अतिशय दुर्दैवी घटना ; तलाठी नरेंद्र मुडगूलवार यांचा पोहताना मृत्यू
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मुदखेड तहसील कार्यालयांतर्गत सेवारत असलेले व भोकर येथील माजी तलाठी नरेंद्र वसंतराव मउडगूलवआर हे दि.१ एप्रिल रोजी भोकर जवळील धानोरा तलावात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडवून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला असून त्यांच्या आकस्मित मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुदखेड तहसिल कार्यालयांतर्गत माळ कौठा साजरा येथे सेवारत असलेले तलाठी नरेंद्र वसंतराव मुडगुलवार हे दि.१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भोकर जवळील धानोरा तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते.पोहत असताना त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने श्वास कोंडला व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद घटना घडली आहे.भोकर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली व पार्थिव नातेवाईकांना देण्यात आले. नारायणपेठ ता.घाटंजी जि.यवतमाळ येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी व सहा वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे.अतिशय मनमिळाऊ व सेवाभावी कार्यतत्पर कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती.यामुळेच भोकर ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणला असता पाहण्यासाठी येथे अनेकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयालयातील अवर सचिव राजेंद्र खंदारे,भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे,मुदखेड चे तहसिलदार तथा भोकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे, नायब तहसीलदार संजय सोलंकर,रेखा चामणर, मुदखेडचे नायब तहसीलदार संजय नागमवाड, अर्धापूरचे नायब तहसीलदार मारोती जगताप नायब, भोकरचे मंडळाधिकारी महेश वाकडे,तलाठी महेश जोशी यांसह भोकर,मुदखेड व अर्धापूर तहसिल कार्यालयातील बहुतांश महसूल कर्मचारी उपस्थित होते.भोकर येथे तलाठी म्हणून जवळपास ६ वर्ष त्यांनी काम केलं होतं व अत्यंत मनमिळावू व सुशील स्वभावाच्या या कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्व स्तरातील नागरिकांतून ही हळहळ व्यक्त होत आहे.तर या प्रकरणी भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास जमादार नामदेव जाधव हे करत आहेत.