Mon. Dec 23rd, 2024

भोकर तहसिलचा महसूल सहाय्यक व अन्य एकजण एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

गायरान जमीन खरेदी विक्री आदेश परवानगीची नक्कल देण्यासाठी १२ हजार रुपयाची मागितली होती लाच

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : गायरान जमीनीच्या खरेदी विक्रीच्या परवानगी आदेशाची प्रत (नक्कल) देण्यासाठी १२ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या भोकर तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक व त्यांच्या एका खासगी मदतनिसास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी) नांदेडच्या पथकाने दि.१७ जानेवारी रोजी पकडले असून त्या दोघांविरुद्ध भोकर पोलीसात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की,गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. यास्तव मौ.सावरगाव मेट ता.भोकर येथील गायरान पट्ट्याची जमीन विक्री करणाऱ्या एकाने जमीन खरेदी विक्रीसाठीच्या परवानगी आदेशाची प्रत( नक्कल) मिळण्याकरिता भोकर तहसील कार्यालयात जवळपास दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.त्या अर्जावर तहसिलच्या संबंधित विभागाने कसलीही कार्यवाही केली नसल्याने परत एकदा सदरील व्यक्तीने मागणी अर्ज केला.परंतू त्यास त्या परवानगी आदेशाची नक्कल मिळालीच नाही.तर त्या गयरान जमीन पट्ट्याची खरेदी विक्री परवानगी आदेशाची नक्कल त्या व्यक्तीस देण्यासाठी तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक सुभाष रघुनाथ कोंडलवार (४६) व त्यांचा खासगी मदतनिस दिपक चंद्रकांत घोगरे(५१) रा.सईदनगर,भोकर या दोघांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

या नाहक त्रासास कंटाळून सदरील व्यक्तीने दि.६ जानेवारी २०२३ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे रितसर तक्रार केली.यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण,पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी दि.११ जानेवारी २०२३ रोजी भोकर येथे पंचासमक्ष सदरील तक्रारीबाबदची पडताळणी केली.यावेळी उपरोक्त दोघांनी तक्रारदार यांना आदेशाची नक्कल देऊन काम केले व त्याबदल्यात बक्षीस म्हणून १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.यात तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच देण्याचे व घेण्याचे मान्य झाल्याचे निष्पन्न झाले. यावरुन दि.१७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी पो.नि. नानासाहेब कदम यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे जमादार संतोष वच्चेवार,गणेश तालकोकुलवार,पो.कॉ.ईश्वर जाधव,चालक पो.ना. प्रकाश मामुलवार,पो.कॉ.गजानन राऊत,पो.कॉ. निळकंठ यमुनवाड यांचा सहभाग असलेल्या पथकाचा सापळा रचून महसूल सहाय्यक सुभाष कोंडलवार व त्यांचा खासगी मदतनिस दिपक घोगरे या दोघांना तहसिल कार्यालय भोकर येथून ताब्यात घेतले.या कारवाईत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.परंतू ती रक्कम त्या दोघांनी स्विकारली नसल्याचे समजते. त्या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माघील वर्षी याच कार्यालयातील एका कारकूनाविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला व आता ही कारवाई झाली आहे.त्यामुळे सदरील कार्यालयातील काही लाचखोर कर्मचाऱ्यांचे चेहरे एका माघून एक उघडकीस येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !