अरेच्चा…माणसाच्या जिवापेक्षा कोंबडी अधिक किमतीची असते का हो?
कोंबडी चोरल्याचा संशयावरुन भोसी येथे एकावर झाला प्राणघातक हल्ला ; भोकर पोलीसात दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील भोसी येथे कोंबडी चोरल्याचा संशयावरुन एकास काठीने मारहाण होत असतांना ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर खंजीरने वार करण्यात आला.यात तो गंभीर जखमी झाला असून भोकर पोलीसात दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सदरील घटनेमुळे माणसाच्या जीवापेक्षा कोंबडी अधिक किमतीची असते का हो ? अशी चर्चा परिसरात होत आहे.
अधिकचे असे की,मौ.भोसी ता.भोकर येथे दि.२३ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान गावातील गेंदू पवार हे बस थांब्यावर थांबले असता शंकर पवार ता.भोसी हे तेथे आले व त्यांची कोंबडी चोरल्याचा संशय करुन अश्लील शिवीगाळ करत गेंदू पवार यांना काठीने मारहाण केली.यावेळी गेंदू पवार यांचा पुतण्या अक्षय रामा पवार (१८) हा तेथे आला व काकांना होत असलेली मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करत असतांनाच सदाशिव पवार ता. भोसी हा तेथे आला आणि त्याने त्याच्या जवळील खंजीरने अक्षय पवार यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.तो वार अक्षय पवारने चुकविला,परंतू तो वार डोक्यावर झाला. तसेच त्याने दुसरा वार गालावर केला.यात अक्षय पवार हा गंभीर जखमी झाला.
जखमी अक्षय पवार यास उपचारार्थ तात्काळ नांदेड येथे नेण्यात आले.उपचारानंतर अक्षय पवार यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व शंकर पवार आणि सदाशिव पवार,दोघे ही रा.भोसी ता.भोकर यांच्या विरुद्ध दि.२७ जानेवारी २०२३ रोजी रितसर फिर्याद दिली.यावरुन उपरोक्त दोघांविरुद्ध गु.र.नं.३८/२०२३ कलम ३०७,२९४,३४ भादंवि प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.तर कोंबडीसाठी लाखमोलाची माणसं एकमेकांच्या जीवावर उठली असल्याची चिंतनीय घटना घडली असल्याने माणसाच्या जीवापेक्षा कोंबडी अधिक किमतीची असते का हो ? असा प्रश्न समाजात निर्माण करणा-या या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.नि. अवधुत कुशे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.उप.नि.राणी भोंडवे या करत आहेत.