला आहे.यावेळी सदरील आंदोलनस्थळी आनंदराव पाटील बोरगावकर, संचालक गणेश पाटील कापसे,केशव पाटील सोळंके,गंपू पाटील नांदेकर,शंकर पाटील बोरगावकर,विठ्ठल पाटील धोंडगे, आनंद पाटील सिंधीकर, आनंद पाटील चिट्टे,राघोबा पाटील सोळंके,प्रताप पाटील जाधव बोरगावकर यासह आदी मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !