Mon. Dec 23rd, 2024

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधनाचे लसीकरण करुन घ्यावे- डॉ.विजय चव्हाण

Spread the love

उत्तम बाबळे,संपादक

भोकर : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने अनेक सुक्ष्मजीवाणुंच्या वाढीसाठी हे वातावरण अनुकूल असते.त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर जसा होतो तसाच तो पशुधनाच्या आरोग्यावर ही होतो.परिणामी पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांची लागण होते आणि त्याची तीव्रता जास्त झाल्यास जनावरे दगावण्याचा धोका सर्वाधिक असतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजचे असल्याने भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कसलीही निष्काळजी न करता आपल्या पशुधनाचे लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन भोकर पंचायत समिती अंतर्गत पशुधन  विकास विभागाचे पशुधन अधिकारी तथा विस्तार अधिकारी डॉ.विजय चव्हाण यांनी केले आहे.

भोकर तालुक्यातील नोंदी नुसार गाई-२५५८८,म्हैस- ६३८१,बैल- ४३७०,मेंढ्या-२३२४,शेळ्या-१४६५७, लहान वासरे-१२२७ असे एकूण ५६५४७ पशुधन पशुपालक व शेतकऱ्यांकडे आहे.या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यात भोकर व किनी येथे श्रेणी-१,तर मोघाळी,भोसी,कांडली,पांडूरणा,पाळज, सोमठाणा येथे श्रेणी-२ चे पशु वैद्यकीय दवाखाने सेवारत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत,या दिवसात उद्भवणारे संभाव्य आजार लक्षात घेता पशुंच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.पशुधनातील मोठ्या जनावरांना जसे की,गाई,म्हशी यांच्यामध्ये घटसर्प तसेच फऱ्या (एकटांग्या) सारखे आजार उद्भवत असतात.या आजारांचे वेळीच उपचार न घेतल्यास जनावरांमध्ये त्रास वाढतो आणि परिणामी यात जनावरे दगावतात.या आजारांवर प्रतिबंध व्हावा म्हणून घटसर्पाची लस शासकीय पशु संवर्धन केंद्र अथवा पशु दवाखान्यात दिली जाते. तसेच लहान वासरांना फऱ्या (एक टांग्याची) लस दिली जाते. उपरोक्त आजारांच्या लसी भोकर तालुक्यातील सर्व पशु वैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत.तसेच दरम्यानच्या काळात देशभर व महाराष्ट्रात ही लम्पी आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. यामुळे अनेक शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. संशोधनाने लंम्पी आजारावर लस निर्मिती झाली असून या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी ती लस सर्वत्र उपलब्ध झाली आहे.

गाई,म्हशी आणि इतर मोठ्या जनावरांप्रमाणेच शेळ्या मेंढ्यांमध्ये देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजार उद्भवत असतात.यात लहान जनावरांसाठी देखील मान्सून पूर्व लसीकरण करणे आवश्यक आहे.बकऱ्यांमध्ये आंत्रविषार हा आजार होतो व या आजाराने देखील बकरी दगावतात.भोकर तालुक्यातील पशुधन सुरक्षेसाठी दि.२ जुलै २०२३ पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून दि.३१ जुलै २०२३ पर्यंत ही मोहीम सुरुच राहणार आहे.तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांतून जवळपास ४८९५० गोट पॉक्स लसीकरण झाले असून ९० टक्के लंम्पी लसीकरण ही करण्यात आले आहे.तसेच घटसर्प – २९४२, घटसर्प फऱ्या- ४८१६, आंत्रविषार – २१३५ असे रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.ही लसीकरण मोहीम दि.३१ जुलै पर्यंत अविरत सुरु राहणार असून भोकर तालुक्यातील सर्व पशुपालक व शेतकऱ्यांनी यांचा लाभ घेऊन आपल्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि पशुधन सुरक्षीत ठेवावे,असे आवाहन भोकर पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास व संवर्धन विभागाने केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !