भोकर पोलीसांनी सव्वा पाच लाख रुपयाचा गांजा पकडला
गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून ३ लाख रुपयाचा मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून मक्याचे कणीस घेणाऱ्या मालवाहू टेम्पोतील ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा नांदेड -भोकर वळण रस्त्यावरील डोंगरे टी पॉईंट येथे भोकर पोलीसांनी दि.२५ ऑगस्ट रोजी साफळा रचून पकडला आहे.तर घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून ३ लाख रुपये किंमतीचा मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विकण्यासाठी मक्याचे कणीस दररोज आणले जातात. तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून मक्याच्या कणीस घेऊन येत असलेल्या एका मालवाहू टेम्पो मध्ये गांजा आणत असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलीसांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता पो.उप.नि.दिगंबर पाटील,पो.उप.नि.विकास आडे,सहाय्यक पो.उप.नि.दिलीप जाधव,जमादार सोनाजी कानगुले,जमादार भिमराव जाधव,पो.कॉ. प्रमोद जोंधळे,विकास राठोड,लहु राठोड,जी. एन.आरेवार,आर.आर.जंकुट,पी.पी.गाडेकर, होमगार्ड सय्यद वाजेद आली यांसह आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सापळा रचून भोकर येथील नांदेड -भोकर वळण रस्त्यावरील डोंगरे टी पॉईंट येथे टी.एस.३६ टी.४२०२ क्रमांकाचा एक मालवाहू टेम्पो पखडला.या टेम्पो ची तपासणी केली असता मक्याचे कणीस भरलेल्या पोत्यांखाली एका पोत्यात उग्र वास येत असलेली गांजा सदृश आमली वनस्पती मिळाली.तज्ञांकडून तपासले असता ते गांजा असल्याचे समजले.वजन काटा मापकाकडून त्यांचे वजन केले असता ते ५२ किलो ५०० ग्राम असल्याचे निदर्शनास आले असून प्रति किलो १० हजार रुपये प्रमाणे त्याची एकूण किंमत ५ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदरील टेम्पो च्या चालकास व अन्य एकास पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे शेख रहीम निरामुद्दीन (६०) चालक,रा.इंदलवई मंडळ निजामाबाद व शेख करीम उर्फ शेख आरीफ शेख खादर पाशा (३३) मिस्त्री,रा.नसिम कॉलनी,निजामाबाद दोघेही तेलंगणा राज्यातील असल्याचे समजले.या दोघांना भोकर पोलीसांनी अटक केली असून ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा व ३ लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला आहे. सरकारी फिर्यादीवरून उपरोक्त दोघांविरुद्ध कलम ८ (क), २० (२) (११)(क) एन.डी.पी. एस.(NDPS) कायदा प्रमाणे भोकर पोलीसात दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील अधिक तपास पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगंबर पाटील हे करत आहेत.