विधवा महिला होमगार्डच्या कन्येच्या विवाहासाठी २० हजारांची मदत
कंधार व नांदेडच्या होमगार्ड यांनी राबविला हा स्तुत्य उपक्रम
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : कंधार पथकातील विधवा महिला होमगार्ड श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांच्या मुलीच्या विवाहासाठी होमगार्ड अधिकारी व जवानांनी दि.२७ जानेवारी रोजी २० हजार रुपायांची आर्थिक मदत केली आहे.
महिला होमगार्ड श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांचे पती सुनिल सूर्यवंशी यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये निधन झाले.त्यांच्या मुलीचा विवाह येत्या दि.२९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.कुटूंबकर्ता गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली असल्याची जाणीव असल्यामुळे कंधारचे समादेक अधिकारी बालाजी डफडे यांनी पुढाकार घेऊन होमगार्ड अधिकारी व जवानांनी स्वः ईच्छेने आर्थिक मदत करावी अशी संकल्पना मांडली.यातून १५ हजार रुपाये जमा झाले.सदरील रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात येणार होती.परंतू हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अबिनाश कुमार यांना मिळताच त्यांनी स्वःत ५ हजार रुपयांची मदत देऊन जिल्ह्यातील सर्व होमगार्ड्स यांचे पालक असल्याचे आपल्या कृतीतून दाखऊन दिले.तसेच सर्व होमगार्ड्स यांच्या सुःख, दुःखात आपण सदैव सहभागी असल्याची जाणीव निर्माण करून दिली.
अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अबिनाश कुमार (भा.पो.से.)यांच्यारुपाने एक कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय त्याच बरोबर माणुसकीचा जीवंत झरा असलेले प्रेमळ व मायाळू नेतृत्व लाभल्याची भावना उपस्थित होमगार्ड अधिकारी व जवानांनी व्यक्त केली आहे.तसेच दि.२७ जानेवारी २०२३ रोजी सदरील रक्कम श्रीमती शारदा सूर्यवंशी- कदम यांना होमगार्ड जिल्हा कार्यालयात सुपुर्द करण्यात आली आहे.या वेळी प्रशासक अधिकारी भगवान शेट्टे,केंद्र नायक अरुण परिहार,कंधारचे समादेशक अधिकारी बालाजी डफडे,नांदेडचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,पलटन नायक गुंडेराव खेडकर,पलटन नायक बळवंत अटकोरे, महिला होमगार्ड द्रोपदा पवार,मिरा कांबळे,सारिका सोनकांबळे,निर्मला वाघमारे यांच्यासह आदी महिला व पुरुष होमगार्ड्स यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.