आज भोकर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेच्या शुशोभिकरणाचे लोकार्पण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे हे लोकार्पण ; भोकरच्या विकास सौंदर्यात पडणार भर
सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी शुशोभिकरणाचे विकास काम करण्यात आले असून या कामाचे दि.१९ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.तर सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या क्रक्रमांत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे या महापुरुषांच्या नियोजित पुतळ्यांच्या जागा आहेत. महापुरुषांचे पुतळे उभारल्याने व शुशोभिकरणातून भोकरच्या प्रेरणादायी विचार आणि विकास सौंदर्यात भर पडू शकते.यामुळे अनेक वर्षांपासून या नियोजित पुतळ्यांच्या जागेसह आदी महापुरुषांच्या पुतळ्यांच्या नियोजित जागेचे सुशोभिकरण व्हावे व पुतळे उभारण्यात यावेत अशी मागणी अनेकांतून होत होती.याच अनुषंगाने सर्वप्रथम भोकर नगर परिषदेच्या वतीने ६५ लक्ष निधीची तरतुद करण्यात आली व यातूनच खर्च करुन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले आहे.तर उर्वरित ठिकाणी देखील अशा प्रकारे सुशोभिकरण लवकरात लवकर व्हावे,हे देखील अपेक्षित आहे.असे असले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या शुशोभिकरणाने शिप्रेमींतून समाधान व्यक्त होत असून आनंदोत्सव साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता या शुशोभिकरणाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून या लोकार्पण सोहळ्यास भोकर नगर परिषदेचे प्रशासक तथा प्र.भोकर उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे यांसह अनेक शिव प्रेमींची उपस्थिती राहणार आहे.तरी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी केले आहे.
तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती भोकरच्या वतीने सकाळी ९:०० वाजता राजमाता जिजाऊ चौक भोकर येथून भव्य मोटारसायकल रॅली निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सकाळी १०:०० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.तर याच ठिकाणी सकाळी १०:३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यानंतर सकाळी ११:०० वाजता भोकर शहरातील मुख्य रस्त्याने विविध वेशभुषा परिधान केलेल्या शिवप्रेमींच्या सहभागाने अश्वपथक,झांज पथक, ढोल ताशा पथक,लेझीम पथक,भजनी मंडळी व बँड च्या सुमधूर सुरांनी सजलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रांची भव्य शोभायात्रा निघणार आहे.
तसेच दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर ऑनलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम यशस्वी व्हावेत यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कपिल पाटील किन्हाळकर,सचिव आनंद पाटील सिंधीकर,उपाध्यक्ष गोविंद पाटील ढगे चिदगिरीकर,शंकर पाटील बोरगावकर,संदीप पाटील गौड,विठ्ठल पाटील धोंडगे,मारुती अंगरवार,आनंद ढोले, कोषाध्यक्ष कृष्णा कोंडलवार,सल्लागार अमोल पाटील पवार, उमेश पाटील कापसे,गजू पाटील सोळंके, विश्वंभर पवार साहेब, विशाल पाटील माने,गजू पाटील भिशीकर,सदस्य दशरथ पाटील हसापूरकर,जितेंद्र सावंत,सुनील नरवाडे,दीपक वर्षेवार,विजय पवार,रवी वर्षेवार,सचिन पाटील कल्याणकर,अनिल पाटील भोसले यांसह आदी पदाधिकारी परिश्रम घेत असून सदरील सर्व कार्यक्रमांत शिवप्रेमींनी बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.