खरिपाची तयारी कृषि विभाग आपल्या दारी : धावरी बु.येथे बैठक संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : खरिपाची तयारी कृषि विभाग आपल्या दारी कार्यक्रम अनुषंगाने धावरी बु.ता.भोकर येथे राजकुमार रणवीर,उपविभागीय कृषि अधिकारी किनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि.११ जून २०२३ रोजी शेतकरी मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने उपस्थित मार्गदर्शक,मान्यवर व शेतकरी बांधवांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळ कृषि अधिकारी रामहरी मिसाळ यांनी प्रास्ताविकातून सदरील बैठक घेण्यामागील पार्श्वभूमी विषद केली.तर भोकर तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गीते यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणे,बीज प्रक्रिया,रुंद सरी वरंबा (BBF) तंत्रज्ञानाचा वापर,निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करणे यांसह आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले.तसेच किनवट उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर यांनी बदलत्या हवामानानुसार एस.आर.टी. तंत्रज्ञानाचा वापर करणे,यांसह फळबागेचे महत्त्व याबद्दल सखोल मार्गदर्शन केले व प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान ४० टक्के क्षेत्रावर फळबाग लागवड करावी असे आवाहन ही केले.
बहुसंख्य शेतकरी उपस्थित असलेल्या सदरील बैठकीस उपरोक्त अधिकाऱ्यांसह भोकरचे कृषी पर्यवेक्षक रवि तांडे,धावरीचे कृषि सहाय्यक चंद्रकांत इरलेवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सदरील बैठक यशस्वीतेसाठी धावरी बु.येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.