तहसिलदार राजेश लांडगे यांनी मिटविला रस्त्याचा वाद
हळदा ता.भोकर येथील पाणंद रस्त्याचा गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेला वाद मिटविल्याने शेतकरी महिलांनी मानले त्यांचे आभार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील हाळदा येथील पाणंद रस्त्यात अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे विशेष करून शेतकरी महिलांनी तहसिलदार तथा प्र. उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांना निवेदनाद्वारे तक्रार देऊन रस्त्याचा वाद त्वरित मिटविण्याची विनंती केली होती.याची दखल घेऊन दि.१९ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी जाय मोक्यावर येऊन त्या रस्त्याची पाहणी केली व गेल्या ४० वर्षापासून असलेला वाद मिटविण्यासाठी वादी व प्रतिवादी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्यात समेट घडून आणला आणि तो वाद मिटविला.त्यामुळे सर्व शेतकरी व विशेषत: शेतकरी महिलांनी त्यांचे मनापासून आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.
याबाबत असे की,हाळदा ते धारजणी पाणंद रस्त्यावर गावातील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना आपली गुरे ढोरे,बैलगाडी घेऊन शेताकडे जावे लागते.परंतू हा पानंद रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाने खुपच अरुंद होत गेल्याने शेतकरी व शेतकरी महिला आणि शेतमजूर यांना त्या शेताकडे जाणे अत्यंत जिक्रीचे झाले होते.नव्हे तर तारेवरची कसरत करावी लागत होती.तसेच बैलगाडी घेऊन जाणे बंद झाल्यामुळे शेतीला लागणारी खते,बी-बियाणे,शेती अवजारे नेते व शेतात पिकलेला माल घेऊन येणे खुपच अवघड झाले होते.शेतकऱ्यांना सर्व काही डोक्यावर घेऊन ये-जा करावी लागत होती.रस्ता नसल्याने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांसोबत अनेकदा वाद विवाद होऊन मोठी भांडणे होत होती.त्यामुळे हा वाद-मिटविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित पंच मंडळीनी अनेकवेळा प्रयत्न केला. परंतू त्यांना यात यश आले नाही.
म्हणून सर्व शेतकरी महिलांनी एकत्रित येऊन भोकर तहसिलचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे हा वाद मिटविण्यासाठी विनंतीपर निवेदन केले होते.तसेच त्या निवेदनाद्वारे दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिना पासून मुलाबाळांसह तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसिलदार राजेश लांडगे यांनी दि.१९ जानेवारी २०२३ रोजी महसूल कर्मचारी,भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वादातीत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्याठिकाणची अडचण व सत्यपरिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली.त्यामुळे त्यांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले व विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगितले आणि वादातीत विषयात सिमेंट घडवून आणली.तसेच तो रस्ता रुंद करून घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना राजी केले.यामुळे गेल्या ४० वर्षापासून असलेला हा वाद मिटविण्यात व शेतकरी,शेतकरी महिला आणि शेतमजूर यांची होणारी हेळसांड सोडविण्यात त्यांना यश आले.हा वाद त्यांनी मिटविल्याने सर्व शेतकरी, शेतकरी महिलांनी त्यांचे मनापासून आभार मानले.हा वाद मिटविण्यासाठी यावेळी तहसिलदार राजेश लांडगे यांच्या सोबत मंडळ अधिकारी एस.बी.आरु,तलाठी श्रीमती कल्पना मुंडकर,भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी एस.जी.भुसावळे,स्वप्निल चंद्रे,सरपंच माधवराव नागमोड,माजी सरपंच बालाजी नार्लेवाड, भुजंगराव भोसले,साईनाथ याटेवाड,चेरमन दत्तराव आक्कलवाड,उपसरपंच गजानन करपे,गोविंदराव भोसले, सुदर्शन भोसले,मारोतराव बोईनवाड,गंगाधर इडेवार,प्रभाकर डोंगरे यांसह बहुसंख्येने शेतकरी, महिला शेतकरी व आदींची उपस्थिती होती.