पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ सदैव प्रयत्नशील- उत्तम बाबळे
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या भोकर तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरित
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस पत्रकार बांधवांना विविध समस्यांसह आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.ती आव्हाने पेलत देश व राज्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ सेवारत झाला असून मराठवाड्यातील पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,असे प्रतिपादन मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरणचा कार्यक्रम दि.८ मार्च २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे,नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर,नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती निखारे व पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोशी यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर चे तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड,तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,तालुका सचिव आर.के. कदम,तालुका उपाध्यक्ष विजय चिंतावार,कमलाकर बरकमकर,सहसचिव विठ्ठल सुरलेकर,समन्वयक शुभम नर्तावार,सहकोषाध्यक्ष गजानन गाडेकर,सदस्य विशाल जाधव,अंबादास बोयावार,संभाजी कदम,निळकंठ पडवळे यांसह सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांना ओळखपत्र वितरित करण्यात आले व सर्वांचे अभिनंदन करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तर या कार्यक्रम प्रसंगी अभिनंदन व शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे म्हणाले की,सदरील पत्रकार संघ संघाची एकसंघ शक्ती मोठी असून या संघांशी अन्य २५ सामाजिक सेवाभावी कार्यकारीणी संलग्न आहेत.त्या कार्यकारिणींचा विस्तार आपण सर्वांनी करावा,असे ही ते म्हणाले.तसेच जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर म्हणाले की,आपल्या पत्रकार बांधवांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या विरुद्धचे सर्व गुन्हे मी माझ्यावर घेईल व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे म्हणाले की, निस्वार्थ सेवाभावातून आपण पत्रकारिता करतोत त्यामुळे सक्षम कुटूंब निर्मितीत मागे पडतोय.म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकार बांधवांच्या पत्रकारितेसोबत लघुउद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे.तर अध्यक्षिय समारोपात बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या शाखांचे विस्तारिकरण होत असून अधिकाधिक पत्रकार बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल व निष्कलंक पत्रकारिता करुन संघटनेचे नावलौकिक जनसामान्यांत ठेविल अशी ग्वाही दिली.तर बहुसंख्य पत्रकार बांधवांची उपस्थिती असलेल्या या ओळखपत्र वितरण कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन प्रा.आर.के.कदम यांनी केले व उपस्थितांचे आभार गंगाधर पडवळे यांनी मानले.