Mon. Dec 23rd, 2024

अरेच्चा…! ट्रकमधून सिगारेट,काजू व पान मसाल्याची झाली चोरी

Spread the love

२ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल गेला चोरीस ; भोकर पोलीसात गुन्हा दाखल

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : नांदेडहून किनवटकडे निघालेल्या मालवाहू आयचर ट्रकमधून ब्रिस्टॉल सिगारेट,काजू व पान मसाला असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा किमती मुद्देमाल चोरीस गेला आहे. महत्वाचे म्हणजे भोकर फाटा ते भोकर दरम्यानच्या रस्त्यावर हा मुद्देमाल चोरीस गेल्याने तो ट्रक थांबलेल्या ठिकाणांहून चोरी झाली का धावत्या ट्रकमधून ? यावर प्रश्नचिन्ह असून दि.१८ जानेवारी रोजी या अजब चोरीचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीचे सत्र सुरुच असतांना मालवाहू ट्रकमधून किमती मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.ते असे की, नांदेड येथून किराणा दुकानाचा माल व आदी साहित्य घेऊन दि.१७ जानेवारी २०२३ रोजी रात्री १०:३० वाजता दरम्यान किनवटकडे निघालेल्या मालवाहू आयचर ट्रक क्रं.एम.एच.४६ एफ.२४५६ चा चालक भोकर फाटा येथे चहापान करण्यासाठी थांबला आणि तेथून तो ट्रक घेऊन भोकरकडे निघाला. भोकर फाट्याहून निघालेला हा ट्रक रात्री १२:०० वाजताच्या दरम्यान भोकर येथे आल्यावर त्या ट्रक चालकाच्या निदर्शनास आले की, ट्रकमधील मालावर झाकलेली ताडपत्री फाटलेली आहे.यावेळी त्याने फाटलेली ताडपत्री सारुन ट्रकमधील माल पाहिला असता त्याच्या लक्षात आले की,ट्रक मध्ये घेऊन आलेल्या मालातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ब्रिस्टॉल सिगारेटचे पुडे ठेवलेले बॉक्स,२४ हजार रुपये किमतीचे काजू ठेवलेले डब्बे व १८ हजार रुपये किमतीचे पान मसालाचे पुडे असा एकूण २ लाख ९२ हजाराचा किमती मुद्देमाल ट्रकमध्ये नाही.

यामुळे ट्रक चालक तारुसिंग चव्हाण,रा.टाकळी,ता. उमरखेड जि.यवतमाळ यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व उपरोक्त आशयानुसार २ लाख,९२ हजार रुपये किमतीचा वरील उल्लेखीत मुद्देमाल चोरीस गेल्याची रितसर फिर्याद दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं.२६/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे भोकर पोलीसात दि.१८ जानेवारी २०२३ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हे प्रकरणातील विशेष बाब म्हणजे हा किमती मुद्देमाल थांबलेल्या ट्रक मधून चोरीस गेला का धावत्या ट्रकमधून ? यावर प्रश्नचिन्ह असून या अजब चोरीच्या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.उप.नि.संभाजी हनवते हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !