Mon. Dec 23rd, 2024

शासन आपल्या दारी… परंतू धान्य व अनुदान ही नाही शेतकरी लाभार्थींच्या पदरी

Spread the love

भोकर तालुक्यातील २२ हजार ६९४ स्वस्त धान्य शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थीं अनुदानाच्या प्रतीक्षेत

उत्तम बाबळे,संपादक

भोकर : राज्य शासनाने गत वर्षी स्वस्त धान्य शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थींना देण्यात येणारे गहू,तांदूळ हे स्वस्त धान्य बंद केले व त्या ऐवजी जानेवारी २०२३ पासून प्रति लाभार्थीस १५० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले. याविषयीचा अध्यादेश फेब्रुवारी २०२३ मध्ये काढण्यात आला व यास जवळपास ६ महिने झालीत.परंतू अद्यापही त्या शेतकरी लाभार्थींना अनुदान मिळालेच नाही.विद्यमान राज्य सरकार “शासन आपल्या दारी…”हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवित असतांना ना स्वस्त धान्य ना अनुदान या शेतकरी लाभार्थींच्या पदरी पडल्याचे बोलल्या जात असून भोकर तालुक्यातील २२ हजार ६९४ स्वस्त धान्य शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थी त्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींना गहू,तांदूळ व अन्य धान्याचा लाभ दिला जात होता.सन २०२२ घ्या अखेरीस हा लाभ देण्याचे राज्य शासनाने बंद केले. परंतू प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थींना तो लाभ देणे सुरू ठेवले.यामळे शेतकरी लाभार्थींतून रोष व्यक्त होऊ लागला.यामुळे विद्यमान सरकारने शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींना त्या धान्याऐवजी प्रति लाभार्थीस १५० रुपये अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली.याबाबद फेब्रुवारी २०२३ मध्ये अध्यादेश काढण्यात आला.त्या अध्यादेशानुसार छत्रपती संभाजी नगर,जालना, धाराशिव,नांदेड,बीड,परभणी,हिंगोली,लातूर, अमरावती,अकोला,यवतमाळ,वासिम,बुलढाणा,वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी शिधापत्रिका धारक गटातील शेतकरी लाभार्थींना प्रति लाभार्थी १५० रुपये प्रति महिना एवढी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम लाभार्थींच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.

यानुसार नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींना ते अनुदान मिळणे अपेक्षित आहे. तालुक्यात प्राधान्य – १८ हजार ७७८ शिधापत्रिका धारक असून यात ७३ हजार ९४५ लाभार्थी,अंत्योदय- २ हजार ८१८ शिधापत्रिका धारक असून यात १२ हजार २५६ लाभार्थी आहेत.तर शेतकरी – ५ हजार ८९४ शिधापत्रिका धारक असून यात २२ हजार ६९४ लाभार्थी आहेत.प्राधान्य व अंत्योदय लाभार्थींना स्वस्त धान्याचा पुरवठा लाभ मिळत आहे.तर शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींना धान्याऐवजी प्रति लाभार्थीस प्रति महिना १५० रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे.तीन महिन्यास एक वेळ लाभ या प्रमाणे ६ महिन्यांचे दोन टप्प्यातील अनुदान प्रति लाभार्थीस ९०० रुपये मिळणे अपेक्षित आहे.परंतू शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींना अनुदानाचा हा लाभ अद्यापही मिळालाच नाही.तर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते नसल्याची अडचण,लाभार्थींचे फार्म भरुन घेण्यात व भरुन देण्यात काही स्वस्त धान्य दुकानदार आणि लाभार्थींची ही उदासिनता असल्याने जवळपास २५ ते ३० टक्के शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थी या अनुदान योजनेपासून वंचित राहणार आहेत असे समजते. सदरील लाभार्थींची योग्य नोंदणी झाली तर उपरोक्त लाभार्थींच्या संख्येत वाढ होईल असे ही सांगण्यात येत आहे.अद्याप तरी या योजनेचा लाभ मिळालेला नाही. धान्य तर नाहीच,अनुदान रक्कम मिळाली असती तर किमान ती पेरणीच्या काही तरी आली असती.एकूणच या शेतकरी लाभार्थींना आता स्वस्त धान्यही मिळत नाही आणि अनुदानाचे पैसेही मिळाले नसल्याने शेतकरी लाभार्थीं खुप अडचणीत सापडले आहेत. अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ती रोख रक्कम शासनाकडून मिळावी अशी आशा व्यक्त केली आहे.

शेतकरी लाभार्थींना ती अनुदान रक्कम लवकरच मिळणार – नायब तहसिलदार रेखा चामणर

तहसिल कार्यालय भोकर च्या पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार रेखा चामणर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की,तालुक्यातील शेतकरी शिधापत्रिका धारक लाभार्थींचा प्राप्त डाटा आम्ही शासनाच्या संकेतस्थळावर पाठविला असून प्रायोगिक तत्त्वावर रेणापूर ता.भोकर येथील लाभार्थींच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे.यातही काही त्रुट्या निघाल्या असून त्या त्रुट्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. लाभार्थींना ती रक्कम दोन टप्प्यांत त्वरित मिळावी यासाठी तहसिलदार राजेश लांडगे वरिष्ठ पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करत आहोत.तालुक्यातील लाभार्थींचा प्राप्त डाटा संकेत स्थळावर आता उपलब्ध केलेला असून प्रशासनाद्वारे लवकरच ती अनुदान रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !