कायदा,शांतता व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भोकरमध्ये झाले पोलीस पथसंचलन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : बकरी ईद व सण उत्सवाच्या काळात कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर भोकर पोलीसांच्या वतीने जलदगती दंगा नियंत्रण पोलीस पथकासह भोकर पोलीसांनी शहरातील मुख्य रस्त्याने अगदी शिस्तबद्धतेने दि.१७ जून रोजी पथसंचलन केले आहे.

आगामी सण उत्सवांच्या दरम्यान कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवा सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहिल असा विश्वास नागरिकांत दर्शविण्याच्या पार्श्वभूमीवर भोकर पोलीस ठाणे प्रांगण येथून सकाळी १०:०० वाजता निघालेले पथसंचलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रशीद टेकडी,हिंदू दहनभूमी,शासकीय ग्रामीण रुग्णालय,टिपू सुलतान चौक,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,तहसील कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अशा प्रकारे शहरातील मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाले व सकाळी ११:०० वाजता परत पोलीस ठाणे प्रांगणात येऊन त्याची सांगता करण्यात आली.

सदरील पथसंचलनात रंगा रेड्डी अल्फा ९९ बटालियन (रॅपिड ॲक्शन फोर्स ९९ बटालियन) जलदगती दंगा नियंत्रण पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट टी.पी.बघेल, पोलीस निरीक्षक जटाशंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली ७४ जवान,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना (आयपीएस),भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी व २० कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला होता.भोकर शहरातील मुख्य रस्त्याने अगदी शिस्तबद्धतेने काढण्यात आलेले हे पथसंचलन शहरवासीयांचे आकर्षण ठरल्याने ते पाहण्यासाठी पथसंचलन मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त अशी एकच गर्दी केली होती.
