कोणावर नाराज आहोत म्हणून नव्हे तर प्रश्न सोडविणाऱ्यासाठी मतदान करावं-खा. चिखलीकर
उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थच्या बैठकीत भोकर येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मागील कार्यकाळात विद्यमान शिक्षक आमदाराने कामे केली नाहीत म्हणून केवळ नाराजी व्यक्त करत बसू नये.तर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविणारा उमेदवार भाजपा-शिंदे शिवसेना युतीने दिला आहे.त्यामुळे कोणावर नाराज आहोत म्हणून नव्हे तर प्रश्न सोडविणाऱ्यासाठी मतदान करावे,असे आवाहन नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी औरंगाबाद (छत्रपती संभाजी महाराज नगर) शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ दि.२४ जानेवारी रोजी भोकर येथे आयोजित मतदारांशी संवाद बैठक कार्यक्रम प्रसंगी केले आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडून प्रचाराला वेग आला असून त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्ह्यातील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यास्तव भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय आणि माऊली मंगल कार्यालय येथे दि.२४ जानेवारी २०२३ रोजी बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.

श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथे आयोजित बैठकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,श्रावण भिलवंडे,सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गणेश पाटील कापसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर यांसह आदींची उपस्थिती होती.तर माऊली मंगल कार्यालय भोकर येथील बैठकीस खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,संघटन मंत्री गंगाधरराव जोशी,डॉ.माधवराव उंचेकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,गणेश पाटील कापसे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,प्रकाश मामा कोंडलवार, सुभाष पाटील कोळगावकर,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,भाजपा शहराध्यक्ष विशाल माने,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर यांसह आदींची उपस्थिती होती.

श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथील बैठकीत प्रास्ताविकातून उपप्राचार्य संजय सावंत देशमुख यांनी बैठकीस अनुसरुन शिक्षकांच्या समस्या मांडल्या.तर श्री शाहू विद्यालय व गोरठेकर परिवाराशी आमचे कौटूंबिक नाते असल्याने त्या समस्या माझ्याच परिवारातील असल्यामुळे प्रा.किरण पाटील आणि मी सोडविण्याचा प्रयत्न करेन,असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थित शिक्षक मतदारांना आश्वस्त केले. बैठकीचे सुत्रसंचालन जोंधळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार किनेवाड यांनी मानले.सदरील बैठकीस बहुसंख्येने शिक्षक मतदारांची उपस्थिती होती.
तसेच माऊली मंगल कार्यालय,भोकर येथील बैठकीचे प्रास्ताविकपर मनोगत भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी व्यक्त केले.तर भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून उपस्थित मतदारांना उमेदवार प्रा.किरण पाटील यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन विजयी करावे असे आवाहन केले.तसेच यावेळी माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर म्हणाले की,राज्याचे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेत विविध समस्यांविषयी अभ्यास असलेले अनेक बुद्धीजिवी आमदारांना(सदस्य) पाठविले जाते.सभागृहात त्यांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नांचे उत्तरे देऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांना देखील आपल्याही अभ्यास आणि बुद्धीची कस पणाला लावावी लागते.समस्यांचा आयाम काय व त्यांची जान असणाऱ्या व्यक्तींनाच या सभागृहात पाठविले जाते.ही निवडणूक अशा अभ्यासूंना आमदार म्हणून त्या सभागृहात पाठविण्याचीच आहे.म्हणूनच प्रा.किरण पाटील यांच्या सारखा अभ्यासू व समस्यांची जान असलेला उमेदवार दिलेला आहे.आपण या उमेदवारास पहिल्या पसंतीचे मतदान करावे,असे ही ते म्हणाले.

तर यावेळी उपस्थित शिक्षक मतदारांशी संवाद साधताना आपल्या विविध समस्या मांडल्या.त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतल्यानंतर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, प्रश्न पेन्शनचा असो वा अनुदानचा असो,किंवा अनुदाणोत्तर अनुदानचा असो,यांसह अन्य कोणत्याही समस्या असोत आमचे सरकार त्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक आहे. परवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे विधानही केले असून होत असलेल्या निवडणुकीनंतर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगला,योग्य तो निर्णय घेतील यात शंका नाही.परंतू तुमच्या सर्व समस्या,प्रश्न सोडविण्यासाठी प्रा.किरण पाटील यांसारखा एक चांगला,सक्षम, अभ्यासू उमेदवार भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी दिला आहे.त्यामुळे भोकर तालुक्यातील सर्व मतदार शिक्षक बंधू, भगिनींनी त्यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन भरघोस मतांनी निवडून द्यावे,अशी मी विनंती करतो,असे आवाहन त्यांनी केले.
सदरील बैठकीस भोकर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक मतदारांची उपस्थिती होती.या बैठकीचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रशांत पोपशेटवार यांनी केले.