माजी उपतालुकाप्रमुख बालाजी येलपे यांनी भाजपाचे कमळ घेतले हाती
भोकर तालुका ठाकरे शिवसेनेला केला अखेरचा जय महाराष्ट्र !
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कट्टर शिवसैनिक म्हणून भोकर तालुका व जिल्ह्यात परिचित असलेले आणि गेल्या २० वर्षांपासून कट्टर शिवसैनिक म्हणून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी निष्ठेने काम करणारे माजी भोकर उपतालुकाप्रमुख बालाजी येलपे डौरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तालुक्यातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दि.१६ जानेवारी २०२३ रोजी भाजपाचे कमळ हाती घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
शिवसेना पक्ष फुटी नंतर नव्याने निर्माण झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भोकर तालुक्यात अंतर्गत गटबाजी वाढली.यातून जुन्या निष्ठावंत शिवसैनिकास सातत्याने डावलण्याचा प्रयत्न होत असल्याने माजी उपतालुकाप्रमुख बालाजी येलपे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करुन नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व आमदार राम पाटील रातोळीकर,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गणेश पाटील कापसे,संचालक राजू अंगरवार,भाजपा भोकर शहराध्यक्ष विशाल माने, चंद्रकांत नागमोड यांसह आदींच्या उपस्थितीत नांदेड येथे आनंदसागर मंगलकार्यालयात पक्षाच्या बैठकीदरम्यान भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
अगदी बालवयातच हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत शिवसेनेचे व स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून शिवसेना वाढीसाठी त्यांनी परिश्रम घेतले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसार समाजसेवा करत बालाजी येलपे यांनी शिवसेनेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती,त्यांनी सामान्य शिवसैनिक ते उपतालुकाप्रमुख या पदावर काम केले व २ वेळा डौर तालुका भोकर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केले.निस्वार्थपणे शिवसेना वाढीसाठी काम करूनही तालुका पदाधिकारी निवडीत त्यांच्यावर अन्याय झाल्याने ते काही दिवसांपासून नाराज होते,शेवटी त्यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी देत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.एक कट्टर शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास सोडून गेल्याने भोकर तालुक्यातील अनेक शिवसैनिकांत नाराजी व्यक्त केली आहे.तर एक चांगला कार्यकर्ता पक्षास मिळाल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या प्रवेशाचे अनेकांतून स्वागत होत आहे.