सर्वच शासनकर्त्यांनी मराठा समाजास झुलवत ठेवलय,आता हे जमणार नाही-शिवाजी पाटील किन्हाळकर
आंदोलनास भोकर तालुक्यातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी,असे विनंतीपर आवाहन ही त्यांनी केले आहे.
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करुन सरसकट आरक्षण द्यावे या मागणीवर ठाम असून त्यांच्या आंदोलनास संबंध राज्यासह भोकर तालुक्यातून ही उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. परंतू सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजास झुलवत ठेवलय, आता हे जमणार नाही. कारण मराठा समाज आता सावध झालेला आहे.हा लढा पुढे चालूच ठेऊ,या लढ्याचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी, असे विनंतीपर आवाहन भोकर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी त्यांना केले आहे.
भोकर तालुक्यातील अनेक गावांतून साखळी उपोषणे,अमरण उपोषणे,धरणे आंदोलन,रास्ता रोको आंदोलन यासह शांततेच्या मार्गाने कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा दिला जात आहे.भोकर तहसिल कार्यालया समोर मराठा समाज आंदोलकांनी साखळी उपोषण सुरु केले असून याच ठिकाणी बालाजी पाटील कदम बटाळकर व नागेश पाटील जाधव या दोघांनी बेमुद्दत अमरण उपोषण सुरु केले आहे.उपोषणकर्ते बालाजी पाटील कदम यांची प्रकृती बिघडली होती.त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला होता.परंतू यावेळी जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,गणेश पाटील कापसे, विठ्ठल पाटील धोंडगे यांसह आदींनी विनंती केल्यावरुन त्यांनी काल औषधोपचार घेतला.
याप्रसंगी साखळी उपोषणात प्रतिदिन सहभागी असलेले शिवाजी पाटील किन्हाळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,महाराष्ट्र निर्मिती पासून सत्तेत आलेल्या सर्वच शासनकर्त्यांनी आज पर्यंत मराठा समाजास केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. आमची मते,आमचा पैसा घ्यायचा व सत्तेत आले की सर्व आश्वासने विसरुन जायचे आणि आमच्याच पैशाचा गैरमार्गाने खर्च करायचा.परंतू ज्यांनी यांना सत्तेत पाठविलं त्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे डोळेझाक करायची. मराठा समाजाची परिस्थिती आज सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या खुपच बिकट झालेली आहे.त्यामुळे मराठा समाजास आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे.यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज लोकशाही मार्गाने लढा देत आहे.मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने ४० दिवसांत हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते.परंतू ते पाळले गेले नसल्याने पुन्हा आंदोलन सुरु करावे लागले आहे.राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.या आंदोलना दरम्यान त्यांची प्रकृती खालावत आहे.याबाबद शिवाजी पाटील किन्हाळकर म्हणाले की,अशा प्रकारचे त्यागी नेतृत्व अपवादात्मक लाभते.असे अनेक शासनकर्ते येतील जातील,आपली मागणी आज ना उद्या पुर्णत्वास येईलच.परंतू त्यांना काही झाले तर समाजाची खुप मोठी हानी होईल.यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तबियतेची काळजी घ्यावी,अशी आम्ही विनंती करतोत. तसेच समाजाची मागणी पुर्णत्वास येईपर्यंत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत राहू.हिंसक आंदोलनाचे आम्ही समर्थन करत नसून हा मार्ग कोणीही अवलंबू नये.कारण शांतताप्रिय मराठा समाज हा कधीही हिंसक आंदोलन करु शकत नाही,आरक्षण विरोधी भूमिकेचे काही लोक आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असून समाजाने त्यांच्या गैर मनसुब्यांना उधळून लावावे व लोकशाही मार्गानेच शांततेने आंदोलन करावेत,असे विनंतीपर आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.