म्हैसा येथील गड्डन्ना सुधा वाघू प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडले
महाराष्ट्र व तेलंगणा राज्य प्रशासनाच्या तत्परतेमुळे भोकर तालुक्यातील रावणगाव,लगळूद,दिवशी आदी गावांत शिरलेल्या सुधा,वाघू नदीचा पूर व बॅक वॉटरचा संभाव्य धोका टळला
अतिवृष्टी सदृश पावसामुळे नदी,नाले वाहताहेत दुथडी ; तर घरांत शिरले पूराचे पाणी व खरीप पिकांचे ही झाले आहे मोठे नुकसान
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : जिल्ह्यात व भोकर तालुक्यात दि.२६ जुलैच्या रात्री पासून सुरु झालेला संततधार पाऊस दि.२७ जुलै रोजी सायंकाळ पर्यंत सुरुच राहिला. भोकर तालुक्यातील मोघाळी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी तालुक्यात एकूणच अतिवृष्टी सदृश परिस्थिती झाली आहे.सुधा व वाघू नदीला पूर आल्याने लगळूद,रावणगाव, दिवशी,रेणापूर गावांतील काही घरात पूराचे पाणी शिरले.तर सुधा,वाघू नदीला आलेला पूर व तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे लगळूद,रावणगाव, दिवशी या गावांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भोकर तहसिलचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी जिल्हा प्रशासनास ही माहिती दिली.जिल्हा प्रशासनाने तेलंगणा राज्य प्रशासनास विनंती केल्यावरुन तेलंगणा राज्य प्रशासनाने तत्परता दाखवली व दि.२७ जुलै रोजी दुपारी गडन्ना सुधा वाघू प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आणि ९० हजार क्युसेस पाणी सोडून देण्यात आले.त्यामुळे उपरोक्त गावांचा संभाव्य धोखा टळला असून प्रकल्पा खालील व बॅक वॉटर पूर बाधित गावांतील नागरिकांनी सतर्क तथा सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासन आणि भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.
तालुक्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आला असून ते दुथडी भरुन वाहत आहेत. या नदी नाल्यांच्या पूराचे पाणी शेतात शिरल्याने व सखल भागात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दिवशी खु.व दिवशी बु., नांदा खु.नांदा म्है.प.,रायखोड, कामणगाव,रेणापूर, बोरगाव येथील पुलावरुन पूराचे पाणी वाहत होते.त्यामुळे काही तास वाहतूक बंद झाल्याने त्या गावांचा संपर्क तुटला होता.तसेच सुधा प्रकल्प भरल्याने सांडव्यावरुन ओसंडून वाहत असलेल्या व पावसाच्या पाण्यामुळे सुधा नदीला पूर आल्याने रेणापूर गावातील काही घरात पाणी शिरले व पुढे पाणी प्रवाह वाढत गेल्याने दिवशी खु.व दिवशी बु.येथील काही घरात ही पाणी शिरले.
लगळूद व रावणगाव शिवारात सुधा आणि वाघू नदी एकत्र येतात.या दोन नद्या एकत्र आल्याने पुराच्या पाणी प्रवाहाचा जोर व व्याप्ती वाढली.त्यामुळे लगळूद,रावणगाव येथील काही घरात पाणी शिरले.सुधा व वाघू नदीचा एकत्र संगम होऊन वाहत असलेल्या नदीवर तेलंगणा राज्यातील म्हैसा जि.निर्मल येथे गडन्ना सुधा वाघू प्रकल्प उभारण्यात आले आहे.झालेल्या पावसाने सुधा व वाघू नदीला हा मोठा पुर आला आणि त्यामुळे गडन्ना सुधा वाघू प्रकल्प ही भरले.ते भरल्यामुळे प्रकल्पाचे बॅक वॉटर,सुधा व वाघू नदीच्या पुराच्या पाण्यामुळे लगळूद,रावणगावला संभाव्य धोका निर्माण झाला होता.या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाय योजनेसाठी तेथे कर्तव्यावर असलेले मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्याबाबतची माहिती तहसिलदार राजेश लांडगे यांना दिली.खबरदारी व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली.
तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत व तहसिलदार राजेश लांडगे यांनी निर्मल जिल्हा प्रशासनास संपर्क साधला आणि गडन्ना सुधा वाघू प्रकल्पातील पाणी सोडून देण्याची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र व तेलंगणा राज्य प्रशासनाने तत्परता दाखवली.त्या अनुषंगाने मुधोळ( तेलंगणा राज्य) तालुक्याचे तहसिलदार व गडन्ना सुधा वाघू धरणाचे सहाय्यक अभियंता ए.श्रीकांत कारागिरी यांनी गडन्ना सुधा वाघू धरणास तात्काळ भेट देऊन पाणी परिस्थितीचा आढावा घेतला आणि दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान धरणाचे ६ दरवाजे उघडले.यातून जवळपास ९० हजार क्युसेस पाणी सोडून देण्यात आले.तसेच सहाय्यक अभियंता ए.श्रीकांत कारागिरी व डी.जी.अनिल यांनी धरणातील पाणी परिस्थितीवर लक्ष ठेवलेले असून रात्री देखील ते धरणावर तळ ठोकून बसले होते.धरणातील पाणी सोडून दिल्यामुळे बॅक वॉटर,सुधा व वाघू नदीच्या पुराचे पाणी ओसरले असून लगळूद,रावणगाव आणि दिवशी गावचा संभाव्य धोका टळला पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनास यश आले आहे.तहसिलदार राजेश लांडगे,तालुका कृषि अधिकारी मिसाळे,मंडळ अधिकारी शेख मुसा सरवर,खंदारे,तलाठी महेश जोशी,जलेश्वर गोदरे, एस.एम.कोटूरवार,मस्के यांनी रावणगाव येथे भेट दिली व नागरिकांशी संवाद साधून झालेल्या नुकसान परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच नागरिकांनी सतर्क व सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन केले आणि प्रशासन मदतीस सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.
नांदा म्है.प.येथे झाली ढगफुटी ; अनेक घरांत शिरले पुराचे पाणी
गुरुवार दि.२७ जुलै २०२३ रोजी दुपारी १:०० ते ३:०० वाजताच्या दरम्यान नांदा म्हैसा प.तालुका भोकर येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला.त्यामुळे गावाजवळील नाल्यास मोठा पूर आला व पुराचे पाणी अनेक घरांत शिरले.त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले.दिवसाची घटना असल्यामुळे नागरिकांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करुन जीव वाचविला.परंतू काही जणांचे अन्न,धान्य,मौल्यवान गृह उपयोगी वस्तू,कपडे,रोख रक्कम यांसह म्हैस,शेळी,कोंबड्या वाहून गेल्या.तर काही घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने मनुष्य जीवित हाणी झाली नाही.नांदा म्है.प.ता.भोकर येथे ढगफुटी सदृश पाऊस पहिल्यांदाच झाला असल्याचे नागरिकांतून सांगितल्या गेले असून याबाबदची माहिती मिळताच तहसिलदार राजेश लांडगे,तालुका कृषि अधिकारी मिसाळे,मंडळ अधिकारी शेख मुसा सरवर,खंदारे,तलाठी महेश जोशी,जलेश्वर गोदरे,एस.एम.कोटूरवार,मस्के यांनी भेट दिली व नागरिकांनी संवाद साधून झालेल्या नुकसान परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील व मदतीसाठी तो अहवाल शासनाकडे पाठवू,असे ही ते यावेळी म्हणाले.